परस्पर संभाषण चातुर्याचे महत्त्व
काही व्यक्ती काही काळ एकमेकांच्या सहवासात असतात. घटना, घडामोडी, प्रसंग घडत असतात; अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधली जाते; तरल संवेदना शब्दांकित होतात आणि संवाद साधला जातो. आपापल्या विचारसरणीचा अन्वयार्थ त्या अनुषंगाने आवर्जून सांगितला जातो- तेच परस्पर संभाषण चातुर्य. परस्पर संभाषणाने खूप माहिती मिळते, ज्ञान संकलन होते, एकमेकांना जाणून घेता येते. परिणामी, परिणामकारक संवाद साधणं सुकर होते. समोरच्या व्यक्तीची विचारशैली, भावनिक पातळी आणि कृती याचा अंदाज येतो...
परस्पर संभाषण चातुर्य याची व्याख्या करायची झाली, तर आपले विचार आदान-प्रदान करण्याच्या इतर शैलींबरोबर त्याची तुलना करणे. या प्रक्रियेत किती व्यक्ती सहभागी आहेत, त्यांची जवळीक किती आहे, कोणत्या ज्ञानेंद्रियांचा वापर केला जाणार आहे, कुणाची प्रतिक्रिया कोणत्या स्वरूपाची आहे, हा विचार जरुरीचा आहे. परस्पर संभाषण करण्यासाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचे नातेसंबंध कसे आहेत आणि ते किती गहरे आहेत, याचापण विचार करायला हवा.
एखाद्या विक्रेत्याबरोबर आपण करीत असलेले संभाषण आणि मित्रांबरोबरचे संभाषण यात खूप फरक असतो. घरातील मंडळींशी संवाद वेगळाच असतो. काही क्षणी भाषा साधी, सरळ आणि मर्मग्राही! दिलेला शब्द तोडायचा नाही आणि शब्दांची अवस्था बापुडवाणी होऊ द्यायची नाही. थोडक्यात, काही व्यक्ती काही काळ एकमेकांच्या सहवासात असतात. घटना, घडामोडी, प्रसंग घडत असतात; अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधली जाते; तरल संवेदना शब्दांकित होतात आणि संवाद साधला जातो. आपापल्या विचारसरणीचा अन्वयार्थ त्या अनुषंगाने आवर्जून सांगितला जातो- तेच परस्पर संभाषण चातुर्य.
बोलणं सुरू होतं- ओघ वाढतो- संवाद होतो- तुटलेल्या पुलांवर ब्रिज बांधला जातो आणि संवादाच्या माध्यमातून "प्रतिसाद' आत्मसात होतो. "प्रतिक्रिया' आपसूकच काढता पाय घेतात. परस्परांमध्ये असतो कधी शब्दाविना संवाद, कधी आठवणींना उजाळा, तर कधी भरघोस आणि घसघशीत जीवन विचार प्रगटीकरण.
परस्पर संभाषणाने खूप माहिती मिळते, ज्ञान संकलन होते, एकमेकांना जाणून घेता येते. परिणामी परिमाणकारक संवाद साधणं सुकर होते. समोरच्या व्यक्तीची विचारशैली, भावनिक पातळी आणि कृती याचा अंदाज येतो. ही सारी माहिती हळूवार पावलांनी आपल्याजवळ पोचते, निरीक्षणाने दृढ होते. स्वतःची माहिती सांगण्याचा एक उद्देश म्हणजे दुसऱ्याची माहिती प्राप्त करणे. संभाषणात आपण ज्या शब्दांचा वापर करतो त्याला अनेक अर्थ असतात. कारण संदर्भ बदलत असतात. एखादा संदेश देताना जुजबी माहिती दिल्यास तो "वरवरचा' निरोप असतो. परस्पर संबंधांतील निरोप तो ज्या पद्धतीने दिला जाईल, त्यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो. मनमोकळेपणाने पारदर्शक संभाषण हे व्यक्तिगत संबंध दृढ करण्यास खूप उपयोगी पडतात. याशिवाय व्यक्तिगत छाप या संभाषण कलेवर निर्भर असते. आपण या प्रक्रियेत कोणती भूमिका बजावत आहोत; आपल्या चेहऱ्यावरील भाव, नवसामान्यांवरील प्रभाव, सर्वसाधारणतः आपली प्रतिमा याचे रसायन बरेच काही प्रतिपादित करत असते.
शूट्झ नामक महोदयांनी यासंबंधी खूप खोलवर विचार केला. त्यांनी परस्परसंबंधांचे ढोबळ मानाने तीन गटांत वर्गीकरण केले.
१) स्वतःच्या अस्तित्वाची जाण करून देणे.
२) आपल्यामधील असलेले नेतृत्व गुण, आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याचे प्रगटीकरण आणि त्याद्वारे नियंत्रण.
३) प्रेम-आस्था-आपुलकी याचा वर्षाव करून दोन किंवा अधिक मन जोडून जवळीक वाढविणे. मित्रपरिवाराचा परीघ वाढवून मित्रत्वाचे नाते, जाणीव आणि नेणिवाच्या पलीकडे नेण्यासाठी आणि संबंध दृढ करण्यासाठी समूह गट मोलाची मदत करतो.
मार्क नॅप्स हे असेच एक नामांकित विचारवंत. त्यांनी सखोल विचार करून वैचारिक चौकट व सिद्धांत प्रस्थापित केला.
स्त्री-पुरुषांमधील नाजूक संबंध, मैत्री, व्यावसायिक संबंध, वसतिगृहात कारणपरत्वे एकत्र राहणाऱ्या लोकांमधील संबंध अशी उदाहरणे या सिद्धांताच्या आधारे शब्दांकित करता येतील. या मॉडेलमध्ये नमूद केलेली पहिली पायरी म्हणजे सुरवात. फार तर आपण त्याला "प्रारंभ' असे संबोधू. याचा कालावधी अल्प असतो. संभाषण करणाऱ्या व्यक्ती एकमेकांवर सकारात्मक छाप पडेल याची काळजी घेतात. प्रचलित व चालीरीतीनुरूप त्या व्यक्ती एकमेकांना शुभेच्छा देतात. परस्परांच्या देहबोलीचे आणि शिष्टाचाराचे ते निरीक्षण करतात तेसुद्धा अभ्यासपूर्ण.
दुसरी पायरी म्हणजे प्रयोगशीलता. एकमेकांना प्रश्न विचारून परस्परांशी माहिती संकलित करून नातेसंबंध दृढ करावयाचे की कसे, याची खूणगाठ ते मनाशी बांधतात. निरीक्षणातून असे आढळले, की बहुतांशी नातेसंबंध या स्थानीच थांबले जातात आणि त्यांना पूर्णविराम मिळतो.
तिसरा टप्पा म्हणजे जुळलेले संबंध काळजीपूर्वक हाताळून घट्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न. नातेसंबंधांतील औपचारिकता लोप पावते. व्यक्तीला व्यक्ती म्हणून मान्यता दिली जाते. देण्याघेण्यातील "शब्दांना' महत्त्व प्राप्त होते.
चौथी पायरी सार्थपणे विश्लेषित करायची, तर "गुंतता हृदय हे!' असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सहभावना निर्माण होते. एकोप्याने काम करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पावले टाकली जातात. परस्परांच्या हिताची जपणूक केली जाते. पाचव्या पायरीला आपण "बंधन' असे संबोधू. यामध्ये कायदेशीर बाजूंचा विचार केला जातो. "लग्नसोहळा' हे याचे उत्तम उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे व्यावसायिक भागीदारी. खूप कमी परस्पर संबंध या पायरीपर्यंत पोचतात.
या क्षेत्रात आणखी संशोधन डक यांनी केले. त्याला "डक यांची चाळणी लावून केलेली शोधप्रक्रिया' असे नामांकन केले आहे.
क्षणिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून याची मांडणी करण्यात आली आहे. नातेसंबंधामधील व्याप्ती, खोली याचे मूल्यमापन करताना त्याला अनेक "चाळण्या' लावल्या जातात. त्यातील पहिली चाळणी तत्सम क्षणानुरूप व सामाजिक न्याय भूमिकेतून मांडण्यावर संबंधितांचा भर असतो. आपले निवासस्थान आणि कार्यस्थळ या अनुषंगाने जे विचार होऊन जे आचरणात आणले जाते, ती पहिली पायरी. या चाळणीतूनच बहुतांशी लोकांची गळती होते. परस्पर संभाषण व्यवहारापूर्वी आपण काही माहितीचे संकलन करतो. या माहितीच्या आधारे परस्परसंबंध जोपासायचे, की त्याला तिथेच पूर्णविराम द्यायचा, याचा मागोवा माणूस घेतो.
हेच कशाला, काही व्यक्तींना पाहताक्षणीच त्यांच्याशी जवळीक साधायची की कटाक्षाने टाळायचे, याची खूणगाठ मनुष्यप्राणी मनाशी बांधतो. संभाषणाद्वारे परस्परसंबंध प्रस्थापित करीत असताना संभाव्य नातेसंबंध किती वृद्धिंगत करावेत याचा अंदाज तो घेतो. समोर असलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि आपण किती समरस होऊ शकू, याचा सखोल विचार होतो. जेव्हा ही समरसता एकरूप होते, तेव्हा आम्ही "खूप चांगले मित्र आहोत' याची पुनरुक्ती केली जाते. काळाच्या ओघात दुरावा निर्माण होऊ शकतो. "आम्ही' या शब्दाची जागा "मी' घेतो. थोडक्यात व्यक्ती आपले स्वतंत्र व्यक्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. दोघांचे छंद वेगळे असतात.
संबंध असून नसल्यासारखेच भावतात. संभाषण जवळ जवळ संपल्यातच जमा होते. बाहेरून संबंध ठीक आहेत असे जाणवते. संबंध पुनः प्रस्थापित व्हावेत या दृष्टीने वैचारिक देवाणघेवाण होते. सकारात्मक भूमिका घेतली जाते. स्तंभित संबंधात संभाषण टाळले जाते. "मी जर काही म्हणालो तर दुसरा प्रत्युत्तर कसा करेल, याचा ते विचार करतात. इथे काही तरी शिजते आहे, याची चाहूल इतरांना लागते. एकमेकांना टाळताना दुरावा अधिक निर्माण होतो. दरी रुंदावत जाते. वसतिगृहात राहणारे विद्यार्थी अभ्यासक्रमाची समाप्ती झाल्यावर आपल्या गावी परततात. संबंध टिकले तर टिकले, काहीसे असेच हे!
प्रा. शिवाजीराव भोसले यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे, ""वस्तूंचा पसारा व माणसांचा गोतावळा लागतो कशाला? मैत्री ही सर्वांशी करावी. सलगी ही थोड्यांशी करावी. सोबत विवेकी लोकांशी असावी. सतत माणसांनी वेढलेले राहणे फायद्याचे नाही. गुंता आणि पसारा कमी करणे याचेच नाव शहाणपण!''
कुणाशी काय बोलायचे; कसे, किती बोलायचे, किती मान द्यायचा, याचे अलिखित नियम पाळायचे असतात. नातेवाईक अपरिहार्य असतात, तर मित्रमैत्रिणी ही गरज असते.
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - एस. डी. बागडे (सकाळ मधून साभार)