मंगळदोष म्हणजे काय?

Share

जन्मकुंडलीत १, ४, ७, ८, १२ यापैकी कुठल्याही स्थानात मंगळ असेल तर तो मंगळदोष आहे असे समजले जाते. ताऱ्यांच्या तेजाची जशी प्रतवारी असते तशी या मंगळाच्या कडकपणाचीही प्रतवारी आहे. कडक मंगळ, सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ ही प्रतवारी कशी ठरवतात तर पत्रिकेतला मंगळ राशीबल व स्थानबळ यांच्यामुळे किती पॉवरफुल आहे यावरून ठरवतात.

सांगून आलेल्या मुलाची / मुलीची पत्रिका मंगळाची आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी हल्ली ज्योतिषाची गरज भासत नाही. किरकोळ आजारासाठी आपण लगेच डॉक्टरकडे धावतो का? आपल्याला घरगुती वा प्राथमिक उपचार माहीत असतात. तद्वत हा मंगळाचा प्रथमोपचार हल्ली पुष्कळ लोकांना - बायकांना सुद्धा - माहीत असतो. मंगळ दिसल्याबरोबर नकार देण्यात येतो!

बापाला मुलगी म्हणजे एक भार त्यातून मुलीला मंगळ असला की विचारायलाच नको. अशावेळी एखादे गुरुजी-कम-ज्योतिषी-कम मध्यस्थ अशी मंगळी मुलगी खपवायचं काम कुशलतेनं करीत असतात. मुलीच्या मंगळाला जाब विचारणारे राहू, केतू शनी यांना पुढे करून मंगळदोषाचा परिहार होतोय् असे मुलाकडच्यांना पटवून ते ही मुलगी खपवतात. अशा मध्यस्थीतून त्यांना आर्थिक लाभही होत असतो. साहजिकच मंगळाचा बागुलबुवा ज्योतिषीलोक जोपासतात. विवाहाच्या सौदेबाजीत मंगळ हा एक हुकमी पत्ता ठरतो.

मंगळदोष म्हटला की वैवाहिक सौख्याचा बोऱ्या, वैधव्य असा समज आहे. उगीच विषाची परिक्षा कशाला घ्या असे म्हणून लोक मंगळ असलेल्या मुलीला नकार देतात. पण त्यातही गंमत अशी आहे की 'मंगळ्या` मुलाला मंगळ नसलेली मुलगी एकवेळ चालते पण मंगळ असलेल्या मुलीला मात्र मंगळ्याच नवरा लागतो कारण तो तसा नसेल तर तिला कायमच्या वैधव्याची भीती असते. मुलांना विधुरावस्थेची भीती निदान पूर्वीच्या काळी तरी वाटत नसावी. कारण त्यांना पुन: पुन: लग्ने सहज करता येत असत ! जन्मकुंडलीत बारा स्थाने असतात त्यातल्या पाच स्थानात मंगळ असण्याची शक्यता जवळजवळ चाळीस टक्के असते. म्हणजे शेकडा ४० टक्के कुंडल्यात हा पीडादायक मंगळ असणारच! त्यामुळे विवाह जुळवणे फार मुश्कील व्हायचे म्हणून पूर्वाचार्यांनी काही अपवाद शोधून काढले. सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ असे ते अपवाद आहेत. मंगळ-दोषाचा हा इतिहास काही फार प्राचीन नाही, अलीकडचाच म्हणजे १७ व्या शतकापासूनचा आहे पण त्याचा जबरदस्त पगडा लोकांच्या मनावर बसला आहे. मंगळदोषाचे उल्लेख हे मुहूर्त गणपती, मुहूर्त चिंतामणी, भाव चिंतामणी, ज्योतिर्महार्णव अशा ग्रंथांमध्ये आढळतात.

मुहूर्तचिंतामणी या ग्रंथामध्ये मंगळदोषासाठी अपवादही सांगितले आहेत. वधूच्या पत्रिकेत जर वरील स्थानापैकी एकात मंगळ असून वराच्या पत्रिकेतही तशाच स्थानात असेल तर मंगळाने मंगळास जाब पाहिला असे म्हटले जाते. आखाड्यातील पहिलवान जशी एकमेकाची ताकद अजमावत असतात त्या पद्धतीने वधूवरांच्या पत्रिकेत मंगळ एकमेकांना जाब विचारतात म्हणे! अंगात आलेल्या बायकांच्या देव्या सुद्धा एकमेकीला श्रेष्ठत्वाबद्दल जाब विचारतात. अर्थात याचा शेवट प्रत्येकजण आपापल्या जागी श्रेष्ठ अशा समन्वयात होतो. तद्वत मंगळ्याला मंगळी जमून जाते. नंतरच्या ग्रंथकारांनी जाब विचारण्याचे हे अधिकार शनी, राहू, केतू यांना दिले आहेत. पत्रिकेतील गुरु, शुक्र हे ही शुभ ग्रह आपापल्या स्टेटस नुसार नैतिक दबाव आणू लागले. मेष, कर्क, वृश्चिक, धनु, मीन या राशीही मंगळाला आंजारू गोंजारू लागल्या. पत्रिका गुणमेलनात जर २७ किंवा त्यापेक्षा अधिक गुण झाले तर मंगळाकडे काणाडोळा करू लागले. अशा रितीने मंगळाचे अपवाद वाढू लागले. अनेक मान्यवर ज्योतिषांनी सुद़्धा मंगळ-दोष हे खूळ आहे अशी सडेतोड भूमिका घेतली. वि.गो.नवाथे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, द्वा.ना. राजे, ज्योतिषाचार्य सुंठणकर इत्यादि मोठमोठ्या लोकांचा त्यात समावेश आहे. ज्योतिषाचार्य महामहोपाध्याय शां. श्री. सुंठणकरांनी तर मंगळदोषाचे स्तोम ज्योतिष्यांनीच माजवले आहे असे म्हणून 'विवाह मंगळाची अनावश्यकता` या १९६६ साली लिहिलेल्या पुस्तकात ज्योतिष्यांंचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी मंगळदोषाला १०७ अपवाद दिले आहेत. ते म्हणतात, '' जगात अगणित विवाह होत असतात. भारत सोडल्यावर सर्व जगभर मंगळ पद्धती विचारात न घेता विवाह जमत असतात. मंगळ पद्धती सर्व जगातल्या लोकांना कशी भोवत नाही? का फक्त भारतीय जनतेच्या बोकांडी बसण्याचा तिचा हेका आहे? सदा सर्वदा पृथ्वीतलावर थोडयाशा लोकांना वैवाहिक जीवन विफलतेचा फटकारा बसत राहणार या निसर्गक्रमास थांबवण्याची ताकद मंगळाच्या कुवतीच्या बाहेरची आहे.`` मंगळाच्या बाबतीत ज्योतिर्विद मंडळी लुच्चेगिरी करतात असे खुलेपणाने सांगण्याचे धाडस त्यांनी केले आहे. पुस्तकातली आणखी काही निवडक वाक्ये उद्धृत करतो:- 'यदाकदाचित् मंगळाच्या पद्धतीचा बाष्कळपणा समाजास उकलला तर ज्योतिषी लोकांचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात मार खाईल अशी साधार भीती त्यांना वाटत असल्यास न कळे! ज्योतिष कार्यालयांच्या उत्पन्नाचा फार मोठा वाटा या मंगळाने उचललेला असल्याने ज्योतिर्विद मंडळी या पद्धतीच्या भंपकपणाकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असतील असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही. आम्ही तरी यापेक्षा अधिक परखड काय म्हणू शकणार ? लोकांना हे उमजेल तेव्हा खरे !

लेखक - प्रकाश घाटपांडे
स्त्रोत - येथे पहा.

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...