लक्ष्मीपूजन (आश्विन अमावास्या)
१. लक्ष्मीपूजन ………सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे, पण तो सर्व कामांना नाही; म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. `प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णु इत्यादि देवता व कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधि आहे. या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्यांच्याप्रीत्यर्थ प्रत्येकाने आपापल्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करावी व सर्वत्र दिवे लावावे, असे सांगितले आहे. लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादि देवतांना लवंग, वेलची व साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवितात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादि पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. (हातातील पलिता दक्षिण दिशेकडे दाखवून पितृमार्गदर्शन करतात.) ब्राह्मणांना व अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. पुराणांत असे सांगितले आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान्, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.'
२. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व कुबेर यांची पूजा का करतात ?
कोजागरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन सांगितले आहे, तर या अमावास्येस लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे. अनेकांना पैसे मिळविण्याची कला साध्य आहे, पण तो राखावा कसा हे माहीत नाही; किंबहुना पैसा मिळविण्यापेक्षा तो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. खर्च कसा करावा हे अनेकांना कळत नाही, त्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. कुबेर ही देवता पैसा कसा राखावा हे शिकविणारी आहे, कारण तो धनाधिपति आहे; म्हणून या पूजेकरता लक्ष्मी व कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात. या पूजेत धने व साळीच्या लाह्या वहावयाच्या असतात; त्याचे कारण धने हा धनवाचक शब्द आहे. लाह्या हे समृद्धीचे प्रतीक आहे. थोड्याशा साळी भाजल्या की त्याच्या ओंजळभर लाह्या होतात. लक्ष्मीची समृद्धी असली पाहिजे म्हणून समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाह्या वहातात.
३. अलक्ष्मी नि:सारण गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले पाहिजेत; तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला लक्ष्मी म्हणतात. त्या केरसुणीने मध्यरात्री घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा, असे सांगितले आहे. याला अलक्ष्मी (कचरा - दारिद्य्र) नि:सारण म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करावयाचे नसते. फक्त या रात्री ते करावयाचे असते. कचरा काढतांना सुपे व दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.