सुसंवाद
...कधीतरी बोलावेच लागेल !!
आजकाल कुटुंबाची व्याख्याच बदलत चालली आहे. "वसुधैव कुटुंबकम्' म्हणता म्हणता एका छताखाली राहणारी माणसं मात्र लॉजवर राहिल्यासारखी एकमेकांशी त्रयस्थासारखी वागत आहेत.
"छोटं कुटुंब; सुखी कुटंब' हे सूत्र काही प्रमाणात आजच्या विसंवादाला कारणीभूत आहे. विसंवादामागे तणाव वगैरे अन्य अनेक कारणे असली तरी घरातील प्रत्येकच व्यक्तीचं स्वतःचं असं विश्व निर्माण झालेलं आहे आणि माझ्या मते हेच मुख्य कारण आहे. पूर्वीच्या काळी पतीच्या वाटेकडे संध्याकाळी डोळे लावून बसणारी, त्याच्याशी संवाद साधण्याची ओढ असणारी स्त्री आता अपवाद म्हणूनसुद्धा आढळणे अशक्य. पूर्वीचे पतीदेखील कचेरी सुटल्यावर घराच्या ओढीने धावत असत.
आज पती-पत्नी दोघेही कमावते. त्यांच्या वेळा एकत्र येणे दुरापास्त. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची संवादाची भूक परस्पर आपापल्या कामाच्या ठिकाणीच भागून जाते. संवाद हा घरापेक्षा घराबाहेरच होऊ लागल्याने साहजिकच माणसाला घरी आल्यावर शांतपणे टीव्हीपुढेच बसणे योग्य वाटू लागले आहे ! ही दरी सांधायची असेल तर संवाद हा दोन्ही बाजूंनी मनापासून व्हायला हवा. फक्त एकाने संवाद साधायचा व दुसऱ्याने तो कपाळावर आठ्या घालत, वर्तमानपत्रात डोकं खुपसून ऐकायचा, याला संवाद म्हणता येणार नाही.
दुसरा एक उपाय मला सुचवावासा वाटतो. काहीसा विनोदी वाटेल; पण तो खरोखरीच अमलात आणल्यास कुटुंबातील संवाद वाढण्यास नक्कीच मदत होईल. तो उपाय असा ः संध्याकाळी संपूर्ण कुटुंब घरी आल्यावर कोणीही टीव्ही अथवा संगणक सुरू करून त्यापुढे न बसता मुकाट्याने एकमेकांसमोर तासभर बसायचे. किती वेळ गप्प बसतील ? शेवटी, माणूस हा मुळातच संवादप्रिय प्राणी आहे. दोन व्यक्तींमध्ये कुठलाही भौतिक अडथळा आला नाही तर त्यांच्यात संवाद हा घडणारच !