तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या भेटीचा प्रस्ताव पुढ्यात येऊन पडतो. अशा वेळी प्रस्ताव ठेवणाऱ्या व्यक्तीला "हो' म्हणावं की "नाही', याचा लागलीच निर्णय घेता येत नाही. कारण तो व्यक्ती पुरता अनोळखी नसला तरी त्यावर किती विश्वास ठेवावा..., असं भेटणं किती प्रस्तुत असेल..., शिष्टाचाराला अनुसरून असेल का..., भेटीचे प्रयोजन काय..., संबंधांमध्ये अजून परिपक्वता आली नसल्यानं पहिली भेट पुढे ढकलावी का.... आदी बाबींचा विचार केल्याविना निर्णय घेणं म्हणजे पोहता येत नसतानाही तलावात उडी मारण्यासारखं आहे. तेव्हा सावध पवित्रा घेऊन मागितलेल्या माफक वेळेत मनातील घालमेल शमविण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या प्रस्तावावर प्रामाणिक विचार करण्याची नितांत गरज असते. तसं आपण कसोशीनं करतोही. शेवटी निर्णय नकारात्मक असेल, तर काही पत्थे पाळायची गरज नाही. कारण भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण भेटण्याचा निर्णय घेतला असल्यास काही बाबी निश्चित पाळायला हव्यात. अर्थात पहिल्या भेटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि लहान-सहान चुका टाळण्यासाठी. हो ना...!
मुलींसाठी आचारसंहिता
1) पहिल्यावहिल्या भेटीचं स्थळ निश्चित करताना शहरातील "रेस्ट्रो'ला प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. एखाद्या बागेत किंवा शहराबाहेर पहिली भेट कधीही ठरवू नये. कारण अजूनही तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसता, तेव्हा अशी रिक्स न घेतलेलीच बरी. तसंही जर तुम्ही गार्डनमध्ये भेटायचा निर्णय घेतला आणि तेथे एखादा ओळखीचा व्यक्ती भेटला, तर त्याला तुम्ही काय उत्तर देणार. कशात काही नसतानाही तुमच्याविषयी खडेफोड करायला कुणाला आयता चान्स देऊ नका. तसंच शहराबाहेर भेटून पहिल्याच भेटीत नको ते प्रसंग ओढवून घेऊ नका.
2) "फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन,' असं म्हटलं जातं ते शंभर टक्के खरं आहे. पहिल्या भेटीत समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडायला हवा. त्यासाठी मनातील भीतीवर, गोंधळावर नियंत्रण मिळवा. तुम्ही कंफर्टेबल असल्याचं चेहऱ्यावर झळकू द्या. तुम्ही पूर्णपणे कंफर्टेबल राहिलात, तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या वागण्या, बोलण्यात सहज दिसून येतं. तुमचा आत्मविश्वास दुणावतो.
3) भेटायला जाताना कोणता आऊटफीट तुम्हाला सूट होईल, याचा विचार करा किंवा ज्याला तुम्ही भेटायला जाणार आहात, त्याच्या आवडी-निवडीला प्राधान्यक्रम देऊन बघा. तुम्ही निवडलेला ड्रेस कंफर्टेबल असावा. अन्यथा पहिल्या भेटीत तुमचं लक्ष्य केवळ ड्रेसवर खिळलेलं असेल आणि जे बोलायचे आहे, जे समजायचे आहे, त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होईल.
4) भेटवस्तू स्वीकारण्याची जोखीम पत्करू नका. बुके किंवा एखादं फूल घ्यायला हरकत नाही. पहिल्याच भेटीत भेटवस्तू स्वीकारल्यावर आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी चटकन सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. पहिल्याच भेटीत गोड गैरसमज करून आपलीच फसवणूक करून घेऊ नका.
5) त्या व्यक्तीसोबत जेवण घेऊ नका. एखादा लाइट ब्रेकफास्ट उदा. सॅन्डविच, पिझ्झा, बर्गर किंवा कॉफी घ्यायला काही हरकत नाही. जेवण करताना आपली सजगता कमी होते. नकळत समोरचा व्यक्ती आपल्या मनात घर करतो. अगदी चांगल्या अर्थानं.
6) पहिल्याच भेटीत त्याच्या बाईकवर किंवा कारमध्ये बसू नका. एकदा तुम्ही कंफर्टेबल फिल करायला लागलात की असा निर्णय घेता येईल. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर थोडा फार विश्वास करू शकता, अशी मनानं दाद दिल्यावर असा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे.
7) बोलताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाची, सवयींची चाचपणी करा. या आधी ऑनलाइन किंवा केवळ मोबाईलवर संवाद झाला असेल, तर ऑनलाइन व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्षात भेटलेल्या व्यक्तीतील साम्य किंवा विरोधाभास लक्ष्यात घ्या. तो मनाच्या कोपऱ्यात नोंदवून ठेवा. भेट संपल्यावर किंवा घरी गेल्यावर या बाबींवर प्रकर्षानं विचार करा.
8) कायम सजगपणामुळे तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही, याची काळजी घ्या. तुमचा मोजकेपणा पुढच्या व्यक्तीच्या लक्ष्यात येणार नाही, असं तुमचं आचरण ठेवा. म्हणजे साप भी मरजाये और लाठी भी ना तुटे.
9) वेब डेव्हलपर्सच्या भाषेत बोलायचं झाल्यास पहिली भेट दुसऱ्या भेटीची हायपर लिंक असते. तेव्हा पहिल्या भेटीत दुसऱ्या भेटीची तयारी करा किंवा दुसरी भेट ठरवायची की नाही याबाबत तुमचा तुम्ही निर्णय घ्या.
10) तुम्ही भेटलेल्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या भेटीची उत्सुकता जागृत ठेवा. अन्यथा, तुम्ही दाखविलेली अनाठायी सजगता तुमच्या नात्याला किंवा दुसऱ्या भेटीला मारक ठरू शकते. तेव्हा मोजकेपणासोबत एन्जॉयमेंटची, प्रसन्नतेची सोनेरी किनार असणे गरजेचे आहे.
मुलांसाठी आचारसंहिता
1) आऊटफीट ठरविताना तुम्हाला काय कुल दिसेल किंवा भेटायला येणाऱ्या व्यक्तीची चॉईस लक्ष्यात घेऊन सिलेक्शन करा. तुमच्या कपड्यांवरून तुमचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व झळकत असतं. तेव्हा कपड्यांकडे जरूर लक्ष द्या.
2) बोलताना तुमची मतं समोरच्या व्यक्तीवर लादू नका. एखाद्या विषयावर चर्चा करताना पुढच्या व्यक्तीला बोलायची पुरेपूर संधी द्या, तो काय बोलतोय याकडे लक्ष्य द्या. म्हणजेच तुम्ही उत्कृष्ट वक्ता असाल, तर उत्कृष्ट श्रोताही होऊन बघा. त्याशिवाय तुमच्यातील वक्त्याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही.
3) समोरच्या व्यक्तीचं तुमच्याशी असलेलं ऑनलाइन नातं आणि भेटल्यावर जाणवणारा भेद, लक्ष्यात घ्या. ऑनलाइन वागताना, बोलताना कधी कधी खरं व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव पुढे येत नाही. मात्र, प्रत्यक्षात भेटल्यावर त्या व्यक्तीचा खरा स्वभाव तुम्ही जाणून घेऊ शकता.
4) एखाद्या गोष्टीसाठी फार आग्रह धरू नका. म्हणजे तिनं तुमच्या बाईकवर बसावं, असं तुम्हाला लाख वाटत असलं तरी तिच्या इच्छा नसल्यास उगाच आपलं घोडं पुढे दामटू नका.
5) पहिल्या भेटीचा खर्च तुमच्या खिशातून होणार असल्यानं त्याची आधीच तयारी ठेवा. शक्यतोवर भेटी आधी एटीएममधून अतिरिक्त पैसे काढून ठेवा किंवा आकस्मिक आर्थिक संकट पुढे येऊन ठेपलं, तर त्यावर मात करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा एटीएम खिशात ठेवा. पहिल्या भेटीचं रेस्टो तुमच्या ऐपतीप्रमाणे निश्चित करा. जेणेकरून तुमच्या खिशाला जास्त ताण पडणार नाही.
6) वागताना, बोलताना अगदी मनमोकळे रहा. प्रसन्न चित्तानं गप्पा मारा, चर्चेला वळण द्या. तुम्हा हव्या असलेल्या विषयांवर चर्चा घडवून आणा. पहिली भेट कधीही कंटाळवाणी किंवा बोर व्हायला नको. अन्यथा, दुसऱ्या भेटीची उत्सुकता राहत नाही.
मुळ लेखन - विजय लाड (सकाळ मधून साभार)