शुभमंगल सावधान....

Share

स्वप्नपूर्तीचा आनंद विलक्षण असतो. अगदी आकाश ढेगणं झाल्याचा भास होतो. दोघांनी मिळून सुखी जिवनाची स्वप्नं बघितली. ती पूर्ण करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केलेत. कितीही संकट आली, तरी एकमेकांची साथ सोडली नाही. म्हणून त्यांच्या प्रेमाची मधुर फलनिष्पत्ती झाली. मग येणार ना त्यांचा लग्नात! त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला...

खरंच एखाद्याच्या प्रेमाचं साफल्य आपल्याला समाधान देऊन जातं. त्यातून आपल्या स्वार्थी मनाला काहीही मिळत नसलं, तरी दोघांची हळवी स्वप्नं, दोघांचा अट्टहास पूर्ण झाल्याचा आनंद असतो. त्यामुळे आपल्या शेजारी-पाजारी सुरू असलेल्या प्रेमप्रकरणांचा शेवट गोड व्हावा, अशी आपण देवाकडे प्रार्थना करीत असतो! त्या दोघांनी एकमेकांना एक्‍सेप्ट करण्याआधी थोडा अवधी घेतला. काही कंडिशन्स पुढे ठेवल्या. आणि नंतर मनापासून साद दिली. तीही आयुष्यभरासाठी. कारण दोघांचं प्रेम हे टाइमपास नव्हतं. तर त्यांच्या प्रयत्नांमधून त्यांना प्रेमविरांसमोर एका आदर्श घालून द्यायचा होता. शेवटी प्रेम म्हणजे काय...? प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं... हेच खरं. त्यांचं प्रेम काही वेगळं नव्हतं. शेवट मनासारखा झाल्यानं त्यांच्या प्रयत्नांचं चीज झालं. वास्तवाच्या कसोटीवर ते तंतोतंत खरं उतरलं. विशेष म्हणजे ते दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं त्यांच्या घरातून फारसा विरोध झाला नाही. झाली ती फक्त थोडीबहुत नाराजी. काही क्षणांसाठी. तीही कालांतराने निवळली.

झाल्या, लग्नपत्रिका छापून झाल्या. दोघांची नावं शेजारी शेजारी लागलेली बघून त्याच्या भावना दाटून आल्या. तिचं नाव माहीत करून घेण्यासाठी त्यानं जिवाचा किती आटापिटा केला होता! चपराशाच्या हातावर पन्नास रुपयांची नोट टेकवून हजेपत्रकातून तिचं नाव हुडकून काढलं होतं. आज तेच नाव त्याच्या नावाशेजारी दिमाखात छापण्यात आलं होतं. त्याच्या नावालाही खरा जोडीदार मिळाला होता. त्यानं छान ट्रॅडिशनल कुडता-पायजमा आणि तिनं जरीकाठाची साडी घालून कॉलेजमध्ये सर्वांना पत्रिका वाटल्या. अगदी पैसे देऊन फितूर केलेल्या चपराशालाही. लग्नपत्रिका घेताना तो चपराशी म्हणाला,""साहेब मग झालं का नाय मनासारखं! म्या तुम्हासनी रजिस्टर दिलं म्हणून वेळेवर नाव कळालं. आन्‌ गाडी फलाटाला लागली. नाही तर तुम्ही बसला असता नाव सोधत. मला तेव्हाच संका आली होती. पण म्या काही बोलून दाखवली नाही. त्यानंतर तुम्ही दोघंबी नेहमीच सोबत दिसायचे. वाटलं, चला दोघांचं जुळलं बघा. तुम्ही दोघंबी अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा सोभता. थे तुम्ही इंग्रजीत म्हणता नवं. मेड फार इच अदर... तसंच बघा. (दोघंही एकमेकांकडे बघून हसत होते) छान वाटलं तुमच्या लग्नाची बातमी ऐकून...! माझं बी लग्नाआधी एका पोरीवर प्रेम होतं. तीबी शेजारच्या कालेजात चपराशी होती. दोन वर्षे चांगलं चाललं. पण तिच्या बापाला मी काही आवडलो नाही. त्यानं तिचं लगीन एका दुसऱ्या पोरासोबत लावून दिलं. तोबी चपराशीच होता; पण त्यांच्या वळखीतला. अन्‌ जातीतला. फार फार खराब वाटलं बघा. पण चालायचंच. यालाच लाइफ म्हणत्यात.'' (चपराश्‍यानं डोळ्यांना रुमाल लावला) त्यानं त्या चपराश्‍याच्या खांदयाला थोपटून त्याची समजून काढली...

त्यांच्या ग्रुपनं टिळक रस्त्यावरच्या एका डायनिंग हॉलमध्ये केळवणाचा कार्यक्रम ठेवला होता. जेवणाआधी थोडा अवकाश मिळाल्यानं त्यांनी ग्रुप फोटोसेशन केलं. आता फोटो काढायचा म्हटला की त्याचा हात बरोबर तिच्या खांद्यावर स्थिरावत असे. एवढ्यात पप्पूनं टोला मारलाच. तो म्हणाला,""बघा बघा... आता आपले साहेब कसे तिच्या खांद्यावर हात ठेवतात. नाही तर सिंहगडावर काढलेल्या फोटोत दोघांमध्ये मिटरभर अंतर होतं. सगळं लीगल झाल्यावर बघा कशी हिंमत वाढते ती...!'' सगळे फिदिफिदी हसले. त्या दोघांनी एकमेकांना घास भरवावा, असा जेवण सुरू होण्याआधी मित्रांनी हट्ट धरला. त्यानं ताटातली जिलबी हातात घेतली. तेव्हा मित्र म्हणाले, की अरे एकाच घासात अख्खी जिलबी तिच्या तोंडात घालायची बरंका... समजलं का तुला! नाहीतर पुन्हा घास भरवावा लागेल. मित्रांच्या बोलण्यानं त्याला स्फूर्ती चढली. त्यानं अख्खीच्या अख्खी जिलबी तिच्या तोंडात कोंबली. ती तडक उठून धावत बेसीनजवळ गेली. तिथं तोंडातला घास थुंकून गुळल्या केल्या. त्याला काही कळेना, काय झालंय ते! त्यांचा ग्रुप मोठमोठ्यानं हसत होता. त्यांच्या जवळ येऊन ती जवळजवळ ओरडलीच,""नालायकांनो..., बेशरमांनो... तुम्ही कधी सुधारणार...! पुन्हा आमचा गेम केला. जिलबीत मीठ भरून ठेवलं. आणि त्याला अख्खीच्या अख्खी जिलबी भरवायला लावली. थांबा तुमची लग्न होऊ देत... आम्ही चांगला गोंधळ घालणार आहोत...!'' मित्रांनी जिलबीची कुरघोडी केल्यावरही त्या दोघांनी घरी जातांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

लग्नाच्या आदल्या दिवशी त्या दोघांची घरं पाहुण्यांनी अगदी तुडुंब भरली होती. पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. दोघांच्या घरचं पहिलं आणि शेवटचच लग्न असल्यानं दूर-दूरचे नातलग आवर्जून आले होते. दोघांच्या आई-वडिलांनी स्वतःला लग्नाच्या तयारीत अक्षरशः झोकून दिलं होतं. अगदी श्‍वास घ्यायलाही त्यांना फुरसत नव्हती. ती दोघं मात्र निवांत होती. आतापर्यंत एखाद्या सणावाराला किंवा पुण्यातल्या गणेशोत्सवात त्यांच्याघरी पाहुणे येत असे. त्याचं त्यांना काही अप्रूप वाटत नव्हतं. पण आज ते उत्सवाच्या केंद्रस्थानी होते. आलेला पाहुणा त्यांच्यासोबत बोलल्याविना राहत नव्हता. त्यांना एकटं सोडत नव्हता. एवढंच काय तर त्यांना बसल्याजागी सगळं मिळत होतं. अगदी तहान लागली, तरी एखादी लहान मुलगी धावत जाऊन फ्रीजमधून पाण्याची बाटली आणायची.

लग्न एक दिवसावर येऊन ठेपलं होतं. लग्नाच्या विचारांनी तिच्या मनातील हुरहूर वाढली. ""इतके दिवस ज्या घरात मी राहिले, तेच घर उद्या कायमचं सोडून जायचंय. यानंतर कधीही या घरात मी एक पाहुणीच असेल. केवळ काही दिवसांची. माझी खोली ही तर माझी जिवाभावाची मैत्रीण आहे. इतक्‍या दिवसात तिच्यासोबत किती तरी भावबंध जोडले गेले. तिनं माझं प्रेम उमलताना बघितलंय. माझ्या भावनिक ओढाताणीची ती साक्षीदार आहे. मी सासरी जात असल्याचं माझ्या घरालाही दुःख झालं असेल. पण तरीही माझ्या लग्नात ते तितक्‍यात उत्साहानं सामील झालंय. जणू काही आमचा घराला भिंती नव्हत्याच, तर ती त्याची मनं होती... आणि ती माझ्याशी थेट जोडली गेली होती.''

""या घरातील दोन जिवांना सोडून जायची कल्पनाही नकोशी होते. त्यांना सोडून जायचं म्हटलं, तरी अंगात कापरं भरतं. लहानपणापासून त्यांनी मला काही काही कमी केलं नाही. मी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला की तो लागलीच पूर्ण व्हायचा. प्रसंगी दोघांनी आपल्या इच्छांना मुरड घातली, पण माझं मन कधी मारलं नाही. जणू काही माझ्या इच्छा पूर्ण करणंच त्यांच्या आयुष्याचा एकमेव उद्देश होता. त्यांना माझ्या जाण्यानं किती दुःख होईल...! मम्मी माझ्या लग्नासंदर्भातील प्रेमभावना जाणून घेऊ शकली नाही. पण तिचा विरोध केवळ त्याच्या पगाराला होता. मला चांगल्या नोकरीचा मुलगा मिळाला, तर मी सुखात राहील, असंच तिला वाटत होतं. असा विचार करणं काही गुन्हा नाही. तिच्या विरोधात तिचं प्रेम दडलं होतं. मुलीचं भलं करण्याची तळमळ होती...'' विचारांचा धुराळा उडत असतानाही मनातील कालवाकालव तिनं मम्मी-पप्पांना कळू दिली नाही. अन्यथा त्यांनी ऐवढावेळ रोखून धरलेल्या भावना कधीच ओसंडून वाहायला लागल्या असत्या.

रात्री त्याच्या नावाची हातावर मेहंदी सजली. आजवर ज्याचं नावं हृदयात होतं. तेच आता हातावरही चमकणार होतं. गोऱ्या नाजूक हातांवर नुकतीच लावलेली काळपट हिरवी मेहंदी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. मेहंदी लावून झाल्यावर पप्पा बाजूला येऊन बसले. तिचा हात हातात घेऊन मेहंदी निरखत म्हणाले,""वा छान मेहंदी लागली आहे. लहान असताना मेहंदी लावण्यासाठी केवढा हट्ट करायची तू... मला अजूनही आठवतं. पाय काय झाडायची, रुसून-फुगून काय बसायची, गोबरे गोबर गाल काय फुगवायची. आज बघ लागली ना, तुझ्या मनासारखी मेहंदी! पण ही आमच्या घरातील शेवटची मेहंदी असेल... याचं फार दुःख वाटतं. तू सोडून गेल्यावर आमचं तरी या जगात कोण आहे...! तुझा मंजुळ आवाज ऐकला की ऑफिसातून मी कितीही थकून आलो असलो, तरी क्षणात थकवा जायचा. तुझा हट्ट पुरविताना कधी कधी आम्ही विरोध केला असला, तरी तो लुटुपुटुचा होता. हेतुपुरस्सर कधीच आम्ही तुझं मन दुखावलं नाही. तू गेल्यावर आमचं घरं कसं सुनं सुनं होऊन जाईल...!'' त्यांचा आवाज कमालीचा जड झाला. डोळ्यातलं पाणी त्यांनी हिमतीनं रोखून धरलं होतं.

लग्नाचा दिवस उजाडला. सकाळपासून अंघोळी, पूजा, तयारी याची धांदल उडाली. लग्नाचा शालू चढविल्यावर लग्न घटका कधी समीप आली हे समजलंच नाही. दुसरीकडे ग्रुपचे सर्व मित्र-मैत्रिणी त्याच्या घरी जमले होते. त्यांना वरातीत सहभागी व्हायचं होतं. वरातीत सगळे मनसोक्त नाचले. त्यालाही घोड्यावरून उतरवून नाचवलं. वरात मंडपात दाखल झाल्यावर स्वागत समारंभ झाला. दोघांमध्ये पडदा धरण्यात आला. मंगलाष्टके झाले. अग्नीच्या साक्षीनं लग्न लागलं. टाळ्यांचा उत्साही कडकडाट झाला. ढोल-ताशांच्या आवाज आसमंतात निनादू लागला. सुलग्नासाठी रागा लागल्या. सुग्रास जेवणाच्या पंगती उठल्या. माना-पानाचे सोपस्कर पार पडले.

सायंकाळी पाठवणीची वेळ झाली. तिनं आणि मम्मी-पप्पांनी आतापर्यंत रोखलेल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. डोळ्यांसमोर आसवांचा पडदा तयार झाला. जणू कुणीतरी त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांच्यापासून हिरावून नेत होता. तेही त्यांच्याच संमतीनं. भावना उफाळून आल्या. आणवणींची शिदोरी घेऊन ती गाडीत बसली. तिच्या मम्मी-पप्पांजवळही राहिल्या होत्या त्या फक्त आठवणीच. गाडीत बसल्यावर ती त्याच्या खांद्यावर स्पुंदत स्पुंदत रडत होती. तिला शांत करून तो म्हणाला,""आजपासून मीच तुझी मम्मी आणि मीच तुझा पप्पा. त्यांच्या प्रेमाची सर माझ्या प्रेमाला येणार नाही... पण मी मनापासून प्रयत्न करेल... तुला कधी नाराज करणार नाही... तुझं मन कधी दुखावणार नाही... आणि हो... मी थोड्याच दिवसात तुझ्या मम्मी-पप्पांना माझ्या घरी राहण्याची विनंती करणार आहे... आपण सगळे सहा जणं एकत्र राहूया... जशी तू माझ्या आई-वडिलांची मुलगी आहेस... तसाच मी तुझ्या मम्मी-पप्पांचा मुलगा लागत नाही का...! मग मुलाच्या नात्यानं ते माझ्याच घरी राहायला नकोत...?'' तिनं समाधानानं त्याच्या खांद्यावर मान टाकली.

संकलन-जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - विजय लाड (सकाळ मधून साभार)

Share
श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
महापरिषदा / अधिवेशने
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
घरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Telangana State Swakul Sali Samaj
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...