वेदकालीन संस्कृती भाग ३
मागील भागात आपण आर्यन थेअरी, आर्य-अनार्यांचे देव ह्या बद्दल माहिती पाहिली. ह्या भागात हिंदू धर्मग्रंथाची व त्यावर आधारीत साहित्यप्रकारांची थोडक्यात ओळख पाहू.
हिंदू संस्कृती म्हटले की वेद, वेदांत, वेदांगे हे लगेच समोर येते. बर्याच जणांना केवळ चार वेद आहेत, व ते अपौरुषेय आहेत एवढेच माहिती असते, पण वेदांशिवाय जे काही साहित्य आहे ते देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.
चारही वेद (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद), वेदांग, वेदांचे उपग्रंथ, जैमिनीची धर्म मीमांसा, बादरायणाची ब्रह्ममिमांसा, अशा काही मिमांसा, वेदांवर आधारित उपनिषदे, व प्रत्येक वेदांचे उपग्रंथ जसे ब्राह्मण आणि आरण्यक, काही उपवेद जसे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, पुराणवेद इ इ असे सर्व मिळून आपली आजची संस्कृती वा धर्म बनला आहे.
वेद म्हणजे ज्ञान. प्रत्येक वेदाच्या पठणानुसार व तत्वज्ञानानुसार अनेक शाखा होत गेल्या. चारी वेदांच्या एकूण ११८० शाखा आहेत व एक लाखापेक्षा जास्त ऋचा त्यात होत्या. ज्यातील २०,३७९ ऋचा आज अस्तित्वात आहेत. सर्वात जास्त, ऋग्वेदाच्या १०,५५२ ऋचा, ह्या दहा मंडलांत आज अस्तित्वात आहेत. ऋग्वेदाच्या मुख्य संहितेमध्ये मधून मधून जी काही परिशिष्टे जोडली आहेत, त्यांना खिलसूक्ते म्हणतात. कारण ही सूक्ते मूळ भाग नाहीत, तर पदपाठकार शाकल्य ऋषींनी हे जोडले आहेत. अशी एकंदर २६ खिलसूक्ते आहे. पुरूषसूक्त, श्रीसूक्त हे ह्याचाच भाग आहे. कधीकधी नारायण ऋषी असाही उल्लेख आढळतो.
ऋग्वेद : ऋग्वेद या सामासिक पदातील ऋग् म्हणजे ॠचा म्हणजेच पद्यात्मक मंत्र. हे मंत्र छंदंबद्ध असतात.वेदोत्तर साहित्यात अशा रचनेस श्लोक हे नाव प्राप्त झाले. एका सूक्तात साधारण तीनपासून ते ५६ पर्यंत ऋचा असू शकतात. एकू्ण १५ छंद, त्यापैकी गायत्री, अनुष्टुप, जगती , त्रिष्टुप, पंक्ती , उष्णिक व वृहती हे वारंवार आढळतात. व्याकरणावरील लेखात ह्यावर जास्त चर्चा करु. गायत्री ह्या छंदात २४५० ऋचा आहेत.
ऋग्वेदामध्ये पहिल्या आठ मंडलात देवांची स्तुती आढळते. ऋग्वेदातील अनेक देवता ह्या निसर्गाशी संबंधित आहेत, वायू, वरुण, सूर्य, नद्या, उषा, अग्नी, गाय इत्यादी. निसर्ग स्तुती व निसर्गातील बदलांमुळे जीवनसृष्टी कशी प्रभावीत झाली आहे हे त्यात प्रामुख्याने मांडले आहे. अनेकदा एका देवाची स्तुती दुसर्या देवाला पण लागू होते, जसे अग्नी. अग्नीची स्तुती करताना त्याला, तू आधी तू वरुण होतोस, मग धगधगलास की सूर्य होतोस, असे वर्णन जागोजागी आढळते. सुरुवातीच्या काळात वरुणाला दिलेले महत्व नंतर इंद्र ह्या देवतेस दिलेले दिसते, कारण संकरकाली अनेक युद्धे होत होती व त्यात इंद्रदेव पराक्रम गाजवत होता. ९ व्या मंडलात सोमयागाबद्दलचे विवेचन आहे तर दहाव्या मंडलात विविध सूक्ते व ऋचा आहेत. व्यावहारिक वा लौकिक जीवनातली सूक्तेही १० व्या मंडलात आढळतात. पहिल्या मंडलातील काही ऋचा ह्या रामायणाचा संबंध दाखविणार्या आहेत असे काहींचे म्हणणे आहे. रामायण विषय मी थोडा विस्तृतपणे नंतर मांडेन.
वाचस्पती, विश्वकर्मा, गंधर्व, अप्सरा, हिरण्यगर्भ, भूतपती या दुय्यम देव व अप्सरांसंबंधीची माहिती व सूक्तेही ही ॠग्वेदात आढळतात. ऋग्वेदकालीन समाजरचना जातिभेदात्मक नव्हती असे जातींच्या अनुल्लेखावरुन मानता येते. ब्रह्म, क्षत्र व विश् असे व्यवसायभेद मात्र आढळून येतात. ह्यांना वर्ग म्हणता येईल. दहाव्या मंडलातील काही ऋचा हे स्पष्ट करतात. जसे 'इन्द्रायेन्दो परिस्त्रव' वरवर पाहता ह्याचा अर्थ फार सोपा वाटतो, पण इतर ऋचांसोबत जोडल्यावर त्याचा अर्थ असा निघतो, " माणूस विविध व्यवसाय करीत असतो व त्याच्या विविध धारणा असतात. सुताराला मोडलेले लाकूड, वैद्याला रोगी, पुरोहिताला सोमयाजी, सोनाराला चमकदार हिरे बाळगणारा श्रीमंत, घोड्याला चांगला रथ आणि बेडकाला पाणी पाहिजे, यास्तव सोमा, तू इंद्राकरता वाहत राहा. सांसारिक लोकांना जुगारी होउ नका ही शिकवणही त्यात आहे. संपत्ती असेल तिथेच गाय व बायको रमते असे सवितादेव सांगतो. अन्नदानसूक्तात स्वार्थीपणा हा वधाचा एक भाग आहे असे म्हटले असून, स्वार्थी व अप्पलपोट्या माणसाची निंदा केली आहे.
सामवेद : ऋग्वेदातील ज्या ऋचांवर गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद. एकूण १६०३ ऋचा आहेत, ज्यातील ९९ ऋचांचा समावेश ऋग्वेदात नाही. सामाचे म्हणजे गायनाचे अनेकविध प्रकार व शाखा ह्यांचे विस्तृत वर्णन ह्या वेदात आहे. जैमिनिय शाखेत एकू्ण गानप्रकार ३६८१ एवढे सांगितले आहेत. गायनाचा इतका समग्र अभ्यास जगातील कुठल्याही धर्मग्रथांत झाल्याचे मला आढळलेले नाही!
अधिक माहिती या लिंकवर पहावी - http://www.maayboli.com/node/17774
जिव्हेश्वर.कॉम टिम
टीप - मुळ लेख मायाबोलीवर केदार यांनी प्रकाशित केलेला आहे.