ब्रम्हदेवाच्या गाठी
एकदा एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि त्यानी त्याला विचारलं "बोल वत्सा, तुला काय हवं?" माणूस म्हणाला "देवा मला माझ्या घरापासून व्हाइट हाऊसपर्यंत एक रस्ता बांधून दे." देव म्हणाला, "मला हे शक्य नाही दुसरं काहीतरी माग." माणूस म्हणाला "मला एक सुंदर, समंजस, हुशार आणि न भांडणारी बायको मिळवून दे." यावर देव म्हणाला, "तुला रस्ता कसला हवा - दुपदरी की चारपदरी? मी तुला रस्ताच बांधून देतो."
बायकोच्या आधिपत्याखाली गांजलेल्या कुठल्यातरी नवर्यानं मनापासून तयार केलेला हा विनोद असावा. असं म्हणतात की, तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या विरोधात क्रांती किंवा बंड करता येत नाही त्या वेळी तुम्ही त्या गोष्टीवर विनोद करता आणि हसून दु:खाला वाट करुन देता. बायकोवरचे विनोद म्हणूनच अनेक नवरे येताजाता सांगत असतात. आणि बायकांना भेटून जरा विषय काढला की त्या नवर्यांच्या तक्रारी सुरू करतात.लोक म्हाणतात की, लग्नाच्या गाठी ब्रम्हदेव स्वर्गात बांधतो. मग या गाठी जुळताना, टिकताना, घट् होताना एवढे तिढे का पडतात?
लग्नानंतर सुरूवातीच्या दिवसांत सगळं कसं अगदी गोड गोड असतं.लग्न म्हणजे एकमेकंना सांभाळून घेणं, पहिला चिडला तर दुसर्यान शांत राहायच, दुसरा नाराज झाला तर पहिल्यानं त्याला समजवायचं, 'नवरा अणि बायको ही संसाररथाची दोन चाकं आहेत,' अशी वाक्य प्रत्येकाला तोंडपाठ असतात. अशा वक्यांची उजळणी करत करतच संसार सुरू होतो. त्या वेळी हा संसार रथ नुकत्याच बांधलेल्या एक्सप्रेस वे वरून सुसाट चाललेल्या गाडीप्रमाणे धावत असतो.
तो: ए आज भाजी कुठली केलीयंस तू?
ती: भरली वांगी....
तो: वा! क्या बात है.....
ती: तुझ्या दादांना बोलव ना आज जेवायला, त्यांनाही आवडतात ना भरली वांगी.
तो: अगं पण तुला कशाला जास्ती माणसांचा स्वयंपाक करायचा त्रास?
ती: त्यात कसला आलाय त्रास्?दोन तिथं चार माणस, स्वयंपाक तर करणारच आहे ना मी सगळा.
तो: मग मी तुला काही मदत करू का?
ती: नको... त्यापेक्षा छान सीडी लाव आणि गाणी ऐकत पड. नवीन सीडी़ज़् आणल्यापासून ऐकायच्या ठरवतोयस ना निवांत.
तो:अरे हो.. (तो सीडी लावतो.) अगं, तुला कपड्यांच्या खरेदीला जायचंय ना, ते कधी जाऊया?
ती:ते बघू रे कधीतरी, मला खूप कपडे आहेत आत्ता...
तो: मग ते कानातलं करयचं म्हणत ओतीस ते.....
ती: त्याचीही का।ही घाई नाही... तूच नवीन कपडे घे. आधीचे जुने झालेयंत
तो: बघू या....
आहाहा... काय हा रमणीय संवाद. या काळात दोघांनाही विचारा की, संसार कसा चाललाय? दोघही संगतील, "मला जसा हवा होता तसा जोडीदार मिळालय." रात्री एकमेकांना कानातही सांगतात, "मी खरंच भाग्यवान म्हणून मला तुझ्यासारखा पर्टनर मिळाला." हे दिवस, या रात्री सगंळ कसं सुसाट आणि सुरळीत. एक्सप्रेस वे वरून जणार्या गाडयांसारखं.
पण मग या एक्सप्रेस वे वर खड्डे पडू लागतात आणि चाकांचीही कुरकुर सुरू होते. आणि मग संसाररथ चांगलाच अडखळू लागतो.
तो: आज कोणती भाजी केलीय?
ती: भरली वांगी?
तो: आज पण?
ती: हो....
तो: तुला दुसरी भाजी मिळत नाही का कुठली?
ती: एवढं वाटतं तर स्वतः बा़जारातून घेऊन यायची रोज भाजी.
तो: मला वेळ नसतो तेवढा....
ती: सीडीज् आणायला बरा वेळ असतो गाण्यांच्या. त्या वेळी तर दुकान शोधून शोधून आणतोस सीडी़.
तो: ती माझी आवड आहे. भाजी आणणं ही माझी आवड नाही.
ती: मग मला काय आनंद होतो का भाजी आणताना?
तो: मला तुझ्याशी वाद घालायचा नहीये.
ती: मलाही हौस नाहीये वाद घालण्याची.
तो: आज जरा जादा स्वयंपाक कर, दादावहिनी येणारेत जेवायला.
ती: हॉटेलात जा त्यांना घेऊन.
तो: का? दोन माणसांनी काय फरक पडणारंय?
ती: ते चापत्या लाटायला लागतील तेव्हा कळेल तुला.
तो: तो माझा दादा आहे.
ती: मग तूच कर ना स्वयंपाक त्याच्यासाठी. मलाही खरेदीला जायचं आहे आज बाहेर.
तो: कशाला?
ती: ड्रेस आणायला.
तो: आत्ता परवाच तर आणलेस ना तू.
ती: त्याला महिना झाला जवळ्जवळ. तुला तर माझी काळजी नाहीये ,मग मलाच घ्यायला हवी ती.
तो: आता मी काळजी घ्यायची म्हणजे आणखी काय करायचं?
ती: किती दिवस सांगतेय मंगळसूत्रात भर टाकायचीय मला, पण तू ऐकतोस का माझं? तुझ्या आईनं सांगितलं
असतं तर ऐकलं असतसं ना तू......
तो: आता माझ्या आईला मधे आणू नको तू...
ती: का? त्या नाहीत येत आपल्या मध्ये.....चोंबडया....
तो: काय म्हणालीस?
ती: काही नाही...
तो: काय पण संस्कार केलेत बापानं......
ती: काय?
तो: काही नाही....
आता कसा वाटतोय हा संवाद? या काळात दोघांनाही विचारा की,संसार कसा चाललाय्?दोघही कपाळावर आठया चढवून सांगतील, "चाललाय जसा चालायचा तसा." या काळात तो रात्री जवळ गेल्यावर तिचं डोकं किंवा पोट दुखत असतं आणि तिला जेव्हा त्याची आठवण येते तेव्हा तो ऑफिस मध्ये कामात किंवा मित्रांसोबत पर्टीमध्ये असतो. थोदक्यात रथ सुरळीत चालावा, असं दोघांनाही वाटतं. पण ऐकाला वाटतं तेव्हा दुसरा प्रतिसाद द्यायला नसतो.
भारतीय बांधकामाच जे होतं तेच संसाराच्या मार्गाच होतं तात्पुरते खड्डे बुजवले जातात. पण पुन्हा ढग गडगडून्पवसाच्या सरी कोसळतात आनि रस्ते पुन्हा फाटतात.संसा
ररथाची चाकं तत्पुरतं वंगण पुरवत-मुरवत लावून चाललेलीच असतात. रथ ओढता ओढता चाकांना गुढघेदुखी, कंबरदुखी, ब्लडप्रेशर, डायबेटीस असे विकार जडतात. आणि मग आयुष्यात लक्षात येतं की, आता जगात आपलं असं एकच माणूसंय अणि ते म्हणजे आपला पर्टनर. त्या वेळी मग त्या रस्त्यावरून एकमेकांना सांभाळत रथ हळूहळू चालायला लागतो.
ती: काय रे जेवायला काय करायचं?
तो: कर भरलं वांगंच.
ती: आजपण....
तो: मग आता कुठे जातेयंस भाजी आणायला? नाहीतर नुसती डाळतांदळाची खिचडी कर, तेवढीच खाऊन घेऊ.
ती: काल दादा म्हणत होते की, उद्या जेवायला येतो म्हणून...
तो: मी फोन करून सांगितलं त्याला येऊ नको म्हणून....
ती: का?
तो: अगं कशाला पाहिजे उगाच तुला दगदग... आधीच कंबर दुखते तुझी सारखी. मी जातो आणि तुझी औषधं घेऊन येतो.
ती: तूच जाऊन प्रेशर चेक करून ये एकदा. काल दोन जिने चढलास तरी केवढा दम लागला तुला!
तो: तेवढा दम लागायचाच आता. मी येतो औषधं घेऊन तोवर तू गाणी ऐकत पड जरा वेळ.
ती: त्यापेक्षा तूही थांब. दोघंही गाणी ऐकू. औषध नंतर आणता येईल. (दोघही गाणी ऐकत पदतात.)
अहाहा... किती रमणीय संवाद..... दोघांनाही विचारा की,संसार कसा चाललाय? ते म्हणतील, "झाला आता संसार; त्याचं काय?" आता रोज रात्री दोघं जवळ जवळ्च झोपतात. झोपताना ऐकमेकांनी गोळ्या घेतल्या का' विचारतात. रात्रीअपरात्री जाग आली तर आपल्या पर्टनरचा श्वास सुरू आहे ना, हे पाहतात. तो व्यवस्थित चालला आहे, हे लक्षात आलं की समाधानानं पुन्हा डोळे मिटतात. एक्सप्रेस वे वर रथ आता हळूहळू चाललेला असतो. आपलं भाग्य म्हणून आपला जोडीदार आपल्यासोबत अजून आहे. याचं दोघांनाही समाधान वाटत असतं.
मुळ लेखन - सचिन मोटे