स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील बिडकीनचे राहणारे. गावोगाव बाजाराच्या दिव शी आयतळ कपडे नेऊन ते विकणे हा त्यांचा व्यवसाय. या व्यवसायानिमित्त त्यांची अनेकांशी ओळख झालेली होती. त्यातच निजाम राजवटीत रझाकारांची त्यांना खूप त्रास होत होता.
रझाकारांच्या अत्याचारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व हैदराबाद संस्थान निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र आंदोलन छेडले गेले होते. अनेक कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेतला होता. काही कार्यकर्ते भूमिगत राहून कार्य करीत होते. त्यापैकीच साळी समाजातील कै. गंगाराम भानुदास चोटमल हे एक होत.
हैदराबाद स्टेट काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सशस्त्र संघर्षासाठी पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथील श्री. काशीनाथराव कुलकर्णीयांनी भूमिगत कार्यकर्त्यांचे फार मोठे संघटन केले होते.
पैठण तालुक्यातील बिडकीन विभागत श्री. त्र्यंबकदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली बोकुड जळगाव, चिंचोली, जांभळी, पाटोदे, वडगाव, इटावा, पांगरा, बडगव्हाण, गिरनेरा, शिवनई इत्यादी गांवातील पाटील आणि पटवारी यांचे दप्तर जळण्याचे व चावड्यावर सशस्त्र हल्ला करण्याचे महान कार्य त्यांनी केले.
ग्राम स्वराज्याची स्थापना आणि संरक्षण :
पैठण तालुक्यातील निजामी राज्यातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यास उपरोक्त चौदा गांवांना रझाकारांच्या अत्याचारांच्या व निजामी राजवटीतून मुक्त करण्यासाठी तेथे ग्राम स्वराज्याची स्थापना करण्यासाठी एरंडगाव कँपच्या स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात स्वा. सै. कै. गंगाराम चोटमल यांनी भाग घेतला होता.
एरंडगाव कँपचे इनचार्ज श्री. काशीनाथ्राव कुलकर्णीनी त्यांना हत्यार चालवण्यासाठी ट्रेनिंग दिली होती. त्याच्यांप्रमाणे हत्यारेही त्यांनी त्यांना दिली होती. त्यात हातबॉंब, ३०३ रायफल, ४१० सायकल, १२ बोअरचा समावेश होत. पोलिस ऍक्शन १३ सप्टेंबर १९४८ रोजी झाली. तोपर्यंत ग्राम स्वराज्य स्थापना केलेल्या गावात त्याचे रक्षण करण्यासाठी ते पेट्रोलिंग करीत होते. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानपत्र व पेन्शन देऊन उचित गौरव केला.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे