×

Error

The template for this display is not available. Please contact a Site administrator.

फलज्योतिष म्हणजे काय?

Share

जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.

फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता. ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र हा शब्द प्रचारात होता, ज्योति म्हणजे आकाशातील दीप्तीमान गोल. ज्योतिष हा शब्द मुख्यत: खगोलशास्त्र या अर्थाने वापरीत असत. त्याचा उपयोग यज्ञयागादि धर्म-कृत्ये करण्यासाठी चांगला काल कोणता ते ठरवण्यासाठी केला जात असे. त्यात अर्थातच शुभाशुभत्वाचा भाग असे. कालांतराने ज्योति:शास्त्राचे तीन स्कंध होउन त्याना सिद्धांत-स्कंध, संहिता-स्कंध आणि होरा-स्कंध अशी नावे मिळाली. पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता. तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष .

यूरोपमध्ये वेधशाळांच्या मदतीने ज्योतिषी लोक ग्रहगतीचा अभ्यास करीत असत व ग्रहणादिकांविषयी भाकिते वर्तवीत असत. वेधशाळांना राजाश्रय असायचा. जोहानीज केपलर (इ.स. १५७१ -१६३०) या खगोलशास्त्रज्ञाला तत्कालीन परिस्थितीत फलज्योतिषावर उदर निर्वाह चालवावा लागत असे. त्याला त्या परिस्थितीचा कमालीचा उबग आला होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ''फलज्योतिष ही ज्योति:शास्त्राची ( म्हणजे खगोलशास्त्राची ) बदलौकिक कार्टी आहे, पण तिच्याविना तिची बिचारी आई (म्हणजे खगोलशास्त्र ) एका वेळच्या अन्नाला देखील महाग होते ! पुढे काही कालानंतर ज्योति:शास्त्राला खगोलशास्त्र असे नाव पडले आणि ज्योतिष हा शब्द फक्त फलज्योतिष या अर्थाने वापरला जाऊ लागला.

लेखक - प्रकाश घाटपांडे
स्त्रोत - येथे पहा.

Share