चि.सौ.सुनबाई,
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी तू"... असं काहीही मी म्हणणार नाहीच. कारण ती मुलगी आणि सून ती सून..! सगळ्यात आधी, "मुलीचे खूप लाड होतात आणि सुनेचे मात्र हाल.." किंवा "मुलीला अगदी फुलात ठेवलं जातं आणि सुनेला मात्र काटयावर" ही बुरसलेली फिल्मी कल्पना डोक्यातून पूर्णपणे काढून टाक. अगं सुनेचं नातं लेकीपेक्षा खूप हळूवार असतं...!
लेकीला आपण सगळं देतो. पैसा-अडका, कपडा-लक्ता, लाड-कौतूक ती म्हणेल ते सगळं...पण अगं, आपला संसार नाही देत..! आपल्या घरातले निर्णयाचे अधिकार नाही देत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे... आपल्या घराण्याचं नाव नाही देत..! म्हणून म्हणते, मुलगी ती मुलगी आणि सून ती सून...! आत्तापर्यंत मुलगीपण अनुभवलस आता सूनपणाचं सूख अनुभव...!
मुलगी म्हणून वाढलीस - आता सून म्हणून वाढवायचस...! मुलगी म्हणून तुला इतरांनी जपलं - आता सून म्हणून तू इतरांना जपायचस..! मुलगी म्हणून शिकलीस - आता सून म्हणून स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून सिध्द करायचस..!
हे करताना, नवरा, सासू, सासरा, दीर, जावा, नणंदा, आप्तेष्ट, नोकरचाकर ह्यांना एकत्र बांधून ठेवणारी, आधार वाटणारी सक्षम व्यक्ती म्हणून तुझी ओळख तुलाच नक्की करायचीय. आणि मग घडवायचय मुलांना. तू सासू होशील, तेव्हा तुझा संसार तू सहजपणे ज्याच्यांवर सोपवू शकशील असं घडवायचय मुलांना...
तू हे सगळं करशील, तेव्हा आपलं घर तुला चहुबाजुंनी जपेल. बाहेरच्या जगात तुझ कर्तृत्व फुलवेल. आणि ह्या जबाबदार्यांच तुला ओझ कधीच वाटणार नाही. याची काळजी घ्यायला मी आहे बाळा सतत तुझ्या बरोबर..!
आपलं घर तुझ्या सवयीचं होईपर्यंत, तुझ्या सवयींची मी सवय करुन घेईन. तू आणलेले विचार आणि आपल्या घरचे पायंडे याचं आपण झकास कॉकटेल करुन टाकू म्हणजे बघ, तुला जीन्समध्ये इऽऽझी वाटत असेल तर मी नाक मुरडनार नाही आणि कधी मी साडीचा आग्रह धरला तर तुझ्या कपाळावर आठी पडणार नाही..! अगं, माझ्या लेकाचे नवे विचार काय कमी स्वीकारलेत का मी?आता तुझेही स्वीकारेन.
बाळा, तुझ्या प्रत्येक घडण्या-वाढण्यात आपण सगळे बरोबर असणार आहोत. आणि आपली ताकद असणार आहे आपल्यातला संवाद. मनात ठेवून कुढायचं नाही. मनमोकळं बोलायचं आणि सगळ्यांनी मिळून घराला जपायचं..! म्हणजे घर आपोआपच आपल्या कर्तृत्वाला जपतं. आपल्या अपेक्षांची आकांक्षाची क्षितीजं मिळवायला सामर्थ्य देतं - वेळ देतं - मदत देतं - आणि बळही देतं..!
सूनबाई, अखंड सौभाग्यवती हो......औक्षवंत हो......यशवंत हो.....! तुझ्या सार्या इच्छा पूर्ण होवू देत....!
ये बाळा, आपलं घर तुझ्यासाठी आतुरलय.......!
संकलन-जिव्हेश्वर.कॉम टिम