'स्वकुळ साळी ज्ञातिगृह, श्री क्षेत्र आळंदी: गौरव शाली इतिहास

Share

'स्वकुळ साळी ज्ञातिगृह, श्री क्षेत्र आळंदी: गौरव शाली इतिहास' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे . पुस्तकाचे संपादन लालबाग सारख्या कादंबरीचे लेखक श्री आदिनाथ हरवंदे यांनी केले असून स्वकुळ साळी ज्ञातिगृह , श्री क्षेत्र आळंदी , जि. पुणे यांनी प्रकाशन केले आहे . त्यामध्ये विविध अभ्यासपूर्ण लेख असून माझा ' वारी : आज , काल आणि उद्या " हा लेख सामावि स्ट करणेत आलेला आहे .

संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले आणि भगवदभक्तीची लाट प्रचंड वेगाने उसळून समाजाच्या सर्व स्तरात पसरली . शतकानु शतके चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे सर्वसामान्य लोकांना , स्रियांना हि बंद असलेला भक्तीचा मार्ग खुला झाला आणि विविध जाती-धर्मातील भक्त कवीचा , संतांचा उदय झाला. हे सर्व संत,भक्त कवी संत ज्ञानेश्वर माउलीच्या संतमेळ्यात सामील झाले . त्यामध्ये संत नामदेव , संत तुकाराम, संत एकनाथ , संत गोरा कुंभार , संत सावता माळी, संत नरहरी सोनार , संत सेना न्हावी , संत चोखामेळा , संत साळोबा साळी आदि विविद जातीतील संत सहभागी झाले . देवाच्या महाव्दारा पर्यंत का होईना अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापना झाली . ऐहिक जीवनात कर्तव्यकर्म करीत असतानाही काया, वाचा , मने ईश्वर भक्ती करता येते . अशी भक्ती करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे , हे ज्ञानेश्वर माउली नी सांगितलेला विचार व कार्य पुढे संत साळोबा साळी , संत रामानंद साळी , संत साळी बाबा उर्फ लहरीनाथ महाराज आदि संतानी मोठ्या निष्ठेने चालविले .
 

वैकुंठीचा देव आणिला भूत ळा !  धन्य तो आगळा पुंडलिक !!  संत तुकाराम


मातृपितृ सेवक , भक्त श्रेष्ट पुंडलिकाच्या परम भक्ती मुळे पंढरीस येणाऱ्या सर्व भक्त जनांच्या उद्धारासाठी युगानुयुगे कर कटेवरी ठेवून श्री विठ्ठल उभे आहेत . अशा पंढरीची थोरवी वर्णिताना संत तुकाराम महाराज म्हणतात की,  पंढरीची वारी आहे माझे घरी ! आणिक न करी तीर्थव्रत !! पंढरपूर ची वारी हा माझ्या घराचा नित्यनेम असल्यामुळे मला तिर्थादी व्रत वैकल्ये करण्याची गरज नाही, असे ते म्हणतात .
 

आवडे देवासी तो ऐक प्रकार नामाचा उच्चार रात्रदिन !! १ !!
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा !! २ !!
आषाढी कार्तिकी  पांढरीची वारी ! साधन निर्धारी आन नाही !! ३ !!
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम ! तो देवा परमपूज्य जगी !! ४ !!


ज्यांनी  वारकरी संप्रदायाची दिक्षा घेऊन तुलसी माळ व गोपी चंदनादी द्वादश मुद्रा धारण केली आहे , जो शुद्ध सात्विक आहार , अहिंसा दि नियमांचे व वारकऱ्यांच्या दै नंदिनीचे पालन करीत आहे ; ज्याचे दैवत प्रेम मूर्ती श्री विठ्ठल व कुलाचार म्हणजेच नाम स्मरण आहे तसेच आळंदी -पंढरीच्या वारीचा नियम व ज्ञानेश्वरी-तुकारामांची गाथा प्रमाण मानणाऱ्या व भक्ती प्रेमाने प्रेरित झालेल्या व्यक्तीस वारकरी म्हणतात.

पंढरपूरचा पांडुरंग हे महारा ष्ट्राचे लाडके दैवत आहे. सर्व संत हे पांडुरंगाचे भक्त होते , ते नेहमी पंढरीची वारी करीत असत. संत तुकाराम महाराज म्हणतात ,

होय होय वारकरी ! पाहे पाहे रे पंढरी !

जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही एकवेळ पंढरीस वारकरी म्हणून जा.

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते !
कोण बोलविते हरिविण !
देखवी ऐकवी एक नारायण !
त्याचे भजन चुकवू नका !!

शुभ्र कपडे परिधान केलेल्या , तेज: पुंज ललाटावर गोपीचंद नाच उर्ध्वपुंद्र व्दादश मुद्रेचा टिळा किंवा बुक्का , हातात टाळ किंवा एकतारी, गळ्यात तुळशीची माळ, अंगभर वस्र घेतलेल्या महिलांच्या डोक्यावर तुळसी वृंदावन , संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेली पालखी , चोपदाराचे नियंत्रण आणि मुखात ज्ञानेश्वर माउली व इतर संतांचा जयघोष करीत शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असलेली दिंडी , संत साळीबाबा उर्फ लहरीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली थंडीवार्याला न जुमानता नियमित निघत असे .

वारी म्हणजे मराठी संस्कृतीचा जणू मेरूदंडच होय. वारी हे एक समूह्तत्वाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. वारी म्हणजे श्री विठ्ठलाच्या पायापर्यंत भक्तीमार्गाने सर्व समाजाला घेऊन  जाणारी, मानवी जीवन उन्नत बनविणाऱ्या मुलभूत जीवनमूल्याचे जागरण . वारी म्हणजे संतांनी घालून दिलेले ईशसेवामय जीवन व्यतीत  करण्याचे व्रत घेणे होय.

विविध ठिकाणांहून शेकडो भाविक वारकरी मंडळी दिंडीत सहभागी होतात. टाळ, मृदुंग वाजवत, वैष्णवी पाऊले टाकत आणि मुखाने नामस्मरण करत वाटचाल करतात . २५-३० दिवस संसाराची चिंता विसरून भजनरंगात रंगलेले आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, शुशिक्षित-अशिक्षित, सर्व स्तरातील वारकरी उन-पावसाची नि प्रकृतीची पर्वा न करता, मजल दरमजल पायी प्रवास करून वारीचे पुण्य संपादन करतात .

कालची       
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. त्या परंपरेचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. पुढे संत एकनाथ महाराजांनी वारीची परंपरा मोगल राज्यकार्तांच्या संकटग्रस्त काळातसुद्धा चालविली. नंतर हैबतीबाबा यांनी संत ज्ञानेश्वर माउलीच्या पादुका गळ्यात अडकवून, ४-५ वारकऱ्यांसह खंडित झालेली वारी पुढे कार्यान्वित केली. पूर्वीचे काळी वारीसाठी अत्यंत कष्ट सहन करावे लागत असे. अरुंद रस्ते, त्यात पाउस पडला की चिखलातून जावे लागत असे. मजल दर मजल करीत प्रवास करताना विसाव्यासाठी जागा मिळत नसे. त्यामुळे स्वहस्ते स्वयंपाक करताना फार हाल होत असत. यात्रेच्या गावी मोठमोठ्या धर्मशाळा नसल्यामुळे मुक्कामाची असुविधा जाणवत असे. घरांमध्ये किंवा मठांमध्ये यात्रेकरूंना उतरणे भाग पडत असे. त्यावेळी अरुंद गल्ली-बोळ घाणीने भरलेले. कॉलरा सारख्या रोगराईची भीती असायची. सार्वजनिक आरोग्य ( शौचालये, स्नानगृहे वगेरे) सुविधेचा अभाव असायचा. नगरपालिका यात्राकर आकारीत असे व त्या तुटपुंज्या उत्पन्नातून यात्रा खर्च भागवीत असे. जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजाराचा फटका यात्रेकरूस बसत असे. हे थोडे म्हणून कि काय देवाचे मध्यस्थ (पुजारी) हे यात्रेकरूंस पुराणातील भयाचा बागुलबुवा दाखवून, वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, अनावश्यक व अवाजवी दक्षिना घेत असत. अशा विविध संकटातून वारीचा मार्ग प्रवाहित होत असे. भगवंताच्या दर्शनाचे सुख प्राप्तीसाठी निघालेली वारी २० व्या शतकात सुखकारी बनली .

वारी आजची
 महाराष्ट्रात १९८० नंतर रस्ते रुंद झाले. शाशानाने नगरपालिकांना यात्रेनिमित्त अनुदान देण्यास प्रारंभ केला. वाहतुकीच्या सोयी सवलती वाढल्या. पायी चालणाऱ्या वारीसोबत आता बैलगाड्या, ट्रक्टर, टेम्पो यांचे साहाय्य मिळू लागले. वृद्ध, आजारी व ज्यांच्या नेतृत्वाखाली पायी वारी निघते ते हरिभक्ती परायण (ह.भ.प.) आता वाहनातून वारीसोबत प्रवास करू लागले. रस्त्यावरील गावात वारीचे भव्य स्वागत, मानसन्माना बरोबरच अल्पोपहार, मिष्टान्नासह भोजन व निवासाची व्यवस्था होऊ लागली. आरोग्याची काळजी वारकरी स्वत: घेत असल्यामुळे लस प्रतिबंधकांचा जाच टळला. तरीही शासनातर्फे तसेच विविध मंडळातर्फे वैद्यकीय पथके, पाण्याच्या टाक्या वारीच्या सेवेसाठी असतात. मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी प्रवचने व रात्री हरीकीर्तनाचे सुसज्ज आयोजन करण्यात येऊ लागले. यात्रेच्या गावी मोठमोठ्या धर्मशाळा, मठ, मंदिरे, लॉजेस, इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे निवासाची असुविधा टळली. गावातील आरोग्य व स्वच्छतेची व्यवस्था सुधारली. बंधारे , धरणांमुळे यात्राकाळात पाण्याची गैरसोय टळली. सेवाभावी संस्थांकडून अन्नदानाचे कार्य चालू असताना सुद्धा शासन कर्तव्यबुद्धीने यात्रेकरूंसाठी रॉकेल, दुध यांचा पुरवठा करीत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार थांबला. दर्शन व्यवस्थेतही अमुलाग्र बदल होत असून, रांगेत सर्वांना विनासायास देवदर्शनाचा लाभ मिळत आहे. दक्षिणेवर थोडासा वचक आला असून देणगी देण्याकडे कल वाढत आहे .
   वारी आजची वारी हि पूर्वी आजही यात्रा किंवा सहल नसून ती चिंतनातून, भजनातून, नादातून तल्लीन होऊन अंतरंग प्रकाशमान करणारी लोकशाळा आहे, असे संत साळीबाबा म्हणत असत.त्यासाठी ते संत तुकाराम महाराजांचे प्रमाण देत असत की वारी म्हणजे संतांची मांदियाळी, प्रेमाचा उमाळा, भक्तीचा जिव्हाळा, मुक्तीचा सोहळा असून हि आमच्या घराण्याची मिराशी (परंपरा) आहे.

संत साळीबाबा व वारी :
ब्रह्मलीन सदगुरू साळीबाबा यांना लहरीनाथ महाराज अशाही नावाने ओळखले जाते.  त्यांचा जन्म देववस्र निर्माण करणाऱ्या साळी समाजात, बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ वेलंग (ता. शिरूर) येथे कार्तिक शुध्द सप्तमी सन  १९२४ शुक्रवार रोजी झाला, तर त्यांचे वैकुंठगमन दि. ११ मार्च २००० शनिवार रोजी मनमाड येथे झाले.त्यांनी मठ, मंदिर कोठेही निर्माण केली नाहीत. परंतु त्यांच्या शिष्यांनी त्रंबकेश्वर येथे मठ निर्माण केला. तसेच नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर, मनमाड, मालेगाव व अहमदनगर जिल्ह्यात भोकर (श्रीरामपूर) येथे मंदिरे निर्माण केलेली आहेत. संत साळीबाबांचे मूळ नाव लक्ष्मण वामनराव कांबळे होते, तर मातेचे नाव तुळसाबाई होते. साळीबाबा हे आनंद संप्रदायातील केरोबा महाराज यांचे शिष्य होते.  संत साळीबाबा यांची  समाधी मनमाड (बुधलवाडी) येथे आहे.   
 
साळीबाबांच्या चेहऱ्यावर सात्विकतेचे तेज होते. देहयष्टी किरकोळ होती. परंतु मनाची विशालता भव्यदिव्य होती. निमगोरा वर्ण. वाढलेली दाढी. डोक्यावरून मागे लोब्णारे केस. पांढरे धोतर किंवा पंचा. पांढराच सदरा. डोक्यावर भगवा फेटा. कपाळावर गंध किंवा बुक्का. डोळ्यात कमालीची करुणा असे. 
     
मंदिर, मठ, शाळा, धर्मशाळा, खाजगी घर, पडवी, अंगण , मैदान, मंडप या पैकी कोणत्याही ठिकाणी रात्री ' रामकृष्ण हरी 'च्या मत्रोच्चाराने ते कीर्तनाची किंवा प्रवचनाची सुरुवात करीत.    अंधश्रधेवर घणाघाती हल्ला करून प्रबोधन करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि भक्ति व् समतेचा वसा घेतलेला वारकरी संप्रदाय यांच्या विचारसरणीचा त्यांच्या कीर्तनात समन्वय असल्यामुले  श्रोतूवर्ग तल्लीन होत असे.  संत  साळीबाबाच्या दर्शनाने व सहवासाने शिष्य मंडळी कृतकृत्य होउन जात असे. त्यांची शिष्य मंडळी मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रात विविध ठिकाणी असून नाशिक व नगर जिल्ह्यात बहुसंखेने आहे. संत साळीबाबांच्या  कृपशिर्वादाने व त्यांच्या शिष्यांच्या नेतृत्वाखाली आजही विविध ठिकाणाहून गेली अनेक वर्षापासून पायी वारी निघत आहे.
 

सोयगाव (मालेगाव जि. नाशिक) ते त्रंबकेश्वर पायी दिंडी ३२ वर्षापासून निघते. 
शिंगवे  (ता. चांदवड जि. नाशिक) ते त्रंबकेश्वर पायी दिंडी ३४ वर्षापासून निघते. 
मनमाड  (ता. नांदगाव जि. नाशिक) ते पंढरपूर पायी दिंडी १० वर्षापासून निघते. 
शिंगवे  (ता. चांदवड जि. नाशिक) ते पंढरपूर पायी दिंडी २० वर्षापासून निघते. 
निंबायती (मालेगाव जि. नाशिक) ते पैठण पायी दिंडी ३३ वर्षापासून निघते. 
अस्तगाव, मनमाड  (ता. नांदगाव जि. नाशिक) ते पैठण पायी दिंडी २१ वर्षापासून निघते.
भोकर (ता.श्रीरामपुर जि .नगर ) ते पैठण पायी दिंडी १० वर्षापासून निघते.
शिंगवे  (ता. चांदवड जि. नाशिक) ते पैठण पायी दिंडी २० वर्षापासून निघते.
कुसमाडी-चिचोंडी ( ता . येवला जि. नाशिक) ते सासवड १७ वर्षापासून निघते.


वागदडी (ता. चांदवड जि. नाशिक) ते मुक्ताईनगर पायी दिंडी २ वर्षापासून निघत  असून श्रीक्षेत्र आळंदीची पायी वारी निघत नाही. मात्र साळीबाबा हे अनेक वेळा आळंदी येथे दर्शनासाठी आले असताना त्यांनी स्वकुळ साळी धर्मशाळेची माहिती सोबतच्या शिष्यांना दिल्याची आठवण बाबांचे शिष्य ह.भ.प.निवृत्ती महाराज बोरसे (नाना), शेवाळे उर्फ माउली महाराज, भोसले महाराज, वाजे महाराज सांगतात. 

भविष्यातील वारी
वारीचा कालावधी हा सर्वसाधारणत: शेतीतील पिके निघाल्यानंतरचा असतो. पूर्वी ग्रामव्यवस्थेत निवास करणारे साळीबांधव वारीत पायी येत असत. परंतु साळी समाजाचा वंश परंपरागत व्यवसाय विणकाम असून तोही आज अस्तंगत झाल्यामुळे साळी समाज नोकरीच्या निमित्ताने शहरात आला. त्यामुळे साळी समाज बांधवाचे वास्तव्य शहरी भागात बहुसंखेने असून नोकरी करणाऱ्यांची संख्या सुद्धा बहुसंख आहे. त्यामुळे पंढरपूर, त्रंबकेश्वर, पैठण, सासवड, मुक्ताईनगर तसेच साळी समाजातील श्रद्धेय संतांच्या समाधीस्थळी उदा. साळीबाबा (मनमाड), झिपरू अण्णा महाराज (नशिराबाद जि. जळगाव ), नरसिंह अवधूत स्वामी (नारायणपेठ, आंध्र प्रदेश) आदि ठिकाणी किंवा आळंदी येथील स्वकुळ साळी ज्ञातिगृहाच्या वर्धापन दिनाचे निमिताने पायी जाणे आता जवळजवळ असंभवनीय ठरते. त्याऐवजी संतांच्या  प्रकटदिनाचे दरम्यान किंवा पुण्यतिथीचे दरम्यान, तसेच ज्ञातिगृहाचे वर्धापनदिनाचे दरम्यान, सलग २ ते ३ दिवसांची सुट्टी आली तर साळीबांधव वातानुकूलित बसव्दारे येतील. नियमित ब्रन्डेड कंपन्यांची उंची व तलम वस्रे परिधान केलेले पुरुष, वारीमध्ये धोती पन्ड घालून,  कपाळावर अष्टगंध किंवा बुक्का लावून, तर बॉयकट किंवा स्टेपकट केलेल्या नऊवारी साडीच्या ऐवजी पंन्ट घातलेल्या स्रिया वारीच्या सुरुवातीच्या प्रवासातील गावातून व शेवटच्या गावातील रस्त्यावरून टाळ-गजरांच्या जयघोषात वारीमध्ये सामील होतील. ह्या प्रवासाचे नियोजन आधुनिक साधनांव्दारे करण्यात येईल. इंटरनेटवरील व्हीडीओ कॉन्फरंसव्दारे मिटिंग करण्यात येईल. वारीच्या मार्गाची आखणी, संभाव्य खर्चाचा अंदाज, टेंट हाउस मधील मुक्कामाची व्यवस्था, ग्रामीण भोजनाचा स्वाद तसेच प्रवासातील चढणे व उतरण्याची ठिकाणे, ज्येष्ठांचे अनुभव यांची चर्चा करण्यात येईल. ई-पेमेंटव्दारे वर्गणी दिली जाईल. तसेच गावातील काही धार्मिक व श्रद्धावान लोक यात्रेकरूसाठी रोख रक्कम देतील. त्यांना देवस्थानाची पावती आणून देण्याची जबाबदारी यात्रेकरूकडे असेल. बसमद्ये वारकरी किंवा सांप्रदायिक भजनांची माहिती असलेले वारकरी कमी असल्यामुळे, दृकश्राव्य व ध्वनिमुद्रित सीडीवर गरज भागविली जाईल. तसेच नाशिक येथील भगवान श्री जिव्हेश्वर स्वाध्याय केंद्र किंवा अमरावती येथील जिव्हेश्वर सेवा केन्द्रामार्फत प्रकाशित भगवान श्री जिव्हेश्वर, साळी संत तसेच साळी समाजावरील गीतांचे गायन बसमध्ये साळी बंधू-भगिनी करतील. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर तसेच आंध्र प्रदेश, गुजराथ, कर्नाटक, मध्य प्रदेश आदि ठिकाणाहून आलेल्या समाज बांधवांचा एक सामाजिक मेळावाच दरवर्षी भरत जाईल. उच्च विद्याविभूषित व समाजसेवी कार्यकर्त्यांचे  या निमित्ताने एक जाळे विणले जाईल. त्यातून सामाजिक कार्याबरोबरच हुशार विद्यार्थ्याच्या आर्थिक अडचणीवर चर्चा करण्यात येईल. हे  उच्च विद्याविभूषित वारकरी आपल्या वारीमध्ये साळीबांधवा बरोबरच इतर समाजातील भाविकांना भगवान श्री जिव्हेश्वर, साळी संतांचे कार्यं यांची माहिती देऊन, त्यांच्या श्रद्धा साळी संतांविषयी वृध्दिंगत करतील      तर आर्थिक विवंचनेत असलेल्या  बांधवाची वारी कशी असेल ?तुटपुंज्या पगारावर गुजराण करणारा सुशिक्षित वर्ग, रोजच्या  विवंचनांपासून थोडेसे दूर जाण्यासाठी पायी वारीने आळंदीला, पंढरपूरला येईल. शहरी भागातील लोक पूर्वीपेक्षा आज पायी प्रवासाला जास्त महत्व देतात. परंतु ते फक्त मोर्निग वाक पुरतेच!  त्यामुळे हे बांधव थोड्या अंतराची पायी दिंडी काढतील. उदा. पुणे ते आळंदी, नाशिक ते त्रंबकेश्वर, अहमदनगर ते पैठण, औरंगाबाद ते पैठण, येवले ते मनमाड (साळीबाबांचे समाधी स्थळ ) अशी पायी वारी निघेल. ह्या दिंडीची वाहन व्यवस्था, अल्पोपहार, भोजन, निवास व्यवस्था पारंपारिक दिंडी प्रमाणेच राहील. त्यामुळे त्यांचे स्वागत साळी बांधव आपल्या गावात मोठ्या उत्साहात करतील. त्यांच्यामध्ये नियमित सुसंवाद राहील. ह्या दोन्हीही पायी वारीचे ध्येय एकच असल्यामुळे त्यांच्यातील आनंद हा अवर्ननीय असेल.

आज शिर्डीचे साईबाबा, लालबागचा राजा, अष्टविनायक, शनि-शिंगणापूर अशा धार्मिक स्थळांना चित्रपट, क्रिकेट, औद्योगिक व राजकीय क्षेत्रातील नामवंत- प्रसिध्द व्यक्ती आदींनी दर्शनासाठी भेटी दिल्यामुळे हि देवस्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली. त्याचप्रमाणे साळी समाजातील सेलिब्रिटिनी, उच्च सनदी अधिकाऱ्यांनी, पंच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या धार्मिक स्थळावर नितांत श्रद्धा ठेवून स्थळांना नियमित भेटी द्यावीत. संत साळीबाबानी एका कीर्तनात वारीचा मूळ अर्थ सांगताना आनंदाचा शोध कोठे घ्यावा याबाबत केलेले मार्गदर्शन अत्यंत मार्मिक आहे . ते म्हणतात, की पैसा हे आनंद मिळवण्याचे अंतिम साधन नाही. आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. तो बहुधा छोट्या छोट्या गोष्टीत सुध्दा असतो. लहान मुलांच्या अपेक्षा मर्यादित असतात, त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद मिळविता येतो. त्याचमुळे आपण लहानपण देगा देवा ! अशी याचना देवाकडे करतो.

आनंद हेच आनंदाचे निधान  आहे . कस्तुरीमृग जसा आपल्याच बेबीतील कस्तुरीच्या  सुगंधाने वेडावून जाऊन सैरावैरा पळून कस्तुरी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रमाणे माणसे सुध्दा आपला आनंद आपल्यातच सामावलेला आहे हे विसरून, सिनेमातील-जाहिरातीतील आनंदाच्या व्याख्या खऱ्या मानून, स्वत: पासून दूर जात, खऱ्या आनंदापासून वंचित राहतात. तुझे आहे तुझपाशी ! परी तू जागा चुकलाशी ! हे विसरतात. आनंदाचा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा. आनंदाचे उधिष्ट ठेवणारा समूह वारीच्या निमित्ताने एकत्र येतो. हा समूह १०-२० दिवस एकत्र येऊन विशेष काय होणार आहे ? त्याऐवजी कायम, जीवाभावाने एकत्र राहणारा समूह निर्माण व्हावयास पाहिजे. आज डॉक्टरला बायको  डॉक्टरच हवी आहे. तर कॉम्पूटर इंजिनिअरला  कॉम्पूटर क्षेत्रातीलच मुलगी हवी आहे. शिक्षिकेला शिक्षण क्षेत्रातील वर हवा आहे. हि काय आनंदाची साधने आहेत ? त्याऐवजी शाकाहारी कुटुंबासाठी शाकाहार करणारी वधू हवी. संत ज्ञानेश्वर माउली, भगवान श्री जिव्हेश्वर यांच्यावर श्रद्धा असलेल्या वधूवरांची जोडी निर्माण झाल्यास घरात आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होतील. चांगल्या कार्याला सदैव मदत मिळेल. उपेक्षित, वंचिताना आधार मिळेल. अशी घराशेजारी घरे, गल्ली शेजारी गल्ली, शहरांशेजारी शहरे निर्माण झाली की सर्वत्र आनंदच आनंद असेल ! 

लेखन :
श्री. जगन्नाथ नारायण एलगट
जिव्हेश्वर कृपा , एन -८ / ई-१ / २१ /१ ,
गणेश चौक, सिडको , नाशिक ४२२००९

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...