प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?
समजा मी प्रयत्न केला नसता तर माझ्या भविष्यात मी अमूकअमूक होणार होतो पण मी प्रयत्न केला म्हणून मी तमूकतमुक झालो हे तपासणार कसे? भविष्यात असणाऱ्या घटनेविषयी ज्योतिषांचे विविध मतप्रवाह आहेत. जहाल पंथ असा म्हणतो की प्रारब्ध अटळ आहे. यदृच्छेशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही. म्हणजे तुमच्या हातात काही नाही. जे काही घडणार आहे ते ठरलेले आहे तुम्ही निमित्तमात्र असता. दुसऱ्या प्रकारचे लोक असे म्हणतात की, प्रयत्नांशिवाय यश नाही हे खरेच आहे. तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही प्रारब्ध बदलू शकता. पण ते स्वातंत्र्य तुम्हाला किती? एखाद्या गायीच्या वासराला दोरखंडाने खांबाला बांधलेले असते. त्याला जेवढी दोरी लांब तेवढे त्याचे स्वातंत्र्य. त्या दोरीने निर्माण केलेला परीघ ही त्याची प्रयत्नांनी केलेल्या वर्तुळाची सीमारेषा. तुमच्या पूर्वसंचित व प्रारब्ध यानुसारच तुमच्या आयुष्यातल्या घटना घडत असतात. ग्रहांचे काम एवढेच आगामी घटनांची सूचना देणे. म्हणजे ग्रह हे फक्त सूचक वा निर्देशक आहेत. ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर म्हणतात, ''ज्योतिष हे फक्त तुमचा एक पंचमांश भाग नियंत्रित करतं. बाकी चारपंचमांश हे इतर गोष्टी प्रभाव टाकत असतात.`` म्हणजे प्रयत्न ही बाब या चार पंचमांश मध्ये मोडते. आपल्याला जिचा शोध घ्यायचाय् त्या बैठकीविषयी एवढे भिन्न मतप्रवाह आहेत. धूर्त ज्योतिषांची डायलॉगबाजी बघा. ते म्हणतात, ''दैवगतीच्या रुळावरुन प्रयत्नांचे स्टेअरिंग ( ? )हातात घेऊन आपल्या आयुष्याची गाडी जेव्हा मार्गक्रमण करत असते त्यावेळी ज्योतिष हे मार्गदर्शक बोर्डाप्रमाणे काम करतं.`` काही ज्योतिषी म्हणतात, ''तुम्हाला प्रयत्न करण्याची बुद्धी झाल्याशिवाय तुमच्याकडून कसे प्रयत्न होणार. आणि प्रयत्न केल्याशिवाय यश तरी कसे मिळणार? यासाठी तर ज्योतिषाचं मार्गदर्शन घ्यायचं. आता बोला!
स्त्रोत - येथे पहा.