वेदकालीन संस्कृती भाग २
प्रस्तुत लेखात हडप्पा-मोहंजदाडो संस्कृती थोडी विस्तृत स्वरुपात पण आर्य-अनार्य संकरासहित त्याचे मूल्य काय, त्यांचे देव व ह्या देवांची आर्यदेवांशी तुलना, इंग्रजी विद्वानांचे ह्यावर मत असे सर्व मांडण्याचा प्रयत्न आहे. लेख कालावधी व त्याची व्याप्ती खूप मोठा असल्याने काही भाग त्रोटक वाटू शकतो. तो दोष माझा आहे कारण मग ती ओळख न ठरता भाष्य ठरले असते, व भाष्य लिहिण्याइतका माझा अभ्यास अजिबात नाही. माझ्या मर्यादा ओळखूनच ही त्रोटक ओळख सादर करत आहे.
मागील लेखात आपण आर्यपूर्व असलेल्या हडप्पा - मोहंजदाडो ह्या संस्कृतीकडे लक्ष वेधले होते. त्या संस्कृती मध्ये मूर्तीपूजेला देखील महत्व होते हे उत्खननात सापडलेल्या मूर्तींवरुन लक्षात येते. उत्खनन करताना जे सील सापडले आहेत, त्यावर कोरीवकाम आहे व ती त्या संस्कृतीची भाषा आहे, त्याला अजूनपर्यंत डिकोड करता आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या भाषेबद्दल काही सांगता येत नाही, पण हे सील सापडल्यामुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांच्याकडे भाषा होती व ती लिहीता देखील येत होती. म्हणून लिखाण ह्या कलेचा सुमेरियन संस्कृतीने (मेसोपोटेमिया) शोध लावला हे गृहितक देखील फोल ठरते. (हा माझा निष्कर्ष आहे, चुकीचा असू शकतो.) मेसोपोटेमियामध्ये ख्रिस्तपूर्व ३५०० वर्षांपूर्वी सुमेरियन संस्कृती नांदत होती. हा भाग आजच्या इराणमधील होय. आपण दस्यु हा शब्द पाहिला, जो इराणी भाषेशी मिळता जुळता आहे, शिवाय इराणातून देखील भारतात लोक स्थलांतरीत झाले आहेत. (लंबकपाली वगैरे) हा शब्द जर आर्यांनी (इराण मार्गे) बरोबर आणला, तर असे सहज सिद्ध होते की आर्यपूर्व संस्कृतीमध्ये लिखाणकला बहरास आली होती.
१९३३ ते १९६४ मधील संशोधनानुसार आर्यांची संस्कृती (उदा. धर्म, तत्वज्ञान, कला, साहित्य) ही आर्येतर वा अनार्यांपेक्षा उच्च होती, हा समज दूर होत आहे कारण, सिंधूसंस्कृतीमधील हडप्पा-मोहंजदाडोमध्ये सापडलेल्या वस्तू. हडप्पा नामशेष झाल्यावर नगररचनेची कला (पाहा http://www.harappa.com/har/har0.html ) त्यांच्यासोबत एकतर नाहीशी झाली, वा आर्यांना ती कळली नाही. नगररचनेचे तंत्र हे सिंधूसंस्कृतीपेक्षा जुने होते. आर्यांच्या नगरातील रस्ते हे कायम धुळीने माखलेले असत त्यामुळे सूत्रकाळापर्यंत आर्य ब्राह्मणांना नगरवास पसंत नव्हता. बौधायन धर्मसूत्रात नगरात वस्ती करणे हे अपावित्र्यकारक आहे असा उल्लेख आहे, कारण नगरात धूळ असते. (आजची भारतातील अवस्था बघता, नगररचना आपण समजूनच घेतली नाही हा कयास खरा ठरतो. ) हड्डप्पा-मोहंजदाडो उत्खननापूर्वी पश्चिमी विद्वान सुसंस्कृत भारताचा इतिहास नॉर्डिक टोळ्यांच्या आक्रमणापर्यंत, म्हणजे इ.स.पूर्व १५०० च्या आसपास नेत. हा कालावधी मॅक्समुलर याने निश्चित केला. त्यावरुन आर्य हे प्रगत होते हे गृहितक त्याने बांघले होते, जे नंतर चुकीचे निघाले. पण अजूनही, अनेक भारतीय आर्य आक्रमण व त्यांची प्रगत संस्कृती गृ्हीत धरुन चालतात. व्हिलर व मार्शल हे सिंधूसंस्कृतीचे अभ्यासक असे मानतात की आर्यांच्या आक्रमणामुळे व लुटारु टोळ्यांमुळे सिंधूसंस्कृती लयाला गेली. ॠग्वेदातील आर्य हल्ले करुन दस्यु, व पणी यांचे धन लुटत. त्यांची नगरे फोडत. शबर* ह्या दस्यू राजाची नव्याण्ण्व भक्कम पुरे फोडली व त्याचे एक लाख लोक मारले असा एक उल्लेख आहे. ( ७|९९|५)
सिंधूसाम्राज्य हे तत्कालीन मेसोपोटेयीन सुमेरियन राजांपेक्षा फार मोठे असावे हे केवळ दोन नगरींमधील अंतरावरुन दिसते. हडप्पा ते मोहंजदाडो मध्ये ४०० मैलाचे अंतर आहे, ह्यावरुन तो अंदाज सहज यावा. कार्बन डेटिंगनुसार सिंधूसंस्कृतीचा नाशसमय इ. स. पूर्व २३५० असा ठरवला आहे. तर आर्य भारतात इ. स. पूर्व १५०० च्या आधी आले नाहीत असेही हे विद्वान धरुन चालतात. मग हा ८०० ते ९०० वर्षाचा कालावधी कसा भरुन काढायचा हाही प्रश्न उरला आहेच. काही अभ्यासकांच्या मते हाच काल, ज्यात महाभारत झाले. वैवस्वत मनूचा कालावधी इ स पूर्व ३१०० आहे. त्याने प्रलयंकारी महापुरातून वाचवून परत मानवसमाजाची स्थापना केली असे मानले जाते. (शतपथ ब्राह्मण्य १|८|४ काठक संहिता ११|२ ). बायबल वाचले तर हीच कथा बायबल मध्येही आहे.
नॉर्डीक लोकांचा मूळ प्रदेश कोणता हे सांगता येत नसला तरी सध्याचे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी ह्यापैकी भाग ह्यांचे मूलस्थान आहे असे मानले गेले आहे. मध्य जर्मनीत इ स पूर्व ३००० च्या आसपासची भूमितीय तंत्राने घडवलेली अवजारे सापडली आहेत. ती ह्या नॉर्डीक वंशाने निर्मिली आहेत असे मानतात. पण ह्याबद्दल दुमत आहे, कारण रशियाच्या भागात, ह्यापेक्षा पुराणी पण तशीच अवजारे मिळाली आहेत. येथून इंडोयुरोपीय जमाती फुटून निरनिराळ्या भागात गेल्या. त्यांचे दोन भाग झाले इत्ताइत आणि इंडोइराणी. हित्ताइत ही जमात आशियातून मेसोपोटोमियात शिरली. इथे एक तह नमूद करावासा वाटतो तो म्हणजे हित्ताइत जमातीचा राजा व मितन्नी जमातीचा राजा ह्यांमध्ये इस पूर्व १४०० च्या सुमारास झालेल्या तहनाम्यात इंद्र, मित्र, वरुण व नासत्य (अश्विदेव) हया देवांचा निर्देश आहे. ते तहनामे बोधझ्-कोई येथे सापडले आहेत.
देवांचा विषय आहेच तर थोडे पुढे येऊन आर्य व अनार्य देव व वर्णव्यवस्थेकडे वळू.
मध्यसमुद्रीय प्राचीन युरोपियनांमध्ये ( म्हणज पेगन्स, अगदी आजही हे काही देशात आहेत) देवीमातेची पूजा प्रचलित होती. इजिप्तसंस्कृतीमधील उत्खननात क्रीट बेटावर देवीमूर्ती सापडल्या आहेत, त्यांच्यातही देवी पूजा होती व त्या खालोखाल पृथ्वीला माता समजण्याची प्रथा होती. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी भारतात आणल्या. द्यौष्पिता व पृथ्वीमाता स्तवने ऋग्वेदात आढळतात. ( ह्याचा अर्थ असा नाही की ऋग्वेद तिथे तयार झाले. ह्याचा अर्थ असा की संकर निर्माण होत गेला व तत्वज्ञान बदलत गेले). पृथ्वीला आपण अदितीमाता/ आदिमाय म्हणतो, व देवांची निर्मिती तिने केली अशा काही कथा पुराणात आहेत. शिव उमा पूजा संप्रदाय भारतात आहे. क्रीटमधील जन हेच तामिळ (वा दक्षिण भारतीय द्रविड) होत असेही एक अभ्यासू संप्रदाय मानतो.
अधिक माहिती या लिंकवर पहावी - http://www.maayboli.com/node/17558
जिव्हेश्वर.कॉम टिम
टीप - मुळ लेख मायाबोलीवर केदार यांनी प्रकाशित केलेला आहे.