शपथ सार्थ सहजीवनाची
दोघं - चलं, आपणच ठरवलेल्या शुभ मुहूर्ताच्या या प्रसन्न वेळी सर्वांसमक्ष स्वीकार करु एकमेकांचा पती-पत्नी म्हणून! लग्न सोहळ्यातली अनावश्यक उधळ-माधळ जाणीवपुर्वक टाळून सहज साधेपणानं सुरुवात करु आपल्या सहजीवनाला. समजून घेऊ खर्याखुर्या प्रेमाचा अर्थ, सोडून देऊ कालप्रवाहात सर्व अपेक्षा, गृहीत, पूर्वग्रह, संदेह, संभ्रमांच्या कागदी नावा आणि स्वच्छ कोर्या मनानं सामोरे जाऊ नवागत आयुष्याला.
तो - त्यासाठी मी वच देतो तुला की मी बाळगणार नाही खोटी पुरुषी अहंकार जो बिथरवत राहतो क्षुल्लक कारणांनी आणि खाली खेचतो माणूसपणापासून... स्वतःला समजून घेत मी दूर ठेवीन असा खोटा अहंकार.
ती - मी वचन देते तुला की मीही अडकणार नाही तथाकथित बायकीपणात. माणूस म्हणून जगण्याच्या तुझ्या प्रयत्नात हार्दिक साथ देईन तुला.
तो - मी समजून घेईन की फक्त घर नाही घरकामही दोघांच असतं आणि ते महत्वाचंही असतं, करिअर इतकंच. ते करण्याचा आनंद मी अनुभवीन.
ती - मीही समजून घेईन की पुरुषीपणाची झूल उतरवणं सोपं नाही... कधी डगमगलास तरी तुझ्या सोबत राहीन मी. माझ्यात जाग्या झालेल्या क्षमतांचा गैरवापर करणार नाही. माझ्या विचारांशी मी ठाम असेन. पण ते मांडताना दरवेळी आक्रमक व्हायची गरज नाही, आपलेही विचार तपासून पाहावे लागतात हे मी समजून घेईन.
तो - तुझ्या करिअरमध्ये तुला मिळणार्या संधीचा तुला पुरेपुर फायदा घेता यावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन. माझ्या आधी पुढे गेलीस तरी न्यूनगंड नाही येऊ देणार मनात. अभिनंदन करीन तुझं मनःपुर्वक.
ती - किरकोळ गोष्टींचा बाऊअ करुन मीही तुझ्या करिअरच्या आड न येता बरोबरीनं चालत राहीन, एकानं फुलत राहवं म्हणून दुसर्यानं कोमेजत जावं असं नाही. दोघांनाही एकमेकांना फुलवता येईल. पण आपण समजून घेऊ एकदा 'करिअर'चा खोल अर्थ आणि त्याचं स्थान आपल्या सहजीवनातलं.
तो - हळूहळू समजत जाशील तू मला, तुझ्या मर्यादाही येतील लक्षात. पण त्यासह तुला स्वीकारीन मी. राहू देईन तुला तुझ्यासारखं, तुझ्यासाठी. स्वामित्वाची भावना नाही येऊ देणार मनात. आपण असू स्वतंत्र, स्वावलंबी, स्वयंपूर्ण, पण परस्परावलंबन ही त्या पुढची प्रगल्भ स्थितीही समजून घेऊ आपण.
ती - एक व्यक्ती म्हणून आणि एक पुरुष म्हणूनही मी समजून घेईन तुझ्या मर्यादा, तुझी बलस्थानं, बांधून ठेवणार नाही तुला माझेपणात. तरी कधीकधी एक्मेकांसाठी त्याग करण्यातला आनंदही मिळवत राहू आपण....'नाव हेलकावे घ्यायला लागली तर कुणाच्या स्वप्नांचं ओझ कमी करायचं? असे प्रश्न उरणार नाहीत मग.
तो - मला असतील मित्र-मैत्रीण...वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आधार देणार्या. जगण्याचा पैस वाढवणार्या...पण पती म्हणून मी तुझ्याशीच एकनिष्ठ राहीन. जगण्यातल्या सर्व चढउतारांच्या काळात, सर्व सुख-दुखा:त तुझ्या सोबत राहीन, चुकलीस कधी, तरी समजून घेईन, चूक सुधारण्यासाठी मदत करीन तुला.
ती - बाहेरच्या जगात वावरताना मलाही घ्यावीच लागेल सोबत कुणाकुणाची. पण आपल्या नात्याचा आदर सदैव जागा राहील माझ्या मनात. सर्व यश-अपयशांच्या काळात मी तुझ्याशीच एकनिष्ठ राहीन. चुकलास कधी, तर पाठीशी राहीन तुझ्या, चूक दुरुस्त होई पर्यंत...
तो - जीवनाथी या नात्यानं हरतर्हेनं मी तुझी काळजी घेईन, पण इतकी नाही की तू दुबळी राहशील...तुझं, घराचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी असेल, पण ते फक्त मीच करू शकेन असा अहंकार नाही बाळगणार. तुझ्या क्षमतांवर विश्वास ठेवीन.
ती - शिक्षणामुळे, जाणीवपुर्वक केलेल्या संस्कारामुळे आपण आता समान स्तरावर आलोत. तरी मी समजून घेईन की पुर्ण समाज अजून पुरेसा बदललेला नाहीय. एक पुरुष म्हणून असलेल्या तुझ्या वेगळ्या दृष्टीकोनाचा, तुझ्या सूचनांचा मी मान राखीन. आत्मसन्मान जपण्याच्या नादात वास्तवाचं भान विसरणार नाही.
तो - पुरुष म्हणून मी श्रेष्ठ, स्त्री म्हणून तू कनिष्ठ हे तर नाहीच मानत मी. पण तुझ्यातल्या पुरुष-तत्वाची जोपासना करत तू माझ्यापर्यंत येते आहेस तसं माझ्यातल्या स्त्री-तत्वाची जोपासना करत मीही तुझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीन. मला पटलंय की A fully realized human being is one who knows the masculine and yet keeps to the feminine.
ती - हे तर अगदी माझ्या मनातलं झालं! या प्रयत्नात मी तुझ्या सोबत असेन पूर्णपणानं. आपल्या सहजीवनात सर्व प्रकारच्या बाह्य प्रगतील अस्तर असेल अशा आंतरिक विकासाचं...तरी प्रत्यक्षात स्त्री आणि पुरुष म्हणून अंतर राहीलच आपल्यात. ते मी समजून घेईन आणि एक चांगल माणूस होण्याच्या प्रक्रियेत तुला हार्दिक साथ देईन.
तो - समजूतदारपणाची ही स्वप्नं आपण प्रत्यक्षात उतरवण्याच प्रयत्न कर राहू मनःपूर्वक...तरी अधून मधून बिनसेल काहीतरी. कळलेलं सगळंच वळणार नाही. प्रत्यक्ष जगताना फटी पडतील सलग स्वस्थतेत. तेव्हा कस लागेल आपल्या प्रेमाच्या सच्चेपणाचा. अशा कसोटीला मी उतरीन, नक्कीच. इथे मात्र मी गृहीत धरतोय तुझी साथ.
ती - Done..! तुझ्या हाताला हात लावून नुसतं 'मम' म्हणत नाही. तुझा हात हातात घेऊन तुला आश्वासन देते...आपल्या प्रेमाच्या कसोटीला मीही उतरेन...तुझ्या बरोबरीन..!
दोघं - आपल्या अशा सहजीवनाचा परीघ राहणार नाही दोघांपुरता. त्यात सामावतील सर्व प्रकारच्या कौटुंबिक जबाबदार्या. त्या निभावू आपण मनःपूर्वक. जीवनाचं सातत्य टिकवत नवी पिढी घडविण्याची जबाबदारीही पेलावी लागेल आपल्याला. तेव्हा एकमेकांच्या मतांचा मान राखत योग्य तो निर्णय घेऊ. पूर्ण पारदर्शक ठेवू आपण आपल्यातलं नातं.
आपला परिसर, समाज, पर्यावरण, जागतिक घडामोडी या विषयी जागरुक राहू आणि त्या संदर्भातल्या कर्तव्याचं भान ठेवू. समाजात वावरताना जाती, धर्म, वंश, लिंग यावर आधारित भेदभाग मनातून काढून टाकू.
एकमेकांसह जगणं समजवून घेत अधिकाअधिक प्रगल्भ सहजीवनाची वाटचाल करत राहू. अधिक उन्न्त मानवी समाज घडवणं नसलं आपल्या आवाक्यात तरी त्या प्रक्रियेला आपला वाटा तरी आपण उचलू शकतोच ना..!
जीवनात अर्थकारण महत्वाचं आहेच पण त्याहून महत्वाचं आहे, आपलं अर्थपुर्ण जगणं. याचं भान आपण सतत
ठेवूया.
विचार आणि भावना यांचा समन्वय साधत जीवनाची वाटचाल सुंदर करण्याचा आदर्शवत् वाटणारा आपला हा संकल्प इथे जमलेल्या सर्व जाणत्यांच्या हार्दिक शुभेच्छांमुळे सिध्दीच्या जवळ जवळ जात राहील...!
मुळ लेखन - आसावरी काकडे