स्वा. सै. कै. विठ्ठलराव माणिकराव सोनारे (साळी)
कै. विठ्ठलराव माणिकराव सोनारे (साळी) हे साळीवाडा, पैठण जिल्हा औरंगाबादचे राहणारे असून काँग्रेसचे एकनिष्ठ सेवक व कार्यकर्ता होते. ते एरंडगाव येथील शुक्रवारच्या आठवडी बाजारच्या निमित्ताने नेहमी जात असत. त्यावेळी प्रथम म्हणजे १९५७ च्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या काळात पोलिस व रझाकाराचे एरंडगाव कँपकडे विशेष लक्ष नसे. म्हणून या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन कॉंपशी संबंध ठेवून होते. एरंडगाव कॉंपमधील निजाम सरकारच्या विरुद्ध लक्ष उभारल्यामुळे त्यांचे गंगापार करून जाणे पोलिसांनी बंद केले. परंतु सरहद्द दोन ते तीन मैल लांबीची व गंगा नदीवर आठ ते दहा मेलपर्यंतच्या सरहद्दीवर पसरली होती. त्याही परिस्थितीत कोणत्याही निमित्ताने पोलिसांना चुकवून पैठणच्या बातम्या व पैठणमधील रझाकारांचा नंगाणाच व इतर कृत्यांची माहिती एरंडगाव व कर्हेनटाकळी कँपचे प्रमुख श्री. विठ्ठलराव पंडितराव महाजन यांना तेथे जाऊन देत असत. त्यावेळेस रझाकारांची नजर चुकवून तीन ते चार मैल लांबून माहिती देण्यास जावे लागे.
कँप प्रमुखाला ज्या ज्या मदतीची गरज वाटेल ती ते त्यांच्या शक्तीप्रमाणे करीत असत. त्या कृत्यांचा पोलिसांना संशय आल्यामुळे त्या दिवशी त्यांच्या घरावर दहाबारा पोलिस व दहा पंधरा रझाकार आले. त्यांनी घराची झडती घेतली. त्यामध्ये त्यांना संशयास्पद असे काहीच मिळाले नाही. त्यामुळे चिडून त्यांनी त्यांना जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयासमवेत मारीत मारीत बाजारपेठेत आणले. पोलिसांच्या व रझाकारांच्या विरुद्ध कृत्य केल्याबद्दल काय परिणाम भोगावे लागतात. हे दाखविण्यासाठी पुन्हा त्यांना मारहाण केली. व धमकी दिली की असे जर पुन्हा दिसून आले तर तुमचे घर बायका मुलासगट जाळून टाकू. त्यामुळे ते भयभीत होऊन राहते घर सोडून गावतील गल्लीत आश्रयास गेले. तेथील मोडक्या घरात त्यांना ३ ते ४ महिने फार कठीण परिस्थितीमध्ये काढावे लागले. असे असताना देखील ते व सीताराम लेंभे दोघे जण आगद नांदर येथील श्री बाळासाहेब भारदे व नाना पाटील यांच्या सभेसाठी या लोकांची नजर चुकवून गेले होते. तेथून आल्यावर पोलिसांना समजले व त्यांनी त्यांना पुन्हा मारहाण केली. त्या मारहाणीत त्यांच्या खांद्याचे हाड मोडले त्यांमुळे त्यांचा डावा हात कायमचा निकामी झाला. त्यानंतर त्यांना पोलिसांनी दिलेल्या धमकीची आठवण झाली. आता आपले घर जळून उध्वस्त केले जाईल. परंतु असे न करता रझाकारांची त्यांच्या घराचा कब्जा घेऊन तेथेच त्यांचा अड्डा केला. त्यांच्यावर इतकी संकटे आली असतानासुद्धा त्यांनी आपले कार्य पार पाडण्यात कसर केली नाही कँप प्रमुखाला श्री. विठ्ठलराव पंडितराव महाजन यांना माहिती पुरवत राहिले. त्यांनी हे सर्व कार्य भूमिगत राहून केले. पोलिस अॅडक्शन झाल्यानंतर ते पंधरा दिवसांनी जुन्या घराकडे गेले. तेव्हा त्यांच्या नजरेस असे पडले की घरातील सर्व चीज वस्तू व भांडे यापैकी काहीच शिल्लक राहिले नव्हते. पुढे ते पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून कार्य करीत होते. शासनाने त्यांना सन्मानपात्र व पेन्शन देऊन गौरव केला व साळी वाड्यातील चौकास त्यांचे नाव दिले.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे