आपण मनुष्य आहोत म्हणूनच...!

Share

१.आपल्याला हे जे शरीर मिळालेले आहे ते अखेरपर्यंत फक्त आपल्याचसाठी असते असं आपल्याला वाटतं पण तसं ते नसतं, हे कळायला बराच वेळ जावा लागतो.

२.वाट्याला आलेलं शरीर आपल्याला आवडो अथवा
नावडो,आयुष्यभर ते आपली सोबत ते करत असते.तसेच इतर जीवजंतूही त्या देहाचा अधूनमधून उपयोग करत असतात.

३. आयुष्यभर आपण फक्त धडेच शिकत असतो.या धड्यातून आपण अनुभवाची शिदोरी जमा करत असतो. जसं जसं ही शिदोरी वाढत जाते,तसंतसं आपलं जीवन अनुभव-समृद्ध होत जातं.

४.“जीवन” नावाच्या शाळेत आपण आपले नाव पूर्णवेळ आयुष्यभरासाठी नोंदवलेले असते.या शाळेची सुरुवातच मुळी आईच्या गर्भात असल्यापासून होत असते.तेव्हांपासून हे शिक्षण चालू असते.

५. येथे आपण फक्त धडे आणि धडेच घेत असतो,संपूर्ण धडा एकावेळी शिकण्याचा प्रश्नच नसतो.एका धडा संपतो न संपतो तोच दुसरा सुरू झालेला असतो, याची आपल्याला जाणीव पण नसते. ही एक धड्याची सांखळी असते. ती अव्याहत चालू असते.

६.पडत,धडपडत,परतपरत प्रयोग करत,दरवेळी सुधारणा करत शिकण्याची ही प्रक्रिया आयुष्यभर चालूच असते. प्रत्येक प्रयोग हा आधीच्या प्रयोगातील दोष काढलेली सुधारीत आवृत्ती असते.दोष काढला नाही तर तोच धडा वेगळ्या रुपात साकारतो.

७. एक धडा संपूर्ण आत्मसात होईपर्यंत परत परत तेच शिकण्याची प्रक्रिया सतत चालू असते. येथे नियती ही आपली गुरू असते. तिच्या समोर कोणाचं काही ही चालत नसते.

८. धडा नीट आत्मसात होईपर्यंत तो विविध प्रकारे अनेक रुपात आपल्यासमोर ठेवण्यात येत असतो.धडा आत्मसात करण्याला दुसरा पर्याय नसतो,केवळ आत्मसात करणे हाच एकमेव पर्याय असतो.

९. एकदा एक धडा नीट आत्मसात झाला कि मग शिकण्यासाठीचा पुढील नविन धडा आपोआपच आपल्यासमोर येत असतो. पुन्हा ही प्रक्रिया नव्याने चालू राहते.आपण जीवंत असेपर्यंत!

१०. धड्याच्या या शिकवणीस अंत असा नसतोच, आयुष्याचा एक ही क्षण असा धड्याच्या शिकवणीशिवाय नसतो. आपलं सारं जीवनच हे असं धडामय असतं!

११. आपण जीवंत आहोत याचा अर्थच असा असतो कि अजून आपले धडे शिकणं बाकी असतं.एक धडा संपतो तसं नविन धडा शिकण्यासाठी आपण नव्या जोमाने,उर्जेनं स्वाभाविकपणे तयार होतो.हे सर्व आपोआप घडत असतं.येथे फक्त आपण जीवंत आहोत असं वाटत असतं पण ते सत्य नसतं. आपण दर क्षणाला मरत असतो,म्हणून जीवंत असतो,हेच सत्य असतं.ज्या क्षणी मरणं संपतं त्याक्षणी शरीराचं शिकणं संपतं, शरीर पण संपतं.

१२. ’’तेथे” ”इथल्या” पेक्षा चांगली जागा कधीच नसते,जेव्हा ”तेथे” आपण पोचतो तेव्हा ती ’इथली’ होते आणि त्यापेक्षा नविन अशी ’’इथल्यापेक्षा” चांगली वाटणारी जागा ”तेथे” आपल्याला खुणावते.हा काल-प्रवाह असतो ते आपल्याला कधीच जाणवत नसतं.

१३. इतर लोकं ही केवळ आपलीच प्रतिबिंबं असतात हे ध्यानात घेणं नेहमीच आवश्यक असतं.हे समजून घेतलं तर आपलं शिकणं आनंददायक होतं, जीवन आनंददायक होतं.

१४. आपल्या स्वतःविषयी आवडणारी किंवा नावडणारी अशा एखाद्या गॊष्टीचं जोपर्यंत दर्शन घडत नसते तोपर्यंत अन्य व्यक्तिची तशीच एखादी गोष्ट आपल्याला आवडू अथवा नावडू शकत नसते.हे आत्मभान येणं खूप गरजेचं असतं. असं जेव्हा होतं तेव्हा आपण बरेच सूज्ञ झालोत असं वाटतं कारण आपल्याला आपल्या प्रतिबिंबाची जाणिव होऊ लागलेली असते.

१५. आपलं आयुष्य घडवणं हे सर्वस्वी आपल्या हाती असतं.पण त्यासाठी वर नमूद केलेल्या गोष्टी आत्मसात होणं आवश्यक असतं.हे आत्मसात होता होताच आयुष्य घडत असतं.

१६.आयुष्य घडवण्यासाठी आवश्यक असलेले असे ते सर्व स्रोत आणि आयुधं आपल्या कुवतीनुसार व गरजेनुसार आपल्याला उपलब्ध असतात.आपण ती समजून घ्यायची असतात.

१७. त्यांचा उपयोग कसा करावयाचा ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. त्याची निवड सर्वस्वी आपलीच असते.जबाबदारपण आपणच असतो, आणि जाणीवपूर्वक त्यांचा वापर करून आत्मोन्नती साधायची असते.

१८. आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार असतो. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याजवळच असतात. पण त्याअगोदर आपले प्रश्न काय आहेत ते समजलं तर उत्तरं शोधणं सोपं जातं.

१९.यासाठी सतत जागे राहून फक्त पहा,ऐका आणि विश्वास ठेवा एवढेच आपण करावयाचे असते. म्हणजे प्रश्नही समजतात आणि उत्तरं ही सापडतात.सर्वत्र प्रकाश असल्याचा अनुभव आपोआपच येत असतो. होय, समाधानाचा प्रकाश!

२०.आपण माणूस असतो म्हणूनच, सरतेशेवटी हे सर्व आपण विसरून जायचे असते, आत्मानंदात मग्न हॊण्यासाठी !! नाहीतर तसंच संपायचं असतं त्या देहाबरोबर! काय करायचे ते जरा आपल्या मनालाच विचारून पहा ना ?

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
लेखन - श्री.पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या सावधान या ब्लॉग मधून साभार. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला जरुर द्याव्यात.

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...