बोहोल्यावर चढण्यापूर्वी..

Share

ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या व लग्न झालेल्या जोडप्यांना अर्थपूर्ण विवाहोत्तर सहजीवनासाठी Marriage.com नावाची दोन दिवसांची कार्यशाळा १२ व १३ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.एखाद्या माणसाने इंजिनिअर ही पदवी संपादन केली की, तो ते काम करायला पात्र झाला असे म्हटले जाते. मात्र हा मुलगा किंवा मुलगी लग्न करण्याच्या वयाची झाली की, ती लग्नाळू-विवाहयोग्य झाली; असे जे आपण म्हणतो, तेव्हा ती जबाबदारी पेलण्यासाठी, ते नाते निभाविण्यासाठी मानसिकदृष्टय़ा ती सबल झाली, असे म्हणता येईल का? अगदी प्रेमविवाह झाला नसला तरी लग्न ठरल्यावर ते लगेचच काही होत नाही. पण तो मधला वेळ नेमका कशासाठी, हे दोघांनाही माहीत नसते आणि शिवाय आठवडय़ातून दोन संध्याकाळी एकत्र घालवणे आणि २४ तास आपापल्या सवयी, वागण्यासह एकत्र राहणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. म्हणूनच विवाहवेदीवर चढण्यापूर्वी एकमेकांना नेमके कसे ओळखायचे, हे महत्त्वाचे ठरते.

वैश्विकीकरणानंतर शिक्षण पुरे होता-होता कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या. कालपर्यंत खिशातल्या ५० रुपयांत डोसा खायचा की पावभाजी, हा विचार करणाऱ्या मुला-मुलींच्या हातात महिना २५-३० हजारांचे भक्कम वेतनाचे पॅकेज येऊ लागले. इतके पैसे शिलकीत टाकायला वर्ष-दोन वर्षे लागणाऱ्या आई-वडिलांना आपल्या मुलांचे अप्रूप वाटले नाही, तरच आश्चर्य! सर्व स्थिरस्थावर झाल्यावर आता लग्नासाठी कशाला थांबायचे? आधीच जमलेले असल्यास करून टाकायचे व नसल्यास वर्षांच्या आत तशाच तोलामोलाच्या (आय.टी.स्थित) जोडीदाराला शोधून लग्न करून टाकायचे. (एक वरमाय मला म्हणाली होती, ‘अहो, त्यानं इथं तिथं पाहायच्या आत मी चांगली मुलगी हेरून लग्न लावून टाकले. तो जरा कांकू करत होता; पण मी त्याला पेचातच टाकले की, या मुलीत काय कमी आहे ते सांग? मग तयार झाला.’) अशा वेळी प्रश्न पडतो- आपण लग्न नेमके कशासाठी करायचे हा प्रश्न त्याने स्वत:ला विचारला होता का, की सर्व जण करतात म्हणून लग्न करायचे? आता ही दोघं जरी एकमेकांना त्यांच्या धावपळीच्या रूटीनमध्ये भेटली तरी त्या भेटीत एकमेकांच्या आवडीनिवडी (‘तुला शाहरूख खान आवडतो का आमीर खान?’ अशा आवडी नव्हेत), आयुष्याबद्दलच्या कल्पना, अग्रक्रम, एकमेकांच्या मित्र-मैत्रिणींबद्दलचा दृष्टीकोन याबद्दल कितपत देवाणघेवाण होते?

महाराष्ट्रातील कुटुंब न्यायालयातील आकडेवारी लक्षात घेतली तर घटस्फोटाचे प्रमाण गेल्या २० वर्षांत १० पटीने वाढलेले आहे, असे दिसते. हा आकडा खरोखर धोक्याची सूचना देणारा आहे. त्यातील काही जोडप्यांच्या बाबतीत घटस्फोट न घेणे, हे दोघांपैकी एकाच्या बाबतीत अन्यायकारक असू शकते. त्यातील बहुतांशी लग्ने गैरसमज, दोघांच्या किंवा एकाच्या आई-वडिलांनी घेतलेल्या अडेल भूमिका आणि घडलेल्या प्रसंगांचा विपर्यास यामुळे चिघळून घटस्फोटापर्यंत जातात, हे स्पष्ट दिसून येत आहे.

विवाहबंधन ही आपण खुषीने केलेली गोष्ट आहे. त्यामुळे त्यातील लहानसहान मतभेदांचे पर्यवसान कशात होऊन द्यावे, याची जबाबदारी आपली दोघांची आहे, हीच बाब अनेकांनी लक्षात घेतलेली नसते. असे होण्याची अनेक मनोसामाजिक कारणे आहेत; पण त्यातील काही लक्षात घेऊन त्यावर वेळीच तोडगा काढला तर किती तरी संसार सुरळीत होतील. हा प्रश्न फक्त त्या दोघांचाच नाही तर त्या विवाहातून मूल झाले तर त्याचाही असतो. (कित्येक वेळा दोघांचे पटत नसले तरी ‘काही नाही, एक मूल झाले की सर्व ठीक होईल’, या भ्रामक समजुतीने मूल होऊन दिले जाते.) तसेच शांतपणे व सुखाने वृद्धापकाळ घालविण्याची इच्छा बाळगणाऱ्या  वयस्कर आई-वडिलांना नवी चिंता ग्रासते.

आता आपण ‘हम दो हमारे दो’वरून ‘हमारा/री एक’ वर आलो आहोत. एकच मूल असण्याचे, त्याला/तिला शेअर करायची सवय होत नाही, इतर मुलांशी जमवून घेता येत नाही इ. बहुचर्चित तोटे पाहिले तर त्याहीपेक्षा मोठा तोटा हा आहे की आईबाबांची भूमिका! आपल्या चिंटू/पिंकीला शिक्षण देऊन मोठे केल्यावर त्यांचे कर्तव्य संपत नाही तर आता त्याला/तिला मिळणारा जोडीदार कसा आहे, आम्ही ज्याप्रमाणे तळहातावरील फोडाप्रमाणे जपले त्याप्रमाणे त्याला/तिला वागणूक मिळते आहे की नाही, यावर दोघांची काकदृष्टी असते. आपल्या मुलावर/मुलीवर अन्याय होताच कामा नये ही यामागची तीव्र भावना! यामध्ये न्याय-अन्यायाच्या कल्पनाही व्यक्ती तितक्या प्रकृतीप्रमाणे वेगवेगळ्या असतात- ‘आज जाताना त्याला उशीर होत होता, म्हणून कारने सोडले नाही. गाडी असतानाही तिला लोकलने जावे लागले’ इथपासून ‘ती तिच्या मित्राशी फोनवर बोलत असताना मी घरात शिरल्याची तिनं दखलही घेतली नाही’ इथपर्यंत काहीही असू शकतात. ज्या मुला-मुलींना आपण लहानपणापासून स्वातंत्र्य दिले आहे, (वागणुकीचे स्वातंत्र्य- विचारांचे नव्हे, हे दुर्दैव!) त्यांना आपसात विचार करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू देणे, हे उचित नव्हे का? पण नाही. या ठिकाणी दोन्हीकडील आई-वडील आपल्या मुला-मुलीचे कसे चुकलेच नाही, हे अहमहमिकेने पटविण्याचा प्रयत्न करायला लागतात व आपली चूक थोडीफार मान्य करण्यापर्यंत आलेले दोघे परत पलटी खातात.

मुलीच्या नाकावर बसलेला राग संध्याकाळपर्यंत कमी होण्याची शक्यता असते, पण हातात मोबाईल असल्याने त्या रागाच्या अतिउच्च क्षणी मुलगी आईजवळ आपल्यावर होणाऱ्या सर्व अन्यायाचे पाढे वाचते व या माणसाबरोबर राहणे कसे अशक्य आहे, हे सांगते. बेताचे भांडण असेल तर आई लगेच ‘तो असं म्हणाला का? मग तू असं बोल’ इ. सल्ला देते. या सर्वात समस्या सुटण्यापेक्षा अधिक तिढा बसतो. एकदा एकमेकांची मने कलुषित झाली की, ज्या गोष्टींचे आधी कौतुक असते, (‘माझा अभी ना जरा सणकू आहे, पण रागावल्यावर इतका क्यूट दिसतो..) त्या सगळ्या खटकायला लागतात. मग अबोला, शीतयुद्ध, मग एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की, बॅग भरून माहेरी निघून जाणे. मग मनवायचे कोणी, हा प्रतिष्ठेचा मुद्दा होतो. यातला आई-वडिलांची भूमिका हा मुद्दा असला तरी त्या घटकाशिवायही आपला मुद्दा सोडायचा नाही, या अट्टाहासामुळे कितीतरी स्वतंत्र व्यक्ती म्हणून खूप चांगली वाटणारी जोडपी दोन दिशांना तोंड करून चालायला लागतात. कित्येक घरांमध्ये आमच्याकडची पद्धत आणि तुमच्याकडची (चुकीची) पद्धत हा कळीचा मुद्दा होतो व बदलायला तयार आहे या भूमिकेतून येणारी मुलगी ‘आमच्या-तुमच्या’ या कडेलोटामुळे जिद्दीने बदलायचं नाही, असं ठरवते व प्रकरण चिघळते.

काही घरांत मुलीला मिळणाऱ्या पगारावरून प्रकरण सुरू होते. लग्न झाल्यावर सर्व पगार सासऱ्यांच्या/सासूच्या हाती द्यायचा व खर्चाला पैसे मागून घ्यायचे, हे नवऱ्यावरील प्रेमामुळे सुरुवातीला ऐकले जाते, पण मग मैत्रिणीच्या वाढदिवसाला इतक्या महागडय़ा भेटी कशासाठी, या प्रश्नावर तिने आक्षेप घेतला की ‘गुणी’ सूनबाईंच्या अनेक गोष्टी खटकायला सुरुवात होते.

अनेक जोडप्याचे बेबनाव, त्यात दोघांची होणारी कोंडी, कर्तृत्ववान मुला-मुलींच्या कामावर-प्रकृतीवर होणारा परिणाम हे सर्व पाहिले की, हा प्रश्न आता घरा-घरांपुरता मर्यादित राहिला नाही आणि त्यावर काहीतरी उपाय होणे आवश्यक आहे, हे जाणवते. त्यासाठी लग्न करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मार्गदर्शन करणे, ही समाजाची गरज बनली आहे.

मुळ लेख - लोकसत्ता मध्ये डॉ. शुभा थत्ते यांनी प्रकाशित केलेला आहे.
संकलन-जिव्हेश्वर.कॉम टिम

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...