भ.श्री.जिव्हेश्वर महाराज यांचे संक्षिप्त चरित्र

Share

श्री व्यास महर्षींनी स्कंद पुराणाची रचना केली. अत्रि ऋषींनी त्याचा गहन अभ्यास केला व त्यांनी संस्कृत भाषेत `साळी महात्म्य' पुराण, ग्रंथ लिहिले. पंडितोत्तम संत भा॑नूदासांनी या ग्रंथाधारे मध्ये हे पुराण ग्रंथ मराठी भाषेत (भगवान श्री जिव्हेश्वरांचे चरित्र) रचून साळी समाजात त्या साहित्यात बहुमोल उपकार केले आहेत. शाहपूरच्या श्री सिद्दप्पा शास्त्री मेकल यांनी शालिवाहन शके १८४५ मध्ये या मराठी ग्रंथाचा अनूवाद षट्पदी छंदात कन्नड भाषेत केला. त्यावर आधारीत हे भगवान जिव्हेश्वरांचे संक्षिप्त चरित्र होय. या दोघा पंडितांचे उपकार मानावेत तेवढे कमीच.

दैदिप्यमान रतगिरीतील कैलासपुराच्या केंद्रस्थानी विराजत असलेल्या वटवॄक्षाखाली प्रथमगणांनी वेष्ठीत, भस्मोध्दूलीत, सर्पाभरण भूषित, जटाजूट मंडित पार्वतीपती श्री सादाशिव पद्मासन घालून बसले होते. ब्रम्हदेव व इतर सार्‍या अमरगणां समवेत श्री महाविष्णु तेथे गेले. त्यांनी श्री शिवशंकराची स्तूती केली. ते ध्यानावस्थेतून जाग्रस्थ झाले, महाविष्णुस व अमरगणांना पाहून विस्मित झाले. स्मित करून, श्रीमन्नारायणास अलिंगन देऊन, सर्वाचे आदरातिथ्य करून, त्यांच्या येण्याचे कारण त्यांनी विचारले. देवांनी निवेदिले, `परमेश्वरा, आदिमायेकडून सॄष्टीची रचना झाली. तिच्या सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून ब्रम्हा, विष्णू, महेशाची उत्पत्ती झाली. ब्रम्हाने ब्रम्हांडाची रचना करून, पंचमहाभूतांना निर्मून, देव, दानव, मानव व विभिन्न जीवकोटिंना जन्म दिला पण देव, दानव व मानव इतर प्राण्यासारखे नग्नावस्थेतच आहेत त्यांच्या लज्जा रक्षणार्थ वस्त्राची निर्मिती झाली पाहिजे.हे महादेवा, वस्त्रानिर्मितीची व्यवस्था आपण करावी अशी विज्ञापना करण्यास आपल्या जवळ आम्ही आलो आहोत' तेव्हा महादेवांनी आदिमायेचे स्मरण केले.तिने प्रत्यक्ष होऊन श्रीशंकरास म्हटले, `परमेश्वरा, वस्त्र निर्मिणार्‍या पुरूषाची आपण उत्पत्ती करा.'

           आदिमायेची ईच्छा स्पष्ट होताच उपस्थित देवांनी परमेश्वराकडे उत्सुकतेने पाहिले देवतांच्या व आदिमायेच्या इच्छिताप्रमाणे महादेवाने आपल्या जिव्हेच्या अग्रभागातून कोटी सूर्याच्या प्रकाशाने युक्त अशा एका दिव्य शिशूस उत्पन्न केले.सारा कैलास आनंदविभोर झाला. आनंद प्रदर्शक मंजुळ घंटानाद होऊ लागला. श्रावण शुद्ध त्रयोदशी सोमवार हा तो दिवस होता. या शुभदिनी कैलासातील सार्‍या सुवासिनींनीनवजात अर्भकास पाळण्यात घालून त्याचे नामकरण केले. श्री शंकराच्या जिव्हेतून उद्भवल्यामूळे `जिव्हेश्वर' त्रिगुणात्मांना साहाय्य कर्ता म्हणून `स्वकुळ' व सुर्योदय समयी जन्मला म्हणून `सुर्यवंशी' अशा प्रकारे बालकाचे नामकरण झाले. सार्‍या जगाला वस्त्रप्रावरणांचा पुरवठा करून मनवांच्या लज्जेचे आणि मानाचे रक्षण करो असा आशीर्वाद बालकास देवून आदीमाया अंतर्धान पावली.  

आपल्या बाललीलांनी श्री जिव्हेश्वरांनी कैलासातील देवांचे व ॠषि-मुनींचे अंतःकरण मोहून टाकले, महादेवांनी जिव्हेश्वरांना गुरूपदेश दिला. वयाच्या आठव्या वर्षी बालक जिव्हेश्वराचे उपनयन संपन्न झाले. वस्त्र निर्मितीस आवश्यक अशी सारी साधन सामग्री तयार करण्याची एक योजना आदीमायेस सादर केली. त्यानुसार व आदीमायेच्या आदेशानूसार ब्रम्हा, विष्णु, महेश, नारद, शेष, नंदी आदी देवतांनी मागाच्या निरनिराळ्या भागांना रूप दिले. कैलासातील एका प्रशस्त जागेत मागाची स्थापना केली. ब्रम्हदेवांनी कापसाची निर्मिती केली. कापसापासून सूत काढले गेले. सार्‍या देवांच्या कृपेने निर्मित त्या मागाची मनोभावे पूजा करून एका मंगल अशा सोमवारी शुभ मूहूर्तावर वस्त्र विणले गेले सर्वप्रथम कलात्मक वेलबुट्टीनी युक्त असा श्वेतवर्णाचा पीतांबर विणला गेला. उमामहेश्वरांच्या उपस्थितीत तो पीतांबर भवानी मातेस अर्पिला गेला. आनंदातिशयाने माता भवानीने त्या सुंदर पीतांबरास विणणार्‍या जिव्हेश्वरास वत्सल्याने आशीर्वाद दिला आणि तो पीतांबर तिने पार्वतीस वापरण्यास दिला.पार्वतीने तो एखाद्या शुभप्रसंगी वापरण्याचा आपला मानस व्यक्त केला.

पार्वतीची मनोकामना लक्षात घेऊन आदी मायेने जिव्हेश्वरांच्या विवाहाची सिद्धता केली. सार्‍या देवांना ती सांगितली. ब्रम्हदेवाने त्रिलोक सुंदरी अशा अंकिनीस व श्री शारदेने लावण्यवती दशांकिनीस निर्माण केले. इंद्र, चंद्र, सुर्य, वरूण, कुबेर या देवांनी सुशोभित अशा विवाह-मंडपाची रचना केली. श्रेष्ठ शाकपाक पक्वांन्नांची सिद्धता झाली. सारे देव जमा झाले. मंगल वाद्यांच्या सुस्वर निनादात, पुरोहितांच्या मंत्रघोषात माघ शुद्ध द्वादशीच्या शुभ मुहूर्ती भगवान जिव्हेश्वरांचा अंकिनी व दशांकिनी याचबरोबर विवाह संपन्न झाला. अनेक प्रकारचे आहेर दिले गेले. मिष्टांन्न भोजनाने संतुष्ट झालेले सारे आमंत्रित प्रसन्नचित्ताने शुभाशीर्वाद देते झाले. अशा प्रकारे लग्न सोहळा थाटामाटाने पार पडला. श्री जिव्हेश्वरांचे ग्रहस्थजीवन सुरू झाले. वस्त्रनिर्मितीच्या त्यांच्या कार्यात अंकिनी व दशांकिनी मदत करू लागल्या.

ब्रम्हदेवांनी आपला पुत्र सुकर्म्यास श्री जिव्हेश्वरांना सामवेद व ॠग्वेद शिकविण्यास सांगितले होते. म्हणून जिव्हेश्वर द्विजवर सुकर्म्यांकडे वेदाध्ययनासाठी गेले. आपले सारे ज्ञान व पांडित्य हस्तगत करून घेईल या भीतीने मत्सराने ग्रासलेला सुकर्मा जिव्हेश्वरांवर रूष्ट झाला, व त्याजकडे दोषैक दॄष्टीने पाहू लागला. आपल्या जवळील ग्रंथ त्याने जिव्हेश्वरास दिले नाहीत. या विचित्र वागणुकीचा जिव्हेश्वरावर जणू वज्राघातच झाला. त्यामुळे जिव्हेश्वर मूर्छीत झाले. आपल्यावर अपवाद येणार या भयाने ग्रस्त होऊन सुकर्मा आपला पिता ब्रम्हदेव याजकडे गेला. त्याने पित्यास खोटेच असे सांगितले की जिव्हेश्वराने त्याजवर हात उगारला होता. आपल्यावर प्राण संकट ओढवले आहे व संरक्षणाची अतीव गरज आहे असे सांगून टाकले. सत्यासत्याचा मुळीच विचार न करता ब्रम्हदेवाने सुकर्म्यास आश्रय दिला. जिव्हेश्वर मुर्छीत झाले आहेत, अशी बातमी कळताच श्री सदाशिव नंदीवर आरूढ होऊन ब्रम्हलोकास आले. योग्य उपचार करून जिव्हेश्वरास शुद्धीवर आणले व त्यांची सांत्वना केली. तेव्हा त्यांनी ब्रम्हदेवास वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. जिव्हेश्वरास वेदांचे ज्ञान देण्याची सोय करण्यास सांगितले. ब्रम्हदेवंनी यास नकार दिला. यावर श्री शंकरांनी ब्रम्हदेवास शाप दिला की, त्यांचे वेद राक्षस चोरतील असत्यवचनी सुकर्मा या नंतर दशपिंड क्रियेद्वारा मिळणार्‍या धान्यावर आपला उदर निर्वाह करों असाही शाप सुकर्म्यास त्यांनी दिला. आपल्याबरोबर आपला पुत्र जिव्हेश्वर यास त्यांनी कैलासास नेले.

शपित सुकर्मा पश्चाताप पावत नाही. तो पुढे महाबल राक्षसाच्या आश्रयास जातो. महाक्रूर अशा या राक्षसाचा स्नेह प्राप्त करून घेतो. तो महाबलास कैलासावर आक्रमण करण्याचा सल्ला देतो. महाबल आपला पुत्र रीठासुराच्या अधीपत्याखाली आपली सेना कैलासावर स्वार करण्यास पाठवतो. रीठासुराशी युद्ध करण्यास जिव्हेश्वर सिद्ध होतात. आपल्या मातेचा आशीर्वाद घेतात. दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध होते. त्या घोर युद्धात रिठासुर मारला जातो. पुत्रवधाची बातमी ऐकताच महाबल आपल्या चतुरंग सेनेसहित, सुकर्म्यास बरोबर घेऊन युद्धभूमीकडे निघतो. त्याची महासाध्वी भार्या सगुणा आपल्या पतीस युद्ध न करण्याचा सल्ला देते. तिची रास्त सुचना न जुमानता तो आगेकूच करतो. इकडे रणदुंदभीच्या गर्जनेत निर्भय, महापराक्रमी,तेजपुंज अशा जिव्हेश्वराने ॐकारयुक्त ध्वजाने मंडित अशा रथावर आरूढ होऊन `हर हर महादेव' , `ॐ नमः शिवाय' अशा उत्स्फुर्त घोषणा गर्जत, सार्‍या सूर सैन्यास युद्ध स्फुरण देत, रक्षस महाबलाच्या सैन्यावर चढाई केली. गदेशी गदा, अश्वास अश्व, गजास गज, रथास रथ, खड्गास खड्ग भिडले. युद्धतील व्यूहरचना पाहणार्‍यांस उमा महेश्वर रजतगिरीच्या आग्रभागी येऊन घोर संग्रामाचे निरीक्षण करू लागले. तुंबळ युद्धाच्या धुमश्चक्रीने आसमंतात धूळ व्यापून राहिली. सूर्यदेवास जिव्हेश्वरांचे युद्ध कैशल पाहणे अशक्य झाले, म्हणून त्यांनी भूमीवर उतरण्याचा विचार केला. उभय सेनेतील वीर अस्त्र शस्त्रांचा मारा एकमेकावर करीत होते. मातेच्या रक्षाकवचाने सुरक्षित अशा जिव्हेश्वरांनी राक्षस सेनेचा धुव्वा उडवला व सार्‍या सेनेस मारून टाकले. पराजित महाबल सुकर्म्यासहित शंकराकडे जातो व संरक्षण व आश्रय देण्याची विनंती करतो. महाबलास कळते की आपल्या साहाय्याने जिव्हेश्वर अचानक आक्रमण करुन त्यास संकटात फसवण्यासाठी दुष्टबुद्धी सुकर्म्याने केला होता. असे समजताच सुकर्म्यावर गदाप्रहार केला व त्यास मारून टाकले. दुष्ट सुकर्म्याचा संहार झाल्याचे पाहून महादेव महाबलास अभय देतात. अपूर्व असे क्षात्रतेज प्रगटवून आपल्या अदम्य शौर्याने व युद्ध कौशल्याने कैलासवर होऊ घातलेल्या आक्रमणाचा यशस्वीपणे प्रतिकार करणार्‍या महापराक्रमी जिव्हेश्वरांची श्रीशंकर प्रशंसा करतात व त्यांचा सार्‍या अमरगणां समोर योग्य असा सत्कार करतात.

भगवान जिव्हेश्वरांना जेष्ठ भार्या अंकिनी पासून लोमहर्ष, चंद्रकांत, क्षेत्रपाल व पारसनाथ असे चार पुत्र निपजतात. या सार्‍यांची ओढ परमार्थाकडे असते. ते चौघेही गुरूसेवा करीत आत्मानात्म विचार, स्वरूपज्ञान यांच्या प्राप्तीसाठी साधना करू लागतात. सहधर्मिणी दशांकिनी पासून कैलासभूवन, सनातन, भक्तिभानु, पर्वकाल, दयासागर, व अर्चन निर्धार असे सहा पुत्र जन्म घेतात. या सार्‍यांनी विहित धर्मकर्म, समाज-हित-चिंतन करीत लोककल्याणास आपली बुद्धिशक्ती वेचली.

स्वर्गाधिपती इंद्राने भगवान जिव्हेश्वरांचा पुत्र कैलासभुवन यास अमरगणां करिता वस्त्र विणावे म्हणून स्वर्गलोकी नेले. इंद्राचा शिष्य माळव देशाचा राजा सुभानू इंद्रभवनास गेला होता. त्याने कैलासभुवनाने विणलेल्या तलम चित्ताकर्षक वस्त्रांना पाहिले. अतिशय प्रभावित होऊन माळवाधिपतीने परततेवेळी आपल्या बरोबर कैलासभुवनास नेले. कैलासभुवनाची मुले मात्र स्वर्गात राहिली. माळव देशातील कैलासभुवनाच्या वंशजांना `आहेर साळी' या नावाने आज ओळखले जाते.

जिव्हेश्वरांच्या दुसर्‍या मुलास सनातनास श्रीमन्नारायणांनी वैकुंठलोकास नेले. बागलाण देशाच्या चित्तवॄत्ती राजाने महाविष्णूची आराधना केली व सनातनास आपल्या बरोबर बागलाण देशास पाठवावे म्हणून प्रार्थना केली. महाविष्णूंनी प्रसन्न होऊन सनातनास बागलाण देशास जाण्याची अनुमती दिली. बागलाण देशातील वंशजाना तेथील जनता `बागलाण साळी' किंवा `सनातन साळी' या नावाने संबोधतात.

कांतीपुरच्या सुशील राजाने परमेश्वराच्या वरप्रसादाने श्री जिव्हेश्वराच्या सहय्याने पुत्रास - अर्चन निर्धार यास वस्त्रनिर्मिती व्यतिरिक्त त्याने राजास शुद्ध ज्ञानाची शिकवण दिली व त्यास ज्ञानी बनविले. आज या अर्चन निर्धारच्या वंशजांना `शुद्ध साळी' अथवा `सूत साळी' या नावाने तिकडे ओळ्खले जाते.

वैकुंठात महाविष्णूने आपल्या दर्शनास येणार्‍या भक्तांना बुक्का व गंधाक्षता लावण्याचे काम कैलासभुवनाचा पुत्र निरोधन यास सोपविले. म्हणून निरोधाचे वंशज `टिकळे साळी' या नावाने संबोधले जातात.
अशाच प्रकारे देश, काल, स्थान - मान यांच्या अनुषंगाने अर्चन, गुर्जर, पटलेगार, वाढोळा, पटसाळी या विविध नावाने ओळखले जाणारे साळी आढळतात.

परम शिवभक्त वरूणराज काशीत राज्य करीत असे तो रोज कैलासाला जाऊन शिव दर्शन घेई. वर्धक्यामुळे त्यास असे करणे जमेना म्हणून त्याने महादेवाची प्रार्थना केली, विनविले की, त्यांनी यापुढे काशीस येऊन रहावे. जेणेकरून त्यास सहजपणे दर्शनलाभ घडावा. तदनुसार श्री शंकरांनी (काशी) विश्वनाथ या रुपाने तेथे वास्तव्य केले. याच क्षेत्रात महादेव पुत्र भगवान जिव्हेश्वरांनी ग्रहस्थाश्रमाचा त्याग करून, संन्यास घेऊन, कालभैरव या रुपाने गो - घाटावर वास्तव्य केले. लोककल्याणाचे कार्य करीत करीत त्यांनी तेथेच समाधी घेतली. या समाधी स्थानी जिव्हेश्वरांचे पवित्र मंदिर उभे आहे. सारा हिंदू समाज भक्तीभावाने येथे दर्शनास येतो व स्वतःस पुनीत मानतो.

आस्तंबरपर्यंत देवांच्या लज्जा रक्षणार्थ वस्त्रनिर्मितिचे कार्य सर्वजन सुखाय सर्वजन हिताय करीत करीत भगवान श्री जिव्हेश्वरांनी आपले दिव्य जिवन कार्य समर्पित केले. त्यांचे स्मरण आम्हास स्फुरणदायी ठरो.

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...