आनंदी जीवनाचा मार्ग..! भाग - १

Share

आपल्या संवयी, आपलं वर्तन,आपली विनयशीलता,आपली परोपकारी वृत्ती,लोकाभिमुखता इत्यादी, या गुणावर आपण लोकांना किती आवडतो हे ठरत असतं.याच गुणांमुळे लोक आपल्याकडे आपोआप आकर्षित होत असतात. हे सर्व अंगी बाणवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, जाणीवपुर्वक अभ्यास करावा लागतो आणि तोच खरा राजमार्ग असतो आनंदी जीवनाचा!
विद्या विनयेन शोभते ! योगः कर्मसु कौशलम ! सत्यं वद, प्रियं ब्रुयात,सत्यमप्रियं न ब्रुयात इ. आपण वाचतो, अभ्यासतो आणि नेमकं आत्मसात करायचं मात्र राहून जातं. आनंदी जीवनासाठी अशा बर्याच गोष्टी आपण आत्मसात करणं आवश्यक असतं. त्याचीच ही मला आवडलेली जंत्री !

१] लक्षपुर्वक ऐकण्याची कला -
आपण चारचौघात असतो तेव्हां दुसर्याचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकण्याची कला आत्मसात केली पाहिजे. स्वतःपेक्षा इतरांच्या विचारांना प्राधान्य दिल्यामुळे आपली पत वाढते हे ध्यानांत घेणे आवश्यक असते. इतरांना नेहमीच उत्तम श्रोता हवा असतो. यामुळे आपल्या आणि इतरांच्या आनंदात भरच पडते. हेच या कलेचं मर्म होय !

२] योग्यता अजमावून कौतुक करण्याची कला -
चांगल्या कामासाठी धडपडणार्यांची दखल घेऊन त्यांचे कौतुक करण्याची कला आत्मसात करावी लागते. अशा प्रत्येकाला आपल्या कष्टाची दखल घेऊन कौतुक केलेले आवडत असते. इतरांच्या आनंदातच आपलाही आनंद सामावलेला असतो हे याचे मर्म!

३] गरजुंना सदासर्वकाळ सहज उपलब्ध असणं -
आपण गरजुंना केव्हांही उपलब्ध असलं पाहिजे. असं झालं तर लोक आपल्याला सदैव स्मरणात ठेवतात. आपण नेहमी सकारात्मक व सहनशील असणं, आपले आचारविचार पारदर्शक असणं आवश्यक असतं. ”मनाचे-श्लोक” हेच सांगतात. जीवनातील निर्भेळ आनंदाचं मर्म हेच होय असं मला वाटतं!

४] वृथा बढेजाव,फुशारकी मारण्याची संवय टाळायला शिकणं -
तुमचं पाणी जोखण्याची एक सुप्तशक्ती / कुवत लोकांच्या अंगी असते. इतरांनी मारलेला वृथा बढेजाव किंवा फुशारक्या आपल्याला आवडत नसते तसंच आपला वृथा बढेजाव किंवा फुशारकी इतरांना आवडत नसते.तेव्हां आपणही हे जाणीवपुर्वक टाळायला शिकणं आवश्यक असतं. आपल्या मनाला विचारून पाहिलं म्हणजे यांचं मर्म ध्यानात येतं !

५] नामोल्लेख फार महत्वाचा -
लोकांना आपलं नाव,गाव फार प्रिय असतं, तेव्हा जेव्हां केव्हां भेट होईल किंवा योग येईल तेव्हां त्यांच्या नावागावाचा आवर्जुन, आदरपुर्वक पण स्पष्ट उल्लेख करायची कला आत्मसात करणं फार गरजेचं असतं.तसंच आपलं म्हणणं सुस्पष्टपणे मांडून जाणीवपुर्वक आठवण ठेऊन केलेल्या नामोल्लेखामुळे संबंध दृढ होऊन आनंद द्विगुणित होण्यास मदत होते हे याचे मर्म !

६] संभाषणा दरम्यान सकारात्मक प्रतिसाद द्यायला शिकणं-
इतरांशी संभाषण चालू असतं तेव्हा आपण उत्तम श्रोता बनून त्यांची बोली,हावभाव,हालचाली इ.स्वीकारून प्रतिसाद द्यायला शिकणं हे मोकळं आणि खॆळीमेळीचं वातावरण निर्माण होण्यास उपयुक्त ठरतं. अतिशय आनंदात संभाषण पार पडणं हे याचं मर्म ! [ अतिशय कठिण अशी ही कला आत्मसात केली तर आपल्यासारखा सुखी आणि आनंदी दुसरा कॊणी नसतोच असं मला वाटतं]

७] मदत हवी असल्यास मागणे आणि मागितल्यावर ती देणे -
आपण कामात कितीही व्यग्र असलो तरी लोकांना मदतीची गरज असेल तेव्हा ती आनंदाने देण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि आपल्याला जेव्हां मदतीची गरज असेल तेव्हा ती आपण मागितली पाहिजे.मदत करणारी व्यक्ती नेहमी लोकांना हवीहवीशी वाटत असते हे यातील आनंदाचे मर्म!

८] आपलं म्हणणं सुस्पष्ट पण इतराना न दुखावता मांडण्याची कला -
आपण अगम्य असं काही बोलत राहिलो तर ते लोकांना उमगत नाही. आपलं म्हणणं काय आहे त्याचं आकलन न झाल्यामुळे विनाकारण गोंधळ होऊन संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण होते.म्हणून सुस्पष्ट पण इतरांचं मन न दुखावता म्हणणं माडण्याची कला आत्मसात करणं आवश्यक असतं.अनाकलनीय संभाषण टाळून, विचारांचे आदानप्रदानाद्वारे मिळणारा निखळ आनंद हे याचं मर्म !

९] खोटं बोलण्याचं टाळायला शिकणं -
खरं बोलावे असं नेहमीच सांगितलं जातं. अप्रिय सत्य पण न बोलणं हे जसं महत्वाचं अगदी तसंच खोटं बोलण्याचं टाळायला शिकणं हे फार महत्वाचं असतं. अनेकदा खरं बोलणं खूप ताणलं जाऊन त्याचं रुपांतर केव्हा मिथ्या गोष्टित होतं हे कळत नसतं. हे टाळता आलं पाहिजे.खोटं बोललेलं लोकांना आवडत नसतं, अगदी आपल्याला सुद्धा ! मोजकं, नेमकं आणि लोकांना रुचेल असं खरं तेव्हढचं बोलायला आपण शिकलं पाहिजे.सत्य आणि मितभाषीपणा यामुळे निर्माण होणारा आनंद हेच याचं मर्म!

१०] नेहमी ”कृपया” आणि ”आभारी आहे/आहोत” याचा संभाषणात वापर करायला शिकणं -
हे दोन शब्द म्हणजे आपल्या संभाषणातील तसंच लिखाणातीलसुद्धा अत्यंत महत्वाची साधनं होत. जाणीवपुर्वक या दोन शब्दांचा आपल्या संभाषणांत ’वापर करायला शिकणं’ हे आवश्यक ठरतं. या दोन शब्दांच्या उपयोगामुळे गंभीर संभाषणही आनंदपर्यावसायी होऊ शकते. या दोन शब्दांमुळे आपला सुसंस्कृतपणा दिसून आनंदी वातावरणाची निर्मिती होणं हे याचं मर्म !

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
लेखन - श्री.पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या सावधान या ब्लॉग मधून साभार. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला जरुर द्याव्यात.

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...