आनंदी जीवनाचा मार्ग...! भाग - 2

Share

आनंदी जीवनाचा मार्ग” या लेखाच्या १ल्या भागात आपण १० कलांची माहिती करुन घेतली. त्या दहा कला म्हणजे १]लक्षपुर्वक ऐकण्याची कला-२] योग्यता अजमावून कौतुक करण्याची कला—३] गरजुंना सदासर्वकाळ सहज उपलब्ध असणं—४] वृथा बढेजाव,फुशारकी मारण्याची संवय टाळायला शिकणं—५] नामोल्लेख फार महत्वाचा— ६] संभाषणा दरम्यान सकारात्मक प्रतिसाद द्यायला शिकणं—७] मदत हवी असल्यास मागणे आणि मागितल्यावर ती देणे— ८] आपलं म्हणणं सुस्पष्ट पण इतराना न दुखावता मांडण्याची कला— ९] खोटं बोलण्याचं टाळायला शिकणं—१०] नेहमी ”कृपया” आणि ”आभारी आहे/आहोत” याचा संभाषणात वापर करायला शिकणं-.
आता यापुढील दहा कलांची माहिती करून घेऊया.
११] सकारात्मक भाषा वापरण्याची कला -
आपली भाषा आणि देहबोली या दोन्हीद्वारे आपल्याला मदत करण्यात आणि संरचनात्मक कार्यातच आनंद वाटतो हे दिसले पाहिजे. संभाषणादरम्यान डोळ्यास डोळा भिडवून, आत्मविश्वासाने, हसतमुखाने,किंचित करपल्लवीचा आधार घेत आणि इतरांची दखल घेत बोलण्याची कला आत्मसात करणं आवश्यक असतं. आपल्या आवाजाची पातळी शक्य तितकी खाली पण समोरच्या लोकांना ऐकू येईल इतकी उंच ठेऊन, मुद्देसूद आणि सकारात्मक ठेऊन पण आपल्याला बोलण्याची संधी दिल्यावर संभाषणाची सुरुवात करण्यास शिकणं आवश्यक असतं. सकारात्मक भाषा आणि निर्भेळ देहबोली हे यातील आनंदनिर्मितीचे मर्म !

१२] सुहास्य वदन किंवा हसतमुख ठेवण्याची कला -
हसतमुखाने केलेलं स्वागत लोकांना नेहमीच आवडतं. हे हास्य आपल्या डोळ्यातसुद्धा दिसणं आवश्यक असतं.सुहास्य वदन हेच आनंदाचे निधान हे याचं मर्म ![सहजच ”सुहास्य तुझे मनास मोही--”गीताची आठवण होते]

१३] माहिती नसल्यास मौन पाळण्याची कला -
सर्वच गोष्टी आपल्याला ठाऊक असतात असं नव्हे आणि ठाऊक असल्याच पाहिजेत असं ही नाही.अशा वेळी मौन पाळून केवळ कानसेन होणं हिताचं असतं. ”मौनं सर्वार्थ साधनम्” म्हणजे हेच. प्रयत्नपुर्वक ही कला आत्मसात करणं आवश्यक ठरतं. मौन धारण करून श्रोता होणं हे यातल्या आनंदामागचं मर्म होय!

१४] पुढच्यास ठेच मागचा शहाणा -
चुकणं हा मनुष्य़धर्म आहे. हे ध्यानात घेऊन आधीच्या लोकांनी केलेल्या चुका टाळण्यास शिकणं आवश्यक असतं.अभ्यासपुर्वक त्रुटी शोधून सुधारणा करणार्याची वाहवाच जगात होत असते. आपल्याकडून झालेल्या चुकांची मनमोकळेपणाने कबुली देत आधीच्या लोकांनी केलेल्या चुका टाळून पुढे जाण्याची कला साधणं हे यातल्या आनंदामागचं मर्म होय!

१५] लहानथोर अशा सर्वांचा मान राखायला शिकणं -
मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! ही शिकवण अंगी बाणवणं अत्यंत महत्वाचं असतं. आई-वडील,गुरुजन या सर्वांचा मान तर राखावाच पण लहानग्यांचा सुद्धा मान राखायला आपण शिकलं पाहिजे. [महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूरकडची माणसं आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशीही अत्यंत आदराने ”अहो-जाहो” हे संबोधन वापरून संभाषणास सुरुवात करतात,त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे.आपले हे चांगले संस्कार आपण विसरता कामा नये.] लहानथोरांचा योग्य मान राखण्याची कला अंगी बाणवणं हेच यातील आनंदामागचं मर्म होय !

१६] डोळ्यास डोळा भिडवून संभाषण करण्याची कला -
डोळा हा एक असा अवयव आहे कि यातून सर्व भाव-भावना व्यक्त करता येतात. समोरच्या व्यक्तीबद्दल जिव्हाळा, माया, प्रेम, राग इ.सारे षट्विकार–भावना डॊळ्यामधून व्यक्त करता येत असल्याने ही कला नीट आत्मसात करणं आवश्यक असतं. आपल्याबद्दल विश्वास, आदर निर्माण होण्यास आणि वैचारिक आदानप्रदानास चालना देणे यामुळे शक्य होत असतं. मात्र दुसर्याच्या डोळ्यात एकटक पाहण्यामुळे आपण उद्धट, अहंकारी असल्याचा संदेश समोरच्याला मिळत असतो. तेव्हा हे टाळता येणं आवश्यक असतं. जिव्हाळा,प्रेम,आदर, विश्वास अशा सकारात्मक भावनांचा परिपोष होणं हे यातील आनंदामागचं मर्म होय!

१७] आश्वासनांची खैरात टाळून शक्यतोवर जास्तीत जास्त देण्याची कला -
आपल्याला उगीचच भल्यामोठ्या आश्वासनांची खैरात करायची सवय असते. प्रत्यक्षात ते पुर्ण करता येत नसतं. त्यामुळे आपली विनाकरणच नाचक्की होऊ शकते. अशी आश्वासने देण्याचं टाळून जेवढं शक्य असेल तेव्हढं मनापासून द्यावं.दुसर्यास जास्तीत दॆण्याची कला आत्मसात करून त्याद्वारे निर्माण होणारा आनंद हे याचं मर्म!

१८] श्रध्दानिष्ठ राहण्याची कला -
आपल्या श्रद्धा इतरांवर न लादता,त्यांचा गवगवा न करता त्यांचं पालन आपल्याला करता येणं आवश्यक असतं.इतरांनी विचारल्याशिवाय त्याविषयी चर्चा करण्याचं आपण टाळलं पाहिजे. आपल्या जीवनमूल्याप्रती आपली निष्ठा जपली पाहिजे. आणि सदैव नविन अद्ययावत तंत्रज्ञान वा माहिती स्विकारण्याची आपली तयारी असली पाहिजे. आपल्या श्रद्धानिष्ठ राहण्यामुळे निर्माण होणारा आनंद हे याचं मर्म !

१९] संभाषणादरम्यान माफक करपल्लवीची कला -
दुसर्या व्यक्तीशी संभाषण करत असता हाताची हालचाल मोजकी आणि मर्यादित करण्यास शिकणं आवश्यक असतं. देहबोलीत याचा समावेश होतो. तोंडावर हात ठेऊन बोलणं,जांभया देणं म्हणजे आपल्याला कंटाळा आला असून संभाषणात रस नसल्याचा निष्कर्ष काढला जातो. संभाषण फलद्रुप होण्यासाठी हे टाळता येणं आवश्यक असतं. तसेच संभाषण संपल्यावर हसतमुखाने, आत्मविश्वासपुर्वक व अत्यंत आदरपुर्वक दोन्ही तळहात जोडून कृतज्ञतापुर्वक दुरून नमस्कार करावा आणि निरोप घ्यावा. नमस्कार हा आरोग्यदायक तर हस्तांदोलन हे अनारोग्यकारक! [h1n1,सर्दी इ.चा विचार करता]. आपल्या या सर्व करापल्लवीतून, नेत्रपल्ल्वीतून,देहबोलीमधून निर्माण होणारा निर्व्याज नि निर्भेळ आनंद हेच याचं मर्म !

२०] नीटनेटका पेहराव करुन जाण्याची कला -
व्यावसायिक असो वा इतर कारणाने असो लोकांशी संभाषणाचा प्रसंग येणार असेल तेव्हा सहज मिळेल अशा स्वच्छ हातरुमालासह आपण नीटनेटका पेहराव करून जाण्याची आवश्यकता असते. नीट पेहरावामुळे समोरच्या व्यक्तीवर आपला चांगला प्रभाव पडतो. “एकनूर आदमी दसनूर कपडा” ही म्हण हेच सांगते. त्यामुळे संभाषणास आपोआपच भारदस्तपणा येतो. चांगल्या पेहरावामुळे आनंदी वातावरण निर्माण होण्यास मदत होते, हेच याचं मर्म होय!
अशी ही यादी, आनंदी जीवनाचा मार्ग सुकर करणारी ! ती आत्मसात करायचा प्रयत्न मी अजूनही करतोच आहे. या यादीत आपणही भर घालू शकता. भविष्याची चिंता न करता त्याची योग्य ती तरतूद करून,भूतकाळाची भूतं मानगुटीवर बसणार नाहीत याची काळजी घेत म्हणजेच केवळ आनंदी घटनांच स्मरण करत आणि वर्तमानात जगत हे जीवन आनंदमय आहे याची प्रचीती घेत घेत या जगाचा अत्यंत आनंदाने निरोप घ्यायची तयारी करायला शिकुया. अजून खूप काही गॊष्टींचा उहापोह करता येण्यासारखा आहे.तुर्तास एव्हढे पुरॆ.

होणार तैसे होत जात । प्रपंची जाला आघात। परी डळमळेना जयाचे चित्त । तो एक सत्वगुण ॥ दासबोध॥

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
लेखन - श्री.पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या सावधान या ब्लॉग मधून साभार. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला जरुर द्याव्यात.

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...