परफेक्ट पार्टनर'च्या शोधात...
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच जबाबदारीचाही निर्णय असतो. अशी आयुष्यभराची सोबत निवडताना आजच्या तरुण-तरुणींचे विचार, त्यांची भूमिका आणि "परफेक्ट पार्टनर'विषयीचे बदलते निकष तरुणाईची बदलती मानसिकताच दर्शवतात.
काय मग, सापडली की नाही अजून तुला तुझी "ड्रीमगर्ल'?'' म्हटलं तर तसा अगदी साधाच प्रश्न, पण या "ड्रीमगर्ल' किंवा "ड्रीमबॉय'ची व्याख्या प्रत्येकाच्या नजरेत वेगवेगळी. आजकालचा तरुणवर्ग ही "ड्रीमगर्ल' किंवा 'परफेक्ट मॅच'ची कल्पना कशी करतो हे समजून घेण्यासाठी त्यांच्याशीच जेव्हा गप्पा मारल्या, तेव्हा सगळ्यांनी अगदी मोकळेपणाने त्यांची मतं मांडली.
रूही- 'परफेक्ट मॅच'ची माझी कल्पना तरी एकदम क्लिअर आहे. ही हॅज टु बी अ 'मॅचो मॅन'! 'टी डी एच अर्थात टॉल, डार्क अँड हॅंडसम' असलेल्या मुलालाच माझ्याकडून प्राधान्य!
स्वप्निल- माझी "ड्रीमगर्ल'ची कल्पनाही पक्की आहे. रंग गोरा, उंची ५ फूट ४ इंच, बांधा सुडौल, केस लांबसडक, स्वभाव स्मार्ट, चुणचुणीत. रस्त्याने जाताना किंवा मित्रमंडळींच्या गेट-टुगेदर पार्टीमध्ये जाताना सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, 'वा! काय सुंदर बायको आहे याची! यांचा जोडा काय मस्त रोमॅंटिक दिसतोय!'
प्रीती- मला पटतं हे म्हणणं. आपली जोडी चार माणसांत उठून दिसावी असं मलासुद्धा वाटतं. म्हणूनच मी परवा एका 'प्रपोजल'ला नकार दिला. शिक्षण, नोकरी, पत्रिका सगळं जुळत होतं. तो स्वभावानंही खूप 'सोशल' वाटला. समजुतदार होता. घरची बॅकग्राऊंडही चांगली. तरीही तो फार मनात भरला नाही. आम्ही एकत्र कुठे गेलो तर 'काय पाहिलं यांनी एकमेकांत?' अशाच नजरेनं लोक आमच्याकडे बघतील अशी मला भीती वाटली. त्यामुळे मी दिला नकार.
राहुल- मला नाही बुवा हे पटत. मला असं वाटतं, नुसत्या दिसण्यापेक्षा माझ्या भावी जोडीदारणीमध्ये 'मदर मटेरियल' किती आहे याला माझ्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे. लग्नानंतर ती जशी माझी पत्नी म्हणून समाजात वावरणार तशीच ती आमच्या घरची सून म्हणूनही वावरणार. सर्व भूमिका स्वीकारून त्या निभावण्याची क्षमता तिच्यात आहे की नाही हे समजून घेणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे.
रूही- दॅट्स नॉट फेअर! तिच्यात 'मदर मटेरियल' शोधणार, मग तुमच्यातसुद्धा 'फादर मटेरियल' आहे की नाही हे शोधणंही महत्त्वाचं आहे. मुलीनेसुद्धा आपला होणारा नवरा आपल्या घरचा जावई म्हणून शोभतो की नाही हे बघायला हवं. तोही काका, मामा, बाबा, मेहुणा या भूमिका जबाबदारीने पार पाडेल की नाही हे समजून घ्यायला हवं.
स्वाती- दिसण्याला किती 'महत्त्व'द्यायचं हे खरोखरच ज्याचं त्याने ठरवायचं. फ्रेंड्स, डोन्ट जज द बुक बाय इट्स कव्हर! पॅकेजिंगला अवास्तव महत्त्व देऊ नये, अशा मताची मी आहे. म्हणूनच 'लुक्स आणि पर्सनॅलिटी' हे दोन्ही महत्त्वाचं आहे.
सुनीती- हो, मीही तुझ्याशी पूर्ण सहमत आहे. मीही कुठे तरी वाचलं होतं, "लुक्स डिस्ऍपिअर इव्हॅन्चुअली'! हे दिसणं वगैरे सगळं नवीन नवीन असताना आकर्षित करतं, पण ते आयुष्यभर पुरत नाही. दिसायला अगदी देखणा असलेला नवरा स्वभावाने एकलकोंडा, स्वकेंद्री किंवा बावळट असलेला कुणी चालवून घेईल का? त्यापेक्षा दिसण्यात थोडा डावा असला तरी हरकत नाही, पण स्वभावात नो कॉम्प्रोमाइज! माझ्या बाह्यसौंदर्यावरच भाळलेला असेल तर अशा उथळ स्वभावामुळे इतरत्र भरकटणारच नाही याची काय शाश्वती? म्हणूनच मला वाटतं, नातं सखोल रुजण्यासाठी स्वभावाची अनुरूपता सर्वांत जास्त गरजेची आहे.
स्वाती- हो, हे मात्र अगदी खरं आहे. रूप हे फसवं असू शकतं. चांगला श्रीमंत नवरा पटवायचा असेल तर सुंदर दिसलं की झालं, असा साधा-सरळ हिशोब पूर्वीच्या काळी केला जायचा. श्शी! किती खुरटा विचार वाटतो हा! पती-पत्नीचं नातं असं फक्त शारीरिक असू शकतं का?
राहुल- पती-पत्नीचं नातं टिकण्यासाठी चारित्र्य (कॅरॅक्टर) कसं आहे हे महत्त्वाचं असतं. तसंच दोघांचे विचार, स्वभाव, आवडी-निवडी जुळणंही गरजेचं असतं. स्वाती- हो! पण त्यासाठी मुळात ती दोघं एकमेकांना अनुरूप आहेत की नाही, हे कळायला हवं ना? त्यांचे विचार, स्वभावही अनुरूप हवेत. याच्या दृष्टीने तिची करियरमधली प्रगती, तिचं महत्त्वाकांक्षी असणं हे कुटुंबासाठी घातक असेल आणि ती मात्र यशस्वी होण्यासाठी झटणारी असेल तर सुंदर जोडपं विजोड व्हायला वेळ लागणार नाही.
एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वातच फार शिस्त, टापटीप, काटेकोरपणा, वक्तशीरपणा असेल तर त्याने आपली जोडीदारीण शोधताना त्याला पूरक गुण-स्वभाव असणारी शोधली तर कमी खटके उडतील. अन्यथा 'एकाने पसरायचं आणि दुसऱ्याने आवरायचं' हे काही आयुष्यभर सुखाने चालू शकणार नाही.
प्रीती- हो, हे मात्र खरं हं! नुसतं देखण्या नवऱ्यासाठी आयुष्यभराच्या एवढ्या सगळ्या तडजोडी नाही बुवा आपल्याला करता येणार. चारचौघांत आपली जोडी कशी दिसते यापेक्षा एकान्तात आपण जोडीदाराला कसं वागवतो, हे समजून घेतलं तरच ते नातं टिकेल.
स्वप्निल- हे सगळं पटतंय मला, पण तरीही दिसणं अगदीच नगण्य आहे असं मला नाही वाटत. हो, हे खरं आहे, की सगळे १००% गुण फक्त दिसण्याला द्यायला नकोत. त्यामुळे ६० टक्के दिसणं आणि ४० टक्के गुण, स्वभाव, विचार, तत्त्व वगैरे वगैरेला द्यावेत का? तुम्हाला काय वाटतं?
सुनीती- अरे बाबा, हे शेवटी ज्याने त्याने आपापल्या स्वभाव आणि वृत्तीनुसार ठरवायचं असतं. माझ्या स्वभावानुसार मी दिसण्याला ३० टक्के आणि स्वभाव, तत्त्व, जीवनमूल्यं (उदा. अहिंसा, सामाजिक बांधिलकी, सत्यवाद, निर्व्यसनी स्वभाव) या सर्वांना ७० टक्के गुण देईन, आणि माझ्या जोडीदाराचेही तेच विचार आहेत ना हे पडताळून पाहीन.
थोडक्यात काय, तर आजची तरुण पिढीही आयुष्याचा जोडीदार निवडताना आता सजग बनते आहे. पती-पत्नीचं नातं शरीरसुखाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना आयुष्यभराची साथ देणारं आहे, एकमेकांची स्वप्नं-महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी प्रोत्साहन देणारं आहे याची जाणीव त्यांच्यात निर्माण होतेय. पती-पत्नीचं हे नातं फुलवण्यासाठी आजच्या तरुण पिढीला आपल्या सहकार्याची गरज आहे. रंग, रूप, उंची अशा बाह्यगुणांत आपण त्यांच्या जोडीदाराशी त्यांची तुलना न करता त्यांना अंतरंग समजून घ्यायला प्रोत्साहन देऊ या.
संकलन-जिव्हेश्वर.कॉम टिम