श्री जिव्हेश्वरांचा पाळणा
गोविंदा घ्या कुणी गोपाळ घ्या ग |
पाळणा हलवू सयांनो या ग |
खालुन घ्या ग वरुन घ्या ग |
स्वकुळांचा राजा पदरात घ्या ग ||धृ||
माता पार्वती बोले शंभूला |
जरीचा शालु हवाच मजला |
भोळ्या सांगावे जिव्हा उघडिता |
जिव्हेश्वर अवतार झाला ग ||१||
आदिमायेने पाहिले तान्हुले |
उध्दरण्या स्वकुला स्वकुळ केले |
अला बला काढी लक्ष्मी माता |
साळी नावाने साखर वाटा ग ||२||
जरतारी वस्त्रे वाटी देवांना |
विणकर सजवी तिन्ही लोकांना |
पाळण्यात जिव्हेश्वर बसला |
हळुच पाळणा हलवा ग ||३||
हाती मनगटी पायात वाळा |
करिती कौतुक माझ्या बाळा |
तीट लाविते काळा कपाळी |
गालात हळुच हसतोय ग ||४||
- विजयकुमार सि. साळी, मुलुंड