भाऊबीज (यमद्वितीया)
१. अर्थ:
हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
२. कथा व विधी :
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.' एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अपमृत्यु येत नाही. अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।' असा संकल्प करून तर्पण करावयाचे. हा विधि पंचांगात दिला आहे, तो पहावा. कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.
भाऊबीजेच्या दिवशी काय करावे?
सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे.
बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।।
तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा.
त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.
या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.
भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.
या दिवशी यमपूजा केली जाते.
यम पूजा करण्यासाठी मंत्र
धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज।
पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।।
चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग करावा
मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्।
लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।। .
सर्वांना दीपावली च्या हार्दिक आणि मंगलमय . . शुभेच्छा