लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते!

Share

आई आणि लेकीचं नातं काही औरच.. अनेकरंगी, अनेकपदरी. त्या त्या वयात बदलत जाणाऱ्या छटांनी सजणारं. संघर्ष झाले तरी पाण्यात मारलेल्या काठीइतकाच दुरावा उरणारं.. असं हे नातं!

बहिणाबाई चौधरी यांनी एका कवितेत एका प्रसंगाचं छान वर्णन केलं आहे. कुण्या एका खेडेगावात एक साधू ‘भिक्षांदेही’ म्हणत फिरत आहे. एका शेतावर घरची सून माहेरच्या वर्णनाची गाणी गुणगुणते आहे. तो तिची चौकशी करतो आहे. सासरी होणारा त्रास सांगताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत. ते पाहून साधू पृच्छा करतो आहे की, ‘बाई गं, इतकं जर माहेर तुला हवंहवंसं वाटतंय तर तू का इथं नांदते आहेस?’ त्यावर ती म्हणते-  ‘ऐक ऐक साधूबोवा, काय मी सांगते- लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते!’ या उत्तरातच माय-लेकीच्या नात्याची अलवार वीण उलगडली आहे. आपल्या लेकीच्या डोईवरची पाखर जाऊ नये यासाठी पडेल तो त्रास स्वेच्छेनं, नेटानं सहन करणारी ‘आई’ आजच्या आधुनिक काळात काहीजणांना मिसफिटही वाटेल कदाचित. पण खरोखरच ‘आईपणा’च्या भूमिकेत शिरल्यावर हा ‘सांभाळण्या’चा, ‘जोपासण्या’चा, लेकीच्या मायेनं हळवं होण्याची भावना आपोआपच रुजत असावी.

मानवी नात्यांच्या सगळ्या आडव्या-उभ्या धाग्यांत ‘आई-लेकरा’चं नातं हे सर्वात आदिम, नैसर्गिक आणि छेद न देता येणारं मानलं जातं. बाबाचं नातं ‘जैविक’ असलं तरी बऱ्याचदा चित्रपटातल्या एखाद्या  महत्त्वाच्या पण पाहुण्या कलाकारासारखं असतं. निमित्तमात्र आणि निमित्ता निमित्तानं सहवास घडणारं. आई मात्र त्या बाळाचं विश्व व्यापून वर दशांगुळं उरणारी असते. त्यातही आई आणि लेकीचं नातं काही औरच.. अनेकरंगी, अनेकपदरी. त्या त्या वयात बदलत जाणाऱ्या छटांनी सजणारं. संघर्ष झाले तरी पाण्यात मारलेल्या काठीइतकाच दुरावा उरणारं.. असं हे नातं!

बहुतेक आयांना आपली लेक जणू आपलंच ‘प्रतिरूप’ असावी असं मनात कुठेतरी वाटत असतं. ‘हिच्याएवढी असतानाचा माझा फोटो पाह्य़ला का? अगदी सेम टू सेम हं!’ असं वाक्य पन्नास टक्के आयांनी प्रकटपणे आणि पन्नास टक्के आयांनी मनातल्या मनात (wishful thinking) नक्कीच म्हटलेलं असतं. ‘बाईपणा’च्या त्याच त्या रेषेवरच्या कितीतरी गोष्टी, अनुभव दोन टप्प्यांवरच्या या दोघीजणी वाटून घेत असतात. आई म्हणजे लेकीचा जणू कायमचा भोज्या! जरा कुठे ‘खुट्ट’ झालं की लेकीच्या ‘आई’ म्हणून हाका सुरू होणारच! मोठय़ानं किंवा मनातल्या मनात!

अर्थातच ‘आई-लेकी’चं नातं कितीही हृद्य असलं, तरी अगदीच राजरस्त्यासारखं गुळगुळीत, छानछानच असतं, असं नाही. या नात्यातही कितीतरी ताण-तणाव, खेचाखेची असते. ‘लेक’ म्हणजे आपलंच ‘प्रतिरूप’ ही भावना जरी मनात असली, तरी ‘बाईपणाचे’ वळसे/वेलांटय़ा कुठे सुटताहेत! मुलीची जात, तिची जपणूक, तिचं वळण, तिची काळजी, चार दिवसांची पाहुणी वगैरे प्रवाह मनात शतकानुशतके कुठेतरी वाहत असतात. पु. ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’मध्ये त्यांनी एक असाच गमतीशीर अनुभव नोंदवला आहे. लंडनमधल्या आधुनिक, तथाकथित मुक्त समाजाची प्रतिनिधी असणाऱ्या त्यांच्या लँडलेडीला तिच्या एअरहोस्टेस असणाऱ्या मुलीच्या लग्नाच्या काळजीनं पछाडलेलं पाहून ते म्हणतात- ‘पुण्यातली शांताबाई असो की लंडनमधली जेनी- लेकीच्या बाबतीत आई ती आईच!’

हे विधान जरी साठच्या दशकातलं असलं, तरी आजही परिस्थिती फार वेगळी नाही. बहुसंख्य आयांना आपली मुलगी ‘सुस्थळी’ पडावी ही बाब इतर गोष्टींच्या (करियर, अभ्यास, सामाजिक स्थान/कार्य) तुलनेत खूपच जास्त महत्त्वाची वाटतेच ना! हे बरोबर की चूक हा इथे मुद्दा नाही, पण त्या गोष्टीला असलेल्या ‘महत्त्वा’मुळे मग तिला तसं ‘वळण’ लावणं, ‘संस्कार’ करणं, हेही आईला ‘तिची’ जबाबदारी वाटते. तरुणपणापर्यंत बऱ्यापैकी मोकळीढाकळी वाढलेली लेक मग एकदम शिस्तीची, समजूतदार व्हावी, असं वाटायला लागतं.

टी. व्ही., चित्रपटांतून वेगळ्याच संस्कारांचा मारा चाललेला असतो. मुलीच्या जगात काय उलथापालथी घडत आहेत, याची फार नेमकी जाण आईला नसते. त्यामुळे सुरू होतो दोघींच्या वयाच्या नाजूक वळणावरचा संघर्ष. आत्यंतिक प्रेम- प्रेमापोटी काळजी- काळजीपोटी अतिचिकित्सा, नियमांच्या याद्या या भडिमारामध्ये हे नातं करपण्याची शक्यता वाढते. मग लेकीला आई एकदम ‘जुनाट ऑर्थोडॉक्स आणि भयंकर बोअर’ वाटायला लागते, तर आईला लेक ‘प्रॉब्लेमॅटिक, अफाट आणि हाताबाहेर चाललेली’ वाटू लागते. या तिढय़ाला उत्तर शोधणं मोठंच मुश्किल!

कधी कधी अगदी उलटंही घडतं बरं का! समुपदेशनाच्या निमित्तानं माहीत झालेल्या एका केसमध्ये मुलगी आणि आईमध्ये संघर्ष निर्माण होण्याचं कारण होतं ते ‘आईचं प्रचंड आधुनिकपण!’ ही आई उच्चशिक्षित, वरच्या सामाजिक व आर्थिक वर्तुळात वावरणारी होती. तसाच पेहेराव, वागणं-बोलणं जपणारी! मुलीबद्दलच्या काळजीनं त्रस्त होऊन समुपदेशकाकडे आली होती. तिची तक्रार होती की, ‘लेकीनं माझ्याशी बोलणंच टाकलंय. का ते समजत नाही!’ वरवर पाहता बाकी सगळं जिथल्या तिथंच होतं, पण लेकीशी सविस्तर बोलल्यानंतर समुपदेशकाला जाणवलं की, आई इतकी ‘ग्लॅमरस’ आणि ‘प्रभावशाली’ होती की सगळीकडे तिचाच दबदबा. तिचंच आकर्षण. तीच प्रत्येक कार्यक्रमाचा केंद्रबिंदू! वाढत्या वयातल्या लेकीला ते पचवता येत नव्हतं. तिच्या नवथरपणाला, फुलण्याला आईच्या ‘ग्लॅमर’चा काच होऊ लागला होता. ती म्हणे, ‘हिनं सारखं माझ्या वयाचं दिसण्याचा अट्टहास का करायचा? एकदा तरी ‘आई’सारखं दिसायला काय झालं?’ सात गाद्यांखालचा आईच्या अतिआधुनिकपणाचा खडा त्या राजकुमारीला टोचत होता. (दिसत नव्हता कुणालाच!)

आईला लेक जास्त हवीहवीशी वाटते हे खरंच! मुलगा ‘अग्नी’ देणारा असला तरी ‘मांडी’ मुलीचीच मऊ असते; असं एक समीकरण परंपरेनं आणि काही वेळा अनुभवानंही समाजमनात रुजलेलं दिसतं. लेकीचा ऋजू गोडवा, लडिवाळपणा, कुठल्याही वयात बांध फोडून कुशीत शिरणं, कधी न संपणाऱ्या गप्पांची रात्र जागवणं- अशा कितीतरी गोष्टी आई-लेकीचा बंध दृढ करत असतात. (एखाद्या बाप-लेकाला अशी रात्र जागवताना पाहिलंय कुणी? बहुतेक वेळा जागलेच तर दोघं दोन पुस्तकांत, लॅपटॉपमध्ये नाहीतर आपापल्या कामात डोकं खुपसलेलेच आढळतील!)

दोघींचंही वय वाढत जातं तसं हे नातं अजून गहिरं बनत जातं. सुरुवातीची लाडिक जवळीक कमी होते आणि एक वेगळीच आंतरिक समजूत मूळ धरू लागते. मानसशास्त्रज्ञांच्या मते ‘आई’ ही लेकीचं पहिलं Role Model असते. आई मुलीत आपलं भूतकाळातील रूप शोधते तसंच लेक आपलं भविष्यकाळातील रूप बघत असते. आजूबाजूच्या प्रतिमांशी ताडूनही बघत असते. या आंतरिक समजुतीमुळे एकमेकींची सुख-दु:खं सहजपणे कळायला मदत होते. क्वचित संघर्ष झाले तरी एखादा स्पर्श, पाठीवरचा हात, डोळ्यांतला अश्रू तो मिटवून टाकतात. अपवादाने का होईना पण प्रौढपणी माय-लेकी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणीही बनू शकतात. आई आपल्या सर्वच लेकरांच्या दुखण्यांमध्ये खूप हळवी बनते, पण आईच्या दुखण्याचा मानसिक त्रास लेकीला लेकापेक्षा बऱ्याचदा जास्त होतो, असं दिसतं. त्यामानानं मुलगे किंचित अंतरावरून आईच्या आजारपणाकडे पाहतात, असं वाटतं. (अर्थात अपवाद गृहीत धरून!)

पण मग प्रश्न असा पडतो की, हे नातं इतकं हवंहवंसं असूनसुद्धा कधीतरी अनेक बालिका जन्माला येण्यापूर्वीच का हरवून जातात? जन्माला आल्यानंतरही आयुष्यभर आईला आपल्या डोक्यावरचं ओझं का वाटतात? ‘पिंजर’मधली ती अगतिक आई आठवते ना? पळून गेलेल्या लेकीनं परत येऊन दरवाजा ठोठावल्यावर तिला स्वत:हून ‘परत जा’ म्हणून सांगणारी आणि डोळ्यांत-मनात एक ठेवून ओठांनी दुसरंच बोलणारी!
आजच्या तंत्रज्ञान, लोकशाहीची भलावण करणाऱ्या जगातही ‘मुलींच्या आई’चा स्वीकार आणि सन्मान वाढण्याची गरज आहे. ज्याची सुरुवात प्रत्येक आईनं स्वत:पासून निश्चयानं करायला हवी.

‘आईपण’ हे काही प्रत्येक वेळी बाळाला जन्म दिल्यानंच सुरू होतं, असंही नाही. काही वेळा जन्मदात्रीपेक्षाही पोषण करणारी धात्री अधिक ‘आईपण’ निभवत असते! आजही असं मनस्वी आईपण निभावणाऱ्या ‘आया’ आपल्या आजूबाजूला दिसतात. केवळ मातृत्वाच्या इच्छेपोटी कोर्टाशी भांडून दोन मुलींचं पालकत्व मिळविणारी अभिनेत्री सुस्मिता सेन, स्वत:च्या अगतिकतेमुळे लेकींना आधार न देऊ शकणाऱ्या देवदासींच्या मुलींना शिक्षणाचा, प्रेमाचा हात देणाऱ्या रेणुताई गावसकर, ज्यांच्या आईला त्यांना कूसच देता आली नाही अशा गुडघ्याएवढय़ा लेकरांचा पत्कर घेणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचं त्यांच्या लेकींशी असलेलं नातं जन्मदात्या आई-लेकीच्या नात्याहून निराळं आहे का? असं अनोखं आईपण आम्ही काही मैत्रिणींनी डॉ. राणीताई बंग यांच्या रूपात प्रत्यक्ष अनुभवलं. आम्ही मैत्रिणी ‘सर्च’च्या कामाचा अभ्यास करायला गेलो; तेव्हा जणू ‘माहेरपणा’ला गेल्यासारखं राणीताईंच्या नजरेतून, बोलण्यातून, जवळ घेण्यातून त्यांचं सार्वत्रिक ‘अम्मापण’ आम्हाला जाणवलं. आज रोज उठून भेट होत नसली तरी ती वत्सलता आमच्या मनात खोल घर करून राहिली आहे. अशा या झळझळीत उन्हासारख्या आई-लेकीतल्या बंधाला सलाम केल्यावाचून राहावत नाही!

ही आगळीवेगळी बंधनं जपणारे थोडे! घराघरांत दिसणारं नातं हे आपल्या रोजच्या परिचयातलं. पण त्यावरही काळ आपली मुद्रा उमटवत आहे, हे स्वच्छ दिसतं. काही मुद्रा सुलक्षणी तर काही नव्या चिंतांना जन्म देणाऱ्या! पूर्वी मुलं जास्त होती. मुलगी सहसा सासरच्या ‘घरी’ जाण्याची प्रथा होती. मुलगा नसला तरी मुलीच्या संसारात पाहुण्यासारखंच डोकावण्याची रीत होती. सगळ्या अपेक्षा एकाच एका अपत्यावर केंद्रित झालेल्या नव्हत्या. आज मात्र चित्र झपाटय़ानं बदलत आहे. प्रेमाची जागा व्यवहार घेतो आहे. ओघानंच व्यवहाराचा कोरडेपणाही त्यात मिसळतो आहे. नात्याच्या कोवळीकीपेक्षा उपयुक्ततेला जास्त महत्त्व मिळतंय ते स्वातंत्र्यातून जोपासल्या जाणाऱ्या व्यक्तिवादाला आणि ‘मी’पणालाही! आपल्या मित्राला फोनवर जाब विचारल्याबद्दल पाश्चात्त्य देशात मुलगी आईवर खटला भरते. आपल्याकडे अशी परिस्थिती नसली तरी ‘प्रॉपर्टी राईट्स’वरनं आईशी कायमचं शत्रुत्वही निर्माण होताना दिसतं आहे, ही वस्तुस्थिती आहे. शहरी भागात शिक्षणाच्या बाजूनं मुलगी/मुलगा भेद खूपच कमी झाला आहे. त्याचबरोबर दोनच मुली/एकच मुलगी असणारी कुटुंबेही वाढत आहेत. या लाडाकोडाच्या मुली जेव्हा स्वत:च्या करियरमध्ये, स्वत:च्या संसारात पडतात; तेव्हाही आईला आपली लेक ‘अगदी नजरेसमोर’ हवीशी वाटते आणि पूर्वी सासूच्या बाबतीत केलं जाणारं ‘आवा निघाली पंढरपुरा’चं वर्णन आईलाही लागू पडतं की काय असं चित्रं अनेक ठिकाणी दिसते. ‘काय शिजवलंय, काय खाल्लं, हे असं का केलं, त्या अमक्याचं तमकं केलंस का’, अशी रोजची रिमांड घेणाऱ्या आयांना आपण आपलं रिकामपण भरण्यासाठी मुलीच्या संसाराला वापरतो आहोत, त्यातून ताण निर्माण होत आहेत; हे कळतंय की नाही, असा प्रश्न मला पडतो. आई-लेकीच्या अशा परस्पर अतिगुंतलेपणातून चांगले नांदते संसार घटस्फोटापर्यंतही गेले आहेत.

‘आतडय़ाची’ माया कितीही दाट असली तरी ती व्यक्त करण्याचंही तारतम्य हवंच. नाहीतर आईच्या सावलीत सतत वाढणारं लेकीचं झाड डवरायचं कसं? त्याला थोडे उन्हाचे चटके, वाऱ्याचे धक्के, मातीतला कोरडेपणा कळायलाच हवा. तरच ती लेक खऱ्या अर्थानं वाढेल. कर्तृत्ववान ठरेल..

असं ऊनपावसाचं, वाऱ्यावादळाचं जग आपल्या लेकींना देऊन ज्या आयांनी त्यांना घट्टमुट्ट केलं आणि त्या आयांच्या विचारांचा, कार्यकर्तृत्वाचा वारसा ज्या लेकींनीही आपापल्या परीनं पुढे नेला अशी काही नावं सहज ध्यानी येतात. लेखनाच्या व चिंतनाच्या क्षेत्रात आपापल्या खास शैलीत मुशाफिरी केलेल्या इरावती कर्वे आणि गौरी देशपांडे, अभिनय क्षेत्रातली अनवट वाट चोखाळत आपला सच्चेपणा जपणाऱ्या अपर्णा सेन आणि कोंकणा सेन-शर्मा, संशोधन कार्यातली रेडियमची अजोड देणगी जगाला देणाऱ्या मारी क्यूरी- इरिन क्यूरी, राजकारणाच्या सगळ्या कटु-गोड अवकाशाला स्वीकारून पुढे जाणाऱ्या सोनिया गांधी-प्रियांका गांधी-वडेरा, वंचितांच्या सेवेचे व्रत घेणाऱ्या भारती आमटे-शीतल आमटे आणि अजून ज्ञात-अज्ञात कितीतरी जणी!

निसर्गानं बहाल केलेला हा आदिम बंध जोपासताना, त्याच्या ओढीची ताकद आणि मर्यादा ओळखणं गरजेचंच आहे. हे ‘आईपण’ फक्त रक्ताच्या नात्यापुरतं न ठेवता त्याचा पैस वाढवणंही शक्य आहे. मग ‘लेकीकडे जाईन- तूपरोटी खाईन’ असं म्हणणारी म्हातारी कुठल्या स्नेहभुकेल्या लेकीला कुणाच्या रूपात भेटेल ते कसं सांगावं?

संकलन-जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - डॉ. अनधा लवळेकर (लोकसत्ता मधून साभार)

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...