×

Error

The template for this display is not available. Please contact a Site administrator.

साळी समाजातील विवाह पद्धती, रुढी व परंपरा

Share

विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन. भारतीय संस्कृती विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. असे विवाह पूर्वी हे आपआपल्या जातीतच होत असत. साळी समाजातही हिच रुढी पाळली जाते. साळी समाजाची मूळ शाखा स्वकुळ साळी आहे. त्याच्या पुढे बऱ्याच उपशाखा झाल्या. त्यात प्रमुख दोन शाखा म्हणजे स्वकुळ साळी आणि पद्म साळी. या दोन्ही शाखेत पूर्वीपासूनच बेटी व्यवहार नाही व आजही नाही. कारण या दोन्ही शाखा आपले उत्पत्ती पुरुष वेगवेगळे मानतात. साळी समाज आपली उत्पत्ती भ. जिव्हेश्वरापासून झाली असे मानतात तर पद्म साळी मार्केंडेयापासून झाली असे मानतात. या दोन्ही शाखांत भाषभेदही आहेत. त्यामुळेच या जातीत बेटीव्यवहार होत नसावा.

इतरही साळी समाजाच्या ज्या उपजती आहेत. त्यांच्यामध्येही पूर्वी बेटी व्यवहार होत नव्हता. परंतु अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाचे पुणे येथे १९७० मध्ये जे महाअधिवेशन झाले होते त्या अधिवेशनात स्वकुळ साळी व साळी समाजाच्या सर्व शाखा (पद्म साळी वगळून) एकत्रित करून त्यांना एकमेकांशी बेटी व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली होती. तेव्हापासून सर्व साळी आता आपल्या मुली देताना ह भेद पाळत नाही. हि एक फार मोठी क्रांतीच म्हणावी लागेल.

जवळपास हिंदू पद्धतीनेच (वैदिक) साळी समाजात विवाह लावण्यात येतात. मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा आहे. त्यात फक्त गावागावाच्या काही प्रथांची सरमिसळ झाली एवढेच. पूर्वी विवाह प्रसंगी गाणी म्हणण्याची पद्धत होती. अलीकडे ती दिसत नाही. पूर्वी चारचार दिवस असा विवाह सोहळा चालत असे. काळाच्या ओघात विवाहप्रसंगीचे पारंपातिक उत्साही स्वरूप लोप पावत चाललेले आहे.

त्यामुळे अलीकडे बरेचसे सणवार, उत्सव साधेपणानेच साजरे केले जातात. तसेच साळी समाजाचे विवाह व इतर सणवार महाराष्ट्रीयन लोकाप्रमाणेच असल्यामुळे त्यात फारशी विविधता व वेगळेपणा आढळत नाही. पूर्वी जसे नवरा-नवरीचे खेळ खेळविले जायचे. उदा. दोघांनी एकमेकांच्या हातातील सुपारी सोडणे, खोबरे चावून एकमेकांच्या अंगावर तोंडानेच फुंकर मारून तो चोथा टाकणे,   नवरदेवाने नवरीला कडेवर घेऊन पळणे वगैरे प्रकार आता दिसत नाही. म्हणा किंवा तेवढा वेळ आता कुणाला नाही किंवा आताच्या पिढीला हे प्रकार पटत नाहीत, रुचत नाहीत. त्यामुळे अलीकडच्या विवाह सोहळ्यात हे प्रकार दिसत नाहीत.

साळी समाजातील विवाह पद्धतीतील काही विधींची माहिती सांगत असताना अहमदनगर जिल्ह्यातील शिराळ गावचे मुरलीधर सरोदे म्हणाले, साळी समाजात लग्नाच्या आधी वीर काढणे ह एक विधी होता. या विधीत वराकडच्या एखाद्या लहान मुलाच्या हातात अग्रावर लिंबू लावलेलं शस्त्र देण्यात येत असे. नंतर त्या शस्त्रावर सूप ठेवून त्या मुलाला लग्न घरातील एखाद्या पुरुषाच्या खांद्यावरुन गावच्या सीमेवर नेण्यात येत असे. सीमेवर गेल्यावर त्या शस्त्राने ते सूप तोडण्यात येत असे. अमंगळाचा किंवा विघ्नाचा नाश असा काही तरी अर्थ त्यामागे असावा. त्यामुळे या विधीसाठी गावातून नेलं जत असताना त्या मुलाचा चेहरा कुणाला दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात येत असे.

त्याच्याप्रमाणे काही भागात वरदेवाला म्हणजे नवरदेवाच्या लहाण्या भावाला मिरवून आणण्याची पद्धत होती. वरील विधीसारखाच हाही विधी असे. इतरही अनेक विधी केले जातात. जावयाच्या हाताने कुंभाराकडून वाजत गाजत कुंभ आणण्यात  येत असे. लग्न सोहळ्यात पंचाचा मान महत्त्वाचा मानला जाई. पंचाच्या उपस्थितीतच फळ भरण्याचा कार्यक्रम होत असे. हि प्रथा भ. जिव्हेश्वरांच्या लग्नापासून चालू आहे. लग्नाच्या या अनोख्या विधीप्रमाणेच साळी समाजातील धार्मिक विधीचेही वेगळेपण आहे. मृत्यूनंतरच्या विधीत खानदेश व पैठण येथे काही वेगळे विधी आढळतात.

खानदेशात प्रेतदहनानंतर तिसऱ्या दिवशी राख सावडली जाते. राख सापडल्यानंतर त्या जागेवर चौकोनी आकाराचे हातमागचे चित्र रेखाटतात व त्याची पूजा करतात. तर पैठण येथे मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशीच राख सावडतात परंतु पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत 'गरूड पुराण' वाचले जाते. अलीकडे ही खर्चीक बाब असल्यामुळे या पुराण वाचनाला फाटा देण्यात आला आहे. ज्याला शक्य असेल त्यानेच ह विधी करावा असे एकूण चित्र दिसते.

मृत्यूनंतर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी झाल्यावर समाजाचा गंध मोकळा करण्याचा एक कार्यक्रम असतो. दहा दिवसांचे सुतक या दिवशी प्रस्तुत कार्यक्रमानंतर संपते. या विधीच्या वेळी ज्याचा मृत्यू झाला त्याच्या घरातील व कुळातील सर्व मंडळी एका बाजूस बसतात व दुसऱ्या बाजूस समाज बांधव बसतात. त्यावेळी समाजबांधव चार आठ आणे एकत्र जमवून समाजातर्फे पान-सुपारी व गंध, कुंकू आणतात. दोन वाट्यात वेगवेगळा गंध (गोपीचंदन) उगाळून जावयाच्या हाताने समाजाला लावतात. तसेच स्त्रियांकडेही कुंकू लावण्यात येते. दहा दिवस घरातील स्त्रिया सुतकामुळे कुंकू लावीत नसत. त्यांना या विधीनंतर कुंकू लावण्याची मुभा मिळते व पुरुषांचेही सुतक सुटून ते इतर कामाला जाऊ शकतात.

यावेळी पानात सुपारी टाकून व चुना लावून उभा पानाचा विडा करून तो प्रथम मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना व कुळबंधुना देतात त्याला कडुविडा म्हणतात. त्यांनी तो फक्त चावून टाकून द्यावयाचा असतो. तेच इतर समाजातील लोकांनाही विडे दिले जातात. त्यांनीही ते चावून थुंकायचे असते. तेव्हा सुतक सुटते. या विधीलाच गंध मोकळा करणे असे म्हणतात. एकदा क गंध मोकळा झाल म्हणजे नातेवाईक टॉवेल टोपीचा आहेर करतात. यासाठी विनाकारण खर्च होतो म्हणून टॉवेल टोपीच्या आहेराची प्रथा बंद करावी म्हणून अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाच्या महापरिषदेत अनेक वेळा ठराव पास झाले; परंतु ही प्रथा अजून पूर्णतः बंद झाले नाही. या स्वरूपात परंतु थोडे फार फरक असलेले विधी इतरत्रही पाळले जातात.

साळी समाजातील एकच वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या समाजात पंचांना अतिशय मान असतो. समाजाने निवडलेल्या या पंचांच्या उपस्थितीशिवाय समाजातलं कुठलंही महत्त्वाचं कार्य पार पडत नाही. त्यांची उपस्थिती इतकी आवश्यक मानली जाते की त्यांच्या परवानगीशिवाय लग्नही लागत नाही व मर्तिकाच्या घरातील सुतकही संपत नाही. ही परंपरा आजही पाळली जाते. लग्न ठरल्यानंतर लग्नाची बाब (म्हणजे ठरलेली रक्कम) पंचांना द्यावी लागते. त्यासाठी पंचांना बोलावून एक मीटिंग घेतात. त्याला 'भोगती' म्हणतात. ह प्रकार पैठण मध्ये आजही चालू आहे.
जुन्या परंपरा व रीतिरिवाज पाळण्यात आजही साळी समाज धन्यता मानतो. याच परंपरेतून साळी समाज 'रथसप्तमी' ला विशेष महत्त्व देतो. साळी समाज सूर्यवंशी असल्यामुळे समाज सूर्यपूजक आहे. रथसप्तमीला घराच्या दाराबाहेर रण शेणी गोवऱ्या पेटवून त्यावर बोळके, बोळक्यात दूध व तांदूळ टाकून भात शिजविला जातो. तो भात प्रसाद म्हणून सर्वांनी भक्षण करावयाचा असतो.

पैठण येथे साळी समाजातर्फे 'आईभवानी' काढण्याची प्रथा होती. मारवाडी (मारवाडे) आणि बदमोरे या आईभवानीचं संचलन करीत असत. ही 'आईभवानी' संपूर्ण साजश्रुंगार करून व दोन्ही हातात नंग्या तलवारी घेऊन नाचत-वाजत-गाजत-मिरवीत येत असे. 'आईभवानी' साळी समाजातर्फे दोन वेळा काढण्यात येत असे. चैत्र शुद्ध पाडवा व होळीच्या दिवशी 'आईभवानी' काढण्याची प्रथा होती.
यच प्रकारे दशावतारी सोंगे काढण्याची प्रथा येवल्यास होती. साळवे आणि शेंद्रे घराण्याकडे हा मान होता. हीच प्रथा कोंकणातील साळी समाजातही आढळून येते.

साळी समाजाचे आराध्य दैवत व मुळ पुरुष म्हणून शिवपुत्र भगवान जिव्हेश्वरांची जयंती सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपात भ. जिव्हेश्वरांचे पूजन, पोथीवाचन, पालखी व भंडारा आदी कार्यक्रम होतात. या निमित्ताने प्रत्येक गावात साळी बांधवांची बैठक घेण्यात येऊन त्या बैठकीत समाजाच्या वर्षभराच्या कामांचा व विकासाचा आढावा घेण्यात येतो.

बहुतेक साळी समजातील बांधवांचा ओढा वारकरी पंथाचे संत होऊन गेलेले आहेत. आजही मोठ्या प्रमाणावर हरिभक्त साळी बांधव आहेत.
पैठणाला साळी समाजातर्फे नागपंचमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते. घोडके, अहिरे यांच्या महिला गटातर्फे सक्रुबा तयार केला जातो व साळी समाजाच्या स्त्रिया त्याच्याभोवती फेर धरून फेराची पारंपरिकं गाणी म्हणतात.

पैठणला सोनारे चंपाषष्ठीला खंडोबाची काठी मिरवणुकीने वेशीबाहेर नेतात. हिंदू समाजातील जवळपास सर्वच पारंपरिक सण साळी समाजातर्फे साजरे केले जातात. खामसवाडीचे णजकरी आजही शंभूदेवाला डोक्यावर वाजतगाजत धज घेऊन जातात. नगरचे धजकरीही शंभूदेवाला धज घेऊन जातात.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे

Share