पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या ग्रंथात ('साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती(खंड पहिला)') पाहिलेच आहे. प्रथमच पैठण येथील साळी पंचमंडळींच्या हनुमान मंदिराचा इतिहास पाहू -
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ :
पैठण येथे दोन हजार वर्षापासून साळी समाज राहत असल्याचे ऐतिहासिक दाखले मिळाले आहेत. पूर्वीपासूनच येथे साळीवाडा नावाची वस्ती आहे. या साळीवाड्यात साळी पंचाचे पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार शके १७२४ मध्ये झाला असल्याचा एक शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम स्थितीत आहे. याचाच अर्थ हे मंदिर तत्पूर्वीचेच आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना दगडी आहे. मंदिराच्या उत्तरेस छोटेसे महादेवाचे मंदिर आहे. ते काही फार जुने नाही. तसेच नुकतेच श्री हनुमान मंदिरात दक्षिणभागी भ. जिव्हेश्वरांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती ज्या शिलालेखात कोरण्यात आलेली आहे ती अशी-
"मिती शके १७२४ दुमदुमी नाम अवद्य आषाढ सुधार ते धीवसी
समस्त साळी पार केला हस्ते सकाराम मेहतर कारभारी"
श्री हनुमान मंदिराची प्राचीनता या शिलालेखावरून लक्षात येते. मंदिराच्या दक्षिण भागात पांथस्थांना उतरण्यासाठी धर्मशाळा (पडसाळ्या) होती.साळी पंचांचा पार म्हणून ह्या भागाला ओळखण्यात येते.
त्याचप्रमाणे साळी समाजाचे गुरू स्वामी रामानंद साळी यांचाही मठ श्रीकृष्ण मंदिर पैठण येथे आहे. शके १६१० मध्ये या मठाची उभारणी झाली होती. या मंदिरातील प्राचीन भगवंताची मूर्ती अप्रतिम असून ती पूर्वीचे पंचांचे अध्यक्ष श्री. घोडके यांच्याकडे सुरक्षिततेसाठी ठेवलेली आहे. साळी समाजाच्या मंदिर संस्कृतीत पैठणचे स्थान प्राचीन आहे.याच भागात पंचांचे कालभैरवाचे मंदिरही होते. आता त्या जागेत पोलिस चौकी(ओसाड अवस्थेत) आहे.
पंचांतर्फे हनुमान जयंती, भ. जिव्हेश्वर जयंती, श्रीकृष्णाष्टमी इत्यादी उत्सव साजरे केले जातात. सोनारे यांच्यातर्फे खंडोबाच्या शासनकाठ्या काढण्यात येतात.पूर्वी बदमोरे आई भवानीचे सोंग काढीत असत. हेमूलाल मारवाडी संगीत हनुमान मेळा चालावीत असत. पैठणच्या नाथषष्ठीत दिंडीचा पहिला मान पंचाला दिला जातो.पैठणच्या साळी समाजाने सातवाहन काळापासून कला, धर्म, व संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य केले. व त्यांचाच आदर्श पैठणहून स्थलांतरित झालेल्या साळी समाजाने घेतला व मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन दिले. बाहेरील नाथ मंदिराला लागून पुण्याचा वाडेकर बंधूंनी बांधलेली धर्मशाळा आहे. तसा शिलालेख त्या धर्मशाळेत आहे.
संकलन - श्री.लक्ष्मणराव लोणकर
स्त्रोत - 'साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती(खंड दुसरा)'या पुस्तकामधून साभार