‘ती’चं जग इंटरनेटवरील महिला विश्व
तिचे जग एकसंध असे कधीच नव्हते. पूर्वी ते शहरातली - खेडय़ातली, नोकरी करणारी आणि न करणारी अशा वेगवेगळ्या बेटांवर विभागलेले होते. आता तर व्हर्चुअल जगात वावर असणाऱ्या हायटेक तिचे आणि इंटरनेटच काय पण संगणकही वापरू न शकणाऱ्या, मग ते आर्थिक वा शैक्षणिक अभावापोटी ‘तिचे’ जग इतके वेगवेगळ्या स्तरांवर आहे की जणू दोन वेगवेगळ्याच वसाहती. जगभरातल्या कानाकोपऱ्यात नोकरी-व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने विखुरलेल्या मराठी जनांमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने आहे आणि रोज त्यांच्या पाऊलखुणा मायबोलीसारख्या संकेतस्थळांवर उमटत असतात. इंटरनेटवर रोज कामाच्या निमित्ताने, चर्चा, मतांची देवाणघेवाण किंवा नुसत्याच गप्पा मारण्यासाठी जमणाऱ्या स्त्रियांचे स्वतंत्र असे जग तयार झालेले असते. मात्र क्वचितच या उच्चशिक्षित स्त्रियांच्या ऊर्जेचा, ज्ञानाचा, अनुभवांचा एकत्रित असा ओघ काही विधायक कार्याकडे वळवला जातो. तसे करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणाऱ्या स्त्रियाही मोजक्याच असतात. कोणत्याही जगातल्या असोत, सर्वसाधारणपणे स्त्रियांना रोजच्या नोकरी-व्यवसायाच्या तापामधून वेळ उरलाच तर स्वत:च्या घरटय़ाची आणि घरटय़ाभोवतालच्या अंगणाचीच चिंता पुरेशी होते.
मायबोलीसारख्या संकेतस्थळावरही तिच्या जगात काही वेगळे असे आतापर्यंत घडतच नव्हते. विविध वयोगटातल्या स्त्रिया आपापल्या वेळेच्या सोयीनुसार रोज एकत्र जमून पाककृती- आहारशास्त्र, बाल संगोपन, आर्थिक गुंतवणुकीपासून योग-आरोग्य, सौंदर्यापर्यंत आणि नाटक-सिनेमांपासून पुस्तके, साहित्य वगैरे विषयांवर आपापली मते मांडत होत्या, सल्ले देत घेत होत्या, साहित्यनिर्मिती, कथा-कविताही करत होत्याच. कधीतरी पर्यावरण- सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपण काय करू शकतो याचा विचारही यायचा, पण हे सारे नुसतेच विस्कळीत स्वरूपात आणि घरटय़ाभोवतालच्या परिघापुरतेच. सर्वात महत्त्वाचे हे की, ते इंटरनेटपुरतीच मर्यादित राहात होते.
स्त्रियांची चर्चा नातीगोती-संगोपनापर्यंत मर्यादित राहू नये, एकटे पालकत्व निभावून नेणाऱ्या स्त्रिया, कर्करोगासारख्या असाध्य रोगांशी सामना करणाऱ्या स्त्रिया, परदेशात ‘डिपेन्डन्ट व्हिसा’वर आलेल्या स्त्रियांचे प्रश्न अशा तऱ्हेचे विविध आधारगट मायबोलींवर कार्यरत व्हावेत, हा मूळ हेतू मनात येऊन ‘संयुक्ता’ नावाचा स्त्रियांचा स्त्रियांसाठी असलेला सुरेख उपक्रम मूळच्या कोल्हापूरच्या आणि आता व्हर्जिनियाला स्थायिक झालेल्या वैशाली राजे यांनी मायबोली प्रशासकांच्या मदतीने सुरू केला.
इंटरनेटच्या अमर्याद विश्वातील स्त्रीविषयक माहिती संकलन डेटाबेस स्वरूपात तयार करणे, स्त्रियांसाठी आधारगट, हेल्पलाइन्स, महत्त्वाच्या घडामोडी, सेवाभावी संस्था, आरोग्याविषयक माहिती, नोकरी-व्यवसाय मार्गदर्शन, सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत, गरजेनुसार स्वयंसेवक अशा असंख्य उपक्रमांसाठी वैशालीसह तिच्यासारख्याच अनेक उत्साही मराठी तरुणी, ज्यात ग्रिनिजची संगणक तज्ज्ञ तृप्ती, जर्मनीची डॉक्टर संपदा, फ्रिमॉन्टची मेंदी आणि बॉडी पेंटिंग डिझायनर दीपाली, पुण्याची कथालेखिका पूनम, नाटय़ चित्रपट व्यवसायातील नीरजा व आणि अशाच कितीतरी सामील होत गेल्या आणि त्यांचा मग बघता-बघता महाजालावर कारवाँ बनता गया. संयुक्तासारखे उपक्रम ही खरं तर नुसती एक सुरुवात असते, ज्यातूनच पुढे समाज परिवर्तनाच्या चळवळींना हातभार लागतो.
इंटरनेटवरच्या इतरही संकेतस्थळांनी आजच्या युगातल्या अतिप्रगत स्त्रियांच्या ऊर्जेचा, बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करून घेण्याचे मनावर घेतले तर ऑनलाईन व्हर्चुअल जगात सहज वापरू शकणाऱ्या तिच्या आणि तिच्यासारख्या शैक्षणिक, आर्थिक स्थैर्य न लाभू शकलेल्या हजारो ऑफलाइन त्यांच्या जगातले अंतर नक्कीच कमी होईल आणि बघता बघता दोन्ही जगातल्या तिचे अंगण आणि घरटे जास्तीत जास्त सक्षम आणि सुंदर बनून जाईल यात शंकाच नाही!!
स्त्रियांसाठी असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती दारुण आहे. शमिला संग या दिल्लीस्थित, मल्टीनॅशनल कंपनीतील एक्झिक्युटिव्हने ‘अनदर सबकॉन्टिनेन्ट फोरम’ नावाच्या ऑनलाइन व्यासपीठावर हा प्रश्न चांगलाच लावून धरला. बंगलोरच्या लेखा शर्माने सुधा मूर्तीच्या दहा कोटी देणगीमधून उभ्या राहिलेल्या ‘निर्मल’ स्वच्छतागृहांची थोडक्याच अवधीत वाईट परिस्थिती होऊन बंद का झाले, याबद्दल त्याच फोरममध्ये सांगताना लिहिले की, पाणीटंचाईच्या काळातही स्वच्छतागृहात पाणीपुरवठा कायम राहील याची काळजी निर्मलच्या व्यवस्थापनाने घेतली. पण त्या पाण्याचा स्त्रिया वापरच करत नव्हत्या किंवा वापर केल्यावर नळ तसेच वाहते ठेवून जात होत्या. शेवटी त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पगारी नोकर नेमले आणि त्यांचा खर्च सोसवेना म्हणून ‘निर्मल’ स्वच्छतागृह अभियान बंद पडले. या चर्चेवरून प्रेरित होऊन शहाना शेख या दिल्लीच्या श्री राम कॉलेजातल्या २० वर्षीय अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनीने ९८ पानांचा ‘पब्लिक टॉयलेट्स इन दिल्ली’ असा प्रबंध लिहिला आणि दिल्ली हायकोर्टात या संबंधातील जनहितयाचिका दाखल केली. शमीला तिथे लिहिते की, पुरुषांना निदान अस्वच्छ स्थितीतल्या का होईना, पण पुरेशा स्वच्छतागृहांचा पर्याय आहे, स्त्रियांना तोसुद्धा पुरेशा प्रमाणात नाही. शहरांमध्ये उच्चवर्गीय स्त्रियांना रेस्तराँमधल्या किंवा मॉलमधल्या स्वच्छतागृहांचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध असतो, पण आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरावरील स्त्रियांना त्यांचा वापर करण्याची मुभा किंवा सोय नाही. शर्मिलाच्या मते त्यामुळेच सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न केवळ लिंगसापेक्ष मुद्दा नाही, तर वर्गनिहाय मुद्दा आहे. स्त्रियांच्या, मग त्या कोणत्याही जगातल्या आणि स्तरातल्या असोत, अशा साध्या, बेसिक गरजेच्या प्रश्नांचा तडा लावण्यासाठीच अजून किती काळ आपली ऊर्जा खर्च करावी लागणार आहे काय माहीत!
जिव्हेश्वर.कॉम टिम
टीप - मुळ लेख शर्मिला फडके यांचा "लोकसत्ता" मध्ये प्रकशित झालेला आहे.