खुळ्या वयातली साथसंगत

Share

जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत: समाजजीवनाचा पोत बदलल्यानंतर आता अनेक नवी नाती निर्माण होत आहेत. काही नात्यांचे रूप बदलले आहे. हृदयांतरीच्या नात्यांचे नवे पैलू उलगडून दाखवणारे हे सदर. या सदरात वाचकांचाही सहभाग अपेक्षित आहे.

‘दिवस तुझे हे फुलायचे.. झोपाळ्यावाचून झुलायचे!’ या गाण्यातून आपल्या फुलपंखी दिवसांचं चित्र डोळ्यांपुढे उभं राहातं. या वेडावणाऱ्या वयाची चाहूल लागता लागताच आतून-बाहेरून पूर्ण बदलवणारे तरंग उमटायला लागलेले असतात. मुलींना तर त्याची जाणीव पावलोपावली होत असते, करून दिली जात असते. ‘बघता बघता किती मोठ्ठी दिसायला लागली!’ इथपासूनच्या कौतुकापासून ते ‘किती गं वेळ आरशासमोर काढणारेस? काय फॅशन शोला जायचंय का?’ अशा दटावण्यांमधून आपलं फुलतं वय जात असतं. इतके दिवस अगदी पावलोपावली जिच्यावाचून अडायचं ती ‘आई’ बनते शत्रू नंबर एक! खास करून दिसण्या- वागण्या- बोलण्या- खाण्याच्या तऱ्हांबद्दल सतत सूचना करणारी बाई म्हणजे आई! काही गोष्टी तरीही तिच्याशिवाय अडतात हे खरं, पण तरी खास मैत्रिणींची सर काही आईला येत नाही!

या वयात मैत्रीतलं सगळंच एकदम ‘सीक्रेट आणि सॉलिड महत्त्वाचं’ असतं! ही सगळी महागडी सीक्रेट्स घरच्यांपासून लपवून एन्जॉय करण्यात केवढी धमाल असते, ते त्याच वयात उमगायला लागतं. आवडते हिरो-हिरॉइन्स, त्यांचे पिक्चर्स, ट्रेक्स, परीक्षेतल्या गमतीजमती, पीजेजचं खास कलेक्शन आणि अर्थातच आपापल्या मनातल्या अंधुक दिसणाऱ्या आवडत्या खास व्यक्ती! बोलायला विषयांची (आणि वेळेचीही) कमतरता असतेच कुठे?

आता बदलत्या काळात जरी कट्टय़ांवर, कॅफेमध्ये मित्र-मैत्रिणींचे संमिश्र गट दिसत असले, तरी त्यातही खास खास मैत्रिणींचा वेगळा गट असतोच. तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात तर अशा मैत्रिणीच जास्त जवळच्या असतात. आपण जरी कितीही ‘वयनिरपेक्ष’ मैत्रीबद्दल बोललो तरी, या फुलत्या वयात रंगते ती समवयस्कांचीच मैत्री. तीही आपण ज्यांच्याबरोबर स्वत:ला मॅच करू शकतो अशा मैत्रिणींची साथ आपल्याला जास्त मनापासून भावते.

हे वय असतं सतत स्वत:चा शोध घेण्याचं! स्वत:च्या रूपा-अस्तित्वाला मनातच एक आकार देण्याचं! त्यासाठी संदर्भाला आपली मैत्रीणच असते ना! म्हणूनच मग एकीनं अमुकतमुक प्रकारच्या फॅशनचा कुर्ता घेतला आणि तो ‘सही’ दिसतोय असं वाटलं की तिच्या मैत्रिणींच्या कपाटात तो येणारच. कुर्त्यांपासून करियपर्यंतच्या कितीतरी गोष्टी सर्वानी मिळून कॉमनली अनुभवायच्या असतात ना! (अर्थात हल्लीची ‘युवा पिढी’ करियरच्या बाबतीत थोडी जास्त ‘स्व’तंत्रपणे निर्णय घेताना दिसते. कारण ‘मैत्री’ जपण्यासाठी इतर शेकडो संधी उपलब्ध असतात!)
संवादांमधून एकमेकांबद्दलच्या ‘मैत्रीच्या कमिटमेंट’ची वीण नकळत पक्की होत जाते. उठता, बसता, जेवता, झोपता सारखी मैत्रिणींशी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष साथ हवीहवीशी वाटते. एखाद्या टय़ूटला लिहिता न आलेला महत्त्वाचा प्रश्न जसा मैत्रिणी-मैत्रिणींत चर्चेच्या अजेंडय़ावर येतो, तसाच एखाद्या मित्राबरोबर झालेला ब्रेक-अप आणि त्यातून आलेलं घायाळ दु:खंही याच चावडीवर मांडलं जातं. घरच्या आणि दारच्या प्रौढांवरचं कावणंसुद्धा इथे अगदी मोकळ्याढाकळ्या भाषेत व्यक्त होतं. त्या वयाच्या स्पेशल भाषेत.

या रंगीबेरंगी वयातल्या मैत्रिणी म्हणजे जणू आपल्या कल्पनेतल्या जगाकडे बघायला मदत करणाऱ्या खिडक्या असतात. त्यांच्या अनुभवातून, दृष्टिकोनातून, दिसण्या-वागण्यातून आपण बाहेर पाहतो आणि स्वत:कडेही! ‘मैत्रमग्नता’ हे या वयाचं अगदी न बदलता येणारं लक्षण आहे. वेगवेगळ्या पाश्र्वभूमीच्या मुलींना त्याची वेगवेगळी गरज असते. इथे मैत्रिणींबरोबर सहजपणे भविष्यातील स्वप्नं पाहिली जातात. छोटे-मोठे धोके (Risks) पत्करले जातात. समाजाच्या चौकटी थोडय़ाफार वाकवल्याही जातात. पण ग्रामीण भागातल्या या वयातल्या मैत्रीला वेगळीच डूब असते. तिथे अशी मैत्री म्हणजे मोकळा श्वास घेण्याचं हक्काचं ठिकाण असतं. काही वेळा लांबवरून शाळा-कॉलेजात येण्या-जाण्याची फक्त परवानगी मिळण्यासाठीसुद्धा मैत्रिणी असाव्या लागतात. तरच घरातून शिकायला बाहेर पडता येऊ शकतं. ‘लाईफ एन्जॉय’ करण्याच्या शहरी मैत्रिणींच्या कल्पनांपेक्षा खूप वेगळा मानसिक आधार अशा ठिकाणी मैत्रिणींकडून मिळत असतो.

पुण्याजवळच्या आंबवणे नावाच्या छोटय़ाशा गावात किशोरींसाठी जेव्हा एक उपक्रम सुरू करायचा ठरला; तेव्हा असं लक्षात आलं की, एका मध्यवर्ती ठिकाणी प्रशिक्षण योजलं तर जवळपासच्या गावांतून प्रत्येकी सुमारे चार ते पाच जणी येणार असल्या तरच तो वर्ग होईल. तासभर एसटीतून आणि नंतर तासाभराच्या पायपिटीसाठी बरोबर कुणी असल्याशिवाय या वाढत्या वयाच्या मुली येणार कशा? शहरामध्ये प्रसंगी रात्री-बेरात्रीही एकटी मुलगी सिनेमा बघून आपल्या दुचाकीवरून जाऊ शकते, पण ग्रामीण भागात काही ‘शिकायचं’ असलं तरी ‘मैत्रिणीं’ची अशी सोबत अपरिहार्य ठरते, हा विरोधाभास लक्षात आला.

या वयातल्या मैत्रीचं अजून एक खास वैशिष्टय़ म्हणजे भिन्नलिंगी आकर्षणाबद्दलच्या गप्पा/ टोमणे/ चिडवाचिडवी/ कबुलीजबाब आणि उलट तपासणीही. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी एखाद्या मैत्रिणीला पाठवलेल्या चिठ्ठीत जर अशा चिडवाचिडवीचा उल्लेख झाला आणि तो कुणाला सापडला तर घरामध्ये महाभारतीय युद्धभूमीच निर्माण होत असे! आज या गप्पा घरातही बऱ्यापैकी सहज स्वीकारल्या जातात. (निदान तसं दर्शवलं तरी जातं!) त्यामुळे मैत्रिणींमध्येही ‘अमुकतमुकचा बॉयफ्रेंड’ (‘मित्र’ आणि ‘बॉयफ्रेंड’ या शब्दांच्या अर्थामध्ये या दोन संस्कृतींइतकाच फरक आहे!) या विषयावर चर्चा होण्यात कुणालाच अनकम्फर्टेबल वाटत नाही. किंबहुना काही घरात तर तसं काही नसेल तर आश्चर्यही व्यक्त केलं जात असेल, असं मला वाटतं.

या फुलत्या मैत्रीत जसा मजेचा, आनंदाचा, एन्जॉयमेंटचा सुगंध असतो, तसाच घसरण्याचा, आपटण्याचा ट्रॅक सोडून विपरीत रस्त्याला लागण्याचा मोठा धोकाही असतो. कारण इथे मैत्रीतला शब्द शेवटचा! तोच जास्त महत्त्वाचा! हे मनात पक्कं ठसलेलं असतं. कुटुंबाचे दोर पूर्वीपेक्षा आजच्या काळात कितीतरी सैल झालेले असतात. मैत्रिणींची मूल्यव्यवस्था तपासून मगच स्वीकारली जाईल, असं नसतं. अशा वेळी मात्र गंभीर समस्यांना सामोरे जाण्याचे प्रसंग येऊ शकतात. अशा मैत्रिणी आपल्याला निव्वळ दिखाऊ, झगझगाट असलेल्या ग्लॅमरस विश्वाकडे झपाटय़ानं खेचून नेऊ शकतात, पण तिथल्या धोक्यांची, अडथळ्यांची मात्र जाणीव करून दिली जातेच असं नाही. म्हणून ‘मैत्रिणी’ पारखून घेण्याचंही हेच वय असतं.

विशेष: चॅटिंग/ आर्कुटच्या माध्यमातून भेटणाऱ्या ‘परात्पर मैत्रिणी’ (मैत्रिणीच्या-मैत्रिणीच्या मैत्रिणी.) निवडताना- त्यांच्याशी स्वत:चे व्यक्तिगत जग खुलं करताना खूप जागरूक राहायला हवं. खोलातला परिचय झाल्याशिवाय, पुरेशी खात्री पटल्याशिवाय एखाद्या भावात्मक आवाहनाला प्रतिसाद देणं टाळायला हवं. नाहीतर गाडी ट्रॅक सुटून घसरायला वेळ लागत नाही. त्याच वेळी गटातली एखादी मैत्रीण जर इतर काही प्रभावाखाली येऊन ट्रॅक सोडून वागत असेल तर तिला परत खेचून रुळावर आणण्याची ताकदही मैत्रीत असते, याची आपल्याला जाणीव हवी आणि ती ताकद वापरण्याचा मनाचा निर्धार हवा. अशी जबाबदारी तेव्हाच कळते जेव्हा ही आपली मैत्री अजून व्यापक, व्यक्तिगत आनंदापलीकडच्या विश्वाशी नातं जोडते!

अशा निवडक ‘मैत्रिणी’बरोबर आपण नकळत आपली लांबवरची ध्येयं शोधत असतो. छोटय़ा-छोटय़ा प्रोजेक्टस्मधून एकत्र काम करताना, एखाद्या सामाजिक संस्थेसाठी आवर्जून सगळ्यांनी मिळून वेळ देताना, युवक संघटनांमध्ये प्रश्नांना भिडून जाताना, चळवळीत रमताना, स्कॉलरशिप्ससाठी रात्र-रात्र अभ्यासासाठी झगडताना निव्वळ एन्जॉयमेंट पलीकडची- तत्त्वांची, विचारांची मोठी शिदोरीपण आपल्याला याच मैत्रीतून मिळत जाते. यातून आपलं खरंखुरं प्रगल्भ व्यक्तित्व आकारला येत असतं.

अशाच एका मैत्रिणींच्या गटानं सिनियर कॉलेजमध्येच ठरवलं की, आपला आठवडय़ातला काही वेळ तरी ज्यातून आपल्याला काहीतरी इतरांसाठी निरपेक्षपणे केल्याचा आनंद मिळेल, अशा कामात घालवायचा. त्यातून मग त्यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या ध्वनिफिती बनवायला सुरुवात केली. हे काम करता करता त्यांची मैत्रीची वीणही कितीतरी दृढ झाली. या वयातली मैत्री आपल्या आयुष्यात खरंच खूप टर्निग पॉइंट देणारी ठरते. त्या सहवासाच्या खुणा आयुष्यभर आपल्या मनात ठसून राहतात. अनेकदा जगण्याला निर्णायक वळण देणाऱ्याही ठरतात. याचं मुख्य कारण म्हणजे मुलींची मैत्रीत खूप भावनिक गुंतवणूक असते. तिच्यातले छोटे-मोठे चढउतारही स्वत:च्या भावविश्वालाही हलवायला पुरेसे असतात. मुलींच्या मैत्रीतला ‘पझेसिव्हनेस’ (हक्काची जाणीव) खूप तीव्र असतो. त्याचाही काही वेळ एकमेकांना त्रास होऊ शकतो. या ‘पझेसिव्हनेस’मधून मग छोटे-छोटे गैरसमज, एकमेकांबरोबर विनाकारण चढाओढ, ‘प्रेमाचे त्रिकोण’ असे नकोसे वळसे मैत्रीला बसण्याची शक्यता असते. म्हणून मैत्रीतली ‘अति भावनिकता’ नियंत्रित करणं खूप गरजेचं असतं.

अशा खुळ्या वयातल्या मैत्रिणी म्हणजे जणू आपल्या मनाला फुटलेली आशा-आकांक्षांची कोवळी पालवी! पण पालवी जितकी टवटवीत आणि निरोगी तेवढी ती आपलं आयुष्यही बनवते. लांबवरची साथ करते. म्हणून तर आपण सगळेच जण या वयात अशा मैत्रीच्या बहराची मनापासून वाट पाहात असतो, तो जपत असतो! हो ना?

संकलन-जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - डॉ. अनघा लवळेकर (लोकसत्ता मधून साभार)

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...